Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

सदाफुली

स्वाती लभाने जिल्हा वर्धा

0 4 8 2 9 3

सदाफुली

आपल्या दाराशी फुलणारी सदाफुली….! कधी आपसूक रुजलेली, तर कधी महत्प्रयासाने टिकलेली! सदाफुलीच्या पंच पाकळ्यांचा देखावा, एका नाजूक हिरव्या दांडीवर आधारलेला.. तिची आकृती ध्यानस्थ बसलेल्या ऋषी सारखी समतेत दिसते! सदाफुलीचा रंगही किती मोहक! फिकट जांभळ्या रंगाच्या पाकळीवर, गर्द जांभळ्या गुलाबी रंगांची साठवणूक देठाशी अशी, आनंदाची शिदोरीच जणू! कधी पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद गुलाबी एकच ठिपका तिच्या वेगळेपणाच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. कधी अबोली पाकळ्या तर कधी राणी गुलाबी रंगांच्या छटांची, कंच हिरव्या गोलाकार सक्षम पानांवर आधारलेली सुंदर बाग आपल्या दाराशी नकळत तयार होते!

तिच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत, म्हणून ती सहसा दुर्लक्षिली जाते. घरातल्या माणसांकडून! पण, बाहेरून येणाऱ्यांच्या स्वागतासाठी ती हसतमुखाने कायम तत्पर असते. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरेतही तिचे सौंदर्य अल्पकाळ घर करून जाते. तिचं अस्तित्व ही बेमालूमपणे घराची ओळख बनते. पाणी, खत, निंदणी अशा तकलादु नैमित्तिक काळजीची तिला गरजही नसते. कारण तिचे अस्तित्व राखण्यासाठी ती स्वतःत सक्षम असते.

भर उन्हाळ्यात आपली बाग हिरवी राखण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. प्रत्येक झाडाची विचारपूस अगदी आत्मीयतेने करतो. पण सदाफुलीची मात्र आताही चुकून पडलेल्या पाण्याच्या एका फवाऱ्यावर बोळवण केली जाते. ती मात्र निश्चल असते. कुठल्याही अपेक्षाभंगाचं दुःख चित्र तिच्या चेहऱ्यावर रेखाटलं जात नाही. ती ‘स्थितप्रज्ञ’ असते!

एवढी मेहनत करूनही उन्हाच्या झळांत काही दिवस असे येतात जेव्हा आपल्या लाडक्या झाडांना एकही फुल उमललेलं नसतं..! अगदी देवपूजेलाही फुल न मिळाल्याने आपण दुःखी होतो! तेव्हाही …’सदाफुली’ बागेच्या रस्त्याकडील कोपऱ्यातून डोकावून आपल्याकडे हसून बघत असते तशीच निर्विकार…! कितीही म्हटलं तरी ती ही एक सजीव आहे. निश्चलतेच पांघरून ओढलेलं असलं तरी….आत खोल कुठेतरी दुर्लक्षिले जाण्याचे सल हुंदके देत असतातच! अशा कायम हेटाळणीनं मलूल झालेली सदाफुली ,जेव्हा तिला तिच्या हक्काचा पाऊस भेटतो!.

हो भेटतोच ,कारण त्यालाही तिला भेटण्याची ओढ असते! तेव्हा तिचा तजेला आणखीच उचंबळून येतो. पानांची स्वच्छ चकाकी तिच्या आनंदी असण्याची ग्वाही देत असते. वाऱ्याच्या झोतावर झुळझुळणारी नवी रोपे उगवून नव्या जन्माचा जणू उत्सव साजरा होत असतो…..!आपल्या दाराशी …आपल्याही नकळत! अशा उत्सवात व्हावे एखाद्या वेळेस, घरच्यांनीही सामील आणि सदाफुलीला तिच्या अस्तित्वाचे धन्यवाद द्यावे… !आपलं जगणं सुंदर केल्याबद्दल! आपल्या आयुष्यातही अशा काही ‘सदाफुली’ असतात… जपावे त्यांना वेळीच ओळखून!

स्वाती लभाने
जिल्हा वर्धा

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे