0
4
8
2
9
7
बोलबाला
सभ्यतेचा मुखवटा घालून
असत्य फिरे खुल्लमखुल्ला
मात्र कधी ना कधी जगात
होतो सत्याचाच बोलबाला.. //
संशयाचे घनगर्द आभाळ
दाही दिशांना येवो व्यापून
मात्र स्वयंप्रकाशी सूर्याला
टाकू शकत नाही झाकून… //
असत्यच करते आटापिटा
आणि अवाजवी अट्टाहास
मात्र सत्य “स्व” समर्थनार्थ
उगाच करत नाही प्रयास.. //
उथळ जलास खळखळाट
तसा असत्याचा जळफळाट
मात्र सत्य स्थिर धीरोदात्त
शांत संयमी पर्वत अफाट.. //
नको नको संग असत्याचा
अवलक्षणी अमंगल खळ
सत्य शिवाहूनी सुंदर असे
जणू गंगाजलाहून निर्मळ.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
========
0
4
8
2
9
7



