माझं हरवलेलं ‘मी’
डॉ. राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’ ता. जि. नागपूर

माझं हरवलेलं ‘मी’
एका गृहिणीच्या स्वप्नांना मिळालेली दुसरी संधी
माधुरी…! नाव किती गोड आहे ना? नावातच माधुर्य! पण प्रत्येक माधुरीच्या आयुष्यात माधुर्य असेलच असं नाही. काळ, परिस्थिती आणि माणसं हे तिघेही माणसाला घडवतात, बदलतात आणि कधी कधी त्याच्यात दडलेलं खरं व्यक्तिमत्त्वही त्याला दाखवून देतात. ही गोष्ट आहे अशाच एका माधुरीची. जिने संसारासाठी स्वतःला विसरलं, आपल्या स्वप्नांना काळजाच्या कप्प्यात बंद केलं; पण एके दिवशी त्याच कप्प्याचं कुलूप तिने स्वतःच उघडलं आणि स्वतःच्या हरवलेल्या ‘मी’ला पुन्हा शोधून काढलं.
माधुरी एका सर्वसामान्य कुटुंबापेक्षा थोड्या सुखवस्तू घरातील सून होती. घरात नवरा मंगेश, सासू-सासरे, एक मुलगा आयुष आणि एक मुलगी केतकी असं भरलेलं कुटुंब होतं. घरात आनंद होता, सुख होतं, समाधान होतं; पण शिस्तही तितकीच होती. तिचे सासरे एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक होते. मंगेश एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. मुलांचंही उच्चशिक्षण सुरू होतं. बाहेरून पाहिलं तर ते एक आदर्श, सुखी आणि सुस्थितत कुटुंब होतं. मात्र त्या घराच्या चार भिंतींच्या आत माधुरीच्या मनात काय सुरू होतं, हे कुणालाच दिसत नव्हतं.
दररोज सकाळी तिची धावपळ सुरू व्हायची. मंगेशला ऑफिसची घाई, मुलांना कॉलेजची घाई, सासऱ्यांना चहा हवा, सासूबाईंना पूजेची थाळी, फुलं, नैवेद्य.!! प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करताना तिचा स्वतःचा दिवस कधी सुरू होऊन कधी संपायचा, तिलाच कळत नसे. एवढं सगळं करूनही एखादी छोटीशी चूक झाली की लगेच टोमणे सुरू व्हायचे. “बिनडोक आहेस का?”, “मूर्खपणा करू नकोस”, “तुला वेळेची किंमतच नाही”, “तुला काय येतं?” मंगेश बोलायचा, मुलंही कधी कधी बोलायची आणि सासूबाईंचे टोमणे तर रोजचेच झाले होते.
कधी कधी माधुरी अक्षरशः रडकुंडी व्हायची. पण ती रडायची कुठे? स्वयंपाकघरात, बाथरूममध्ये की उशीमध्ये चेहरा लपवून? आजारी असली तरी काम करायची, अंग दुखत असलं तरी उठायची, ताप असला तरी घर सांभाळायची. सगळे घराबाहेर गेले की दोन क्षण अंथरुणावर अंग टाकायची; तोच सासूबाईंचा आवाज कानावर यायचा, “आम्ही नाही का केला संसार? आमच्याकडे तर कितीतरी माणसं होती…” माधुरी पुन्हा उठायची. कारण तिचं दुःख कुणाला दिसत नव्हतं; पण तिचं काम थांबलं की मात्र सगळ्यांना जाणवत होतं. हळूहळू तिलाही या सगळ्याची सवय झाली. रोज रडणाऱ्याला शेवटी रडायलाही वेळ उरत नाही. मंगेश ऑफिसला गेल्यावर बाहेरची कामंही माधुरीच करायची. किराणा, बाजार, बिलं, मुलांच्या फी, पालकसभा, बँकेची कामं, हॉस्पिटल. घरातील प्रत्येक छोटी-मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. घर चालत होतं; पण त्या घराला चालवणाऱ्या माधुरीचं स्वतःचं आयुष्य मात्र कुठेतरी थांबलं होतं.
एके दिवशी मंगेश ऑफिसला जाताना सहज म्हणाला, “माधुरी, मी पासपोर्ट ऑफिसची अपॉइंटमेंट घेतली आहे. आपल्या दोघांचे आणि मुलांचे डॉक्युमेंट्स तयार ठेव. लिस्ट व्हॉट्सअपवर पाठवतो.” दुपारी त्याचा मेसेज आला. माधुरीने आधी मुलांची कागदपत्रं काढली, मग मंगेशची फाईल उघडली आणि शेवटी स्वतःची फाईल हातात घेतली. फाईल उघडताच कुणास ठाऊक का, तिला जणू एखादा खजिनाच सापडल्याचा आनंद झाला. ती एकेक कागद अलगद हातात घेत होती. प्रत्येक प्रमाणपत्र निरखून पाहत होती आणि प्रत्येक कागदासोबत तिच्या भूतकाळाचा एक दरवाजा उघडत होता. दहावीची गुणपत्रिका हातात आली आणि ती थबकली.. मेरिटमध्ये! बारावीची गुणपत्रिका—८५ टक्के! पदवीची प्रमाणपत्र, उत्कृष्ट गुण आणि सुवर्णपदक!
ती स्वतःच स्वतःकडे आश्चर्याने पाहत होती. “ही मीच ना?” हो… हीच ती माधुरी होती, जिला आज घरात “मूर्ख”, “अडाणी” आणि “तुला काही येत नाही” असं ऐकावं लागत होतं. फाईलच्या शेवटी एक कागद तिच्या हाताला लागला ‘Appointment Letter’. तिचे हात थरथरले. तिने ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. कधीकाळी तिला एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली होती. पण मंगेशने तेव्हा स्पष्ट नकार दिला होता. “तू बाहेर जाशील तर मुलांना कोण सांभाळणार? माझ्या आई-बाबांची काळजी कोण घेणार? घर काय वाऱ्यावर सोडणार आहेस?”
माधुरी शांत झाली होती. तिने नोकरी सोडली. स्वतःची स्वप्नं, आकांक्षा, करिअर… सगळं एका छोट्याशा कप्प्यात बंद करून ठेवलं. काळजाच्या कप्प्यात! पण त्या दिवशी ती फाईल उघडली आणि त्या कप्प्याचं कुलूप तुटलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला स्वतःचीच कीव आली. “मी नक्की कोण आहे?” हा प्रश्न तिला पहिल्यांदा स्वतःला पडला. दोन-तीन दिवस माधुरी गप्प राहिली. ना कुणाशी भांडण, ना तक्रार. फक्त अंतर्मुख. एके रात्री तिने धीर करून मंगेशसमोर विषय काढला. “मला नोकरी करायची आहे… किंवा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमचं मार्गदर्शन हवं आहे.”
मंगेश हसला. “तुला काय कळतं? तुला जमणार नाही. या वयात काय करणार आहेस?” हे शब्द तिच्या कानावर पडले आणि मनाच्या अगदी खोलवर जाऊन बसले. त्या रात्री तिला झोप आली नाही. ती रात्र वैऱ्याची होती. पण त्या रात्री माधुरी खचली नाही; उलट अधिक मजबूत झाली. तिने स्वतःशीच ठरवलं. “काहीही झालं तरी आता माघार नाही.” रविवार होता. सगळे घरात होते. त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडा विशेष नाश्ता असायचा. सगळे टेबलाभोवती बसले. माधुरी मात्र शांतपणे उठली आणि घराच्या मध्यभागी उभी राहिली. जणू आज तिने स्वतःच अध्यक्षीय स्थान घेतलं होतं.
ती म्हणाली, “मला आज काही महत्त्वाचं बोलायचं आहे. सगळ्यांनी शांतपणे माझं म्हणणं ऐकायचं आणि आधी आपापले मोबाईल मला द्यायचे. मोबाईल बंद केल्यावरच नाश्ता मिळेल.” सगळे अवाक झाले. आज माधुरीचं हे रूप त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. पण नाश्ता हवा होता. सगळ्यांनी आपापले मोबाईल तिच्याकडे दिले. माधुरीने शांतपणे सुरुवात केली, “मला नोकरी करायची आहे. किंवा काहीतरी स्वतःचं सुरू करायचं आहे. मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे.” क्षणभर शांतता पसरली आणि मग अचानक सगळे फिदीफिदी हसायला लागले.
“हे काय विशेष सांगणार होतीस?”
“तुला काय येतं?”
“तू बाहेर जाणार? मग घर कोण सांभाळणार?”
“हा कसला विनोद आहे?”
माधुरी शांत होती. तिला या प्रतिक्रियेची अपेक्षाच होती. सगळे हसून झाले, तेव्हा ती म्हणाली, “सगळ्यांचं हसून झालं असेल तर मी काही बोलू का?” मंगेश उपहासाने म्हणाला, “हो, बोल ना! बोलून बोलून काय बोलशील? मूर्ख, अडाणी…” हा शब्द मात्र थेट तिच्या काळजाला भिडला. तिचा चेहरा लाल झाला. ती उठली. आपल्या पिशवीतून काही कागद बाहेर काढले आणि एकेक कागद टेबलावर ठेवू लागली. “हे माझं दहावीचं प्रमाणपत्र मेरिट. ही बारावीची गुणपत्रिका ८५ टक्के. आणि ही माझ्या पदवीची गुणपत्रिका गोल्ड मेडल.” सगळे शांत झाले. मग तिने मंगेशकडे पाहिलं. “मंगेश दहावी ७० टक्के, बारावी ६० टक्के आणि पदवी सेकंड क्लास.”
मुलीकडे पाहून ती म्हणाली, “दहावी ७१, बारावी ६३ आणि पदवी फर्स्ट क्लास.” मुलाकडे पाहून म्हणाली, “दहावी ६८, बारावी ६०… आणि पदवीमध्ये दोन विषय बॅक.” शेवटी ती सासूबाईंकडे वळली. “आई दहावी नापास.” मग सासऱ्यांकडे पाहत म्हणाली, “आणि बाबा… तुम्ही मुख्याध्यापक!” टेबलाभोवती अशी शांतता पसरली की, कुणाचा श्वासही ऐकू यावा. माधुरीचा आवाज आता थरथरत होता. “आता सांगा… कोण अडाणी? कोण मूर्ख? कोण बिनडोक?” क्षणभर कुणीच बोललं नाही.
ती पुढे म्हणाली, “मी शिक्षित होते. माझ्या पायावर उभं राहण्याची क्षमता होती. पण तुमच्यासाठी मी माझं शिक्षण बाजूला ठेवलं. तुमच्या संसारासाठी माझी नोकरी सोडली. आई-बाबांची आजारपणं काढली. मुलांना वाढवलं. घर सांभाळलं.” “बाबांना हार्ट अटॅक आला तेव्हा तुम्ही बाहेर होता ना मंगेश? हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून उपचार, औषधं, जेवण-पाणी… सगळं कुणी केलं? मी! तुम्ही बाहेर उभं राहून तुमचं दुःख सांगण्यात व्यस्त होता. निर्णय घ्यायची वेळ आली की तुम्ही भांबावून जायचा. त्या वेळी निर्णय कुणी घेतले? मी! आणि ते निर्णय योग्य ठरले तेव्हा मी अडाणी नव्हते का?” तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. “घराची जबाबदारी माझी नव्हती; ती आपली सगळ्यांची होती. पण मी माझा वाटा नव्हे, तर अनेकदा तुमचाही वाटा उचलला.”
“तुम्हाला भूक लागली की तुमच्या आवडीचं बनवून दिलं. पण कधी कुणी विचारलं का, ‘माधुरी, तुला काय आवडतं?’ ‘हे आम्हाला आवडत नाही’ म्हणून माझ्या आवडीच्या कितीतरी गोष्टी मी मनातच गाडल्या. माझं आयुष्य जगताना मी माझं आयुष्यच विसरले.” मग ती सासऱ्यांकडे वळली. “बाबा, तुम्ही आयुष्यभर शाळेत सांगितलं, ‘‘मुलगी शिकली तर घर शिकतं.’ मग आपल्या घरातल्या मुलीचं, तुमच्या सुनेचं शिक्षण तुम्ही का विसरलात? शिक्षणाला तुम्ही शाळेत मान दिलात… पण माझ्या स्वप्नांना या घरात का नाही?” इतकं बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली. घरात भयाण शांतता पसरली. कुणी काही खाल्लं नव्हतं; पण सगळ्यांचं पोट भरलं होतं पश्चात्तापाने! माधुरीने वर्षानुवर्षे केलेल्या त्यागाच्या जाणिवेने!
त्या दिवसापासून माधुरीने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. घरची कामं ती पूर्वीप्रमाणेच करायची; पण आता तिच्या दिवसातला थोडासा वेळ तिचा स्वतःचा होता. गुगल, यूट्यूब, ChatGPT, इन्स्टाग्राम… जिथून जे शिकता येईल ते ती शिकू लागली. तिने स्वतःला पुन्हा घडवायला सुरुवात केली. तिला जुनं Appointment Letter आठवलं. त्यावरचा पत्ता शोधला. कंपनीशी संपर्क केला. मेल केले. पत्र पाठवलं. काही दिवस उत्तर नाही. आठवडे गेले. शेवटी एक मेल आला, “आपल्याला दिलेली नियुक्तीची तारीख निघून गेली आहे. आम्ही बराच काळ वाट पाहिली. अखेर दुसऱ्या उमेदवाराची नियुक्ती केली. मात्र आपण पाठवलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे लक्षात घेऊन आपणास पुढे नक्की कळवू.” माधुरी थोडी निराश झाली. पण तिने आशा सोडली नाही. कारण आशा जिवंत असेल तर संधी कधीच संपत नाही.
तब्बल तीन महिन्यांनी तिच्या मेलवर एक संदेश आला “आपली मूळ प्रमाणपत्रे घेऊन मुलाखतीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे.” माधुरीच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण हा आनंद कुणाला सांगावा? तिने सर्वप्रथम सासू-सासऱ्यांना सांगितलं. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू आले. सासरे तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, “पोरी, मी चुकलो. पण आता माझी चूक सुधारायची आहे. तू खूप मोठी हो. तुझ्या या प्रवासाला आमचा आशीर्वाद आहे.” सासूबाईंनीही तिला जवळ घेतलं. त्या मिठीत पहिल्यांदा सासूपण नव्हतं… आईपण होतं…!!
माधुरी इंटरव्ह्यूला गेली. साडी नेसलेली माधुरी पाहून तिथल्या काही मुली आणि कर्मचारी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. पण ती आत गेली. एकामागून एक प्रश्न विचारले गेले. माधुरीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक, आत्मविश्वासाने आणि निर्धाराने दिलं. ज्यांनी तिला घरात “तुला काय येतं?” असं ऐकवलं होतं, त्या घरची माधुरी आज एका मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यू बोर्डासमोर स्वतःची ओळख स्वतः निर्माण करत होती. तिला सांगण्यात आलं, “आम्ही तुम्हाला लवकरच कळवू.” घरी येताना तिच्या मनात एक विलक्षण शांतता होती. जाताना ती सासू-सासऱ्यांच्या पाया पडून गेली होती. परतीच्या वाटेवर तिने अष्टविनायकाच्या मंदिरात जाऊन देवाच्या चरणी डोकं ठेवलं. “देवा… आता माझ्यासोबत राहा.”
घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. सासूबाई तिच्यासमोर आल्या आणि आज पहिल्यांदा त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं. सासरेही आले. सासूबाईंनी तिच्यासाठी खास तिच्या आवडीचा पदार्थ बनवला होता. तो पदार्थ तिच्या हातात ठेवला. माधुरी काही क्षण त्याकडे पाहतच राहिली. ज्या प्रेमाची ती इतकी वर्षं वाट पाहत होती, ते प्रेम आज तिच्यासमोर उभं होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या गंगा-यमुना वाहू लागल्या. आठ दिवसांनी घरात Registered Post आली. माधुरीने पाकीट उघडलं आणि… तिच्या हातात Appointment Letter होतं!
तेही एका मोठ्या पदाचं. Assistant Manager! आज खरंच तिच्यासाठी सोन्याचा दिवस होता. सासू-सासरे आणि माधुरी यांनी एक छोटासा गुपित बेत आखला. घरात कुणालाही काही सांगायचं नाही. आज पार्टी! तेही सासर्यां कडून. सगळे एका गाडीतून हॉटेलकडे निघाले. मुलं आणि मंगेश वारंवार विचारत होते, “आज पार्टी कशाची?” पण कुणीही काही सांगत नव्हतं. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर टेबल सुंदर सजवलेलं होतं. गुलाबांचा सुंदर गुच्छ, केक, कोल्ड ड्रिंक… सगळे खुश झाले. विशेष म्हणजे आजोबांनी पहिल्यांदाच पार्टी आयोजित केली होती! सगळे टेबलाभोवती बसले. आज मात्र अध्यक्षीय स्थान सासूबाईंनी घेतलं. त्या म्हणाल्या, “मला आज अत्यंत आनंदाने सांगायचं आहे की आपल्या कुटुंबातील एका सदस्याने आयुष्यात खूप मोठी भरारी घेतली आहे. सांगा बरं… कोण?”
सगळे एकमेकांकडे पाहू लागले. सासूबाईंनी हळूच माधुरीचा हात धरला. तिला उभं केलं. तिच्या हातात गुलाबांचा गुच्छ दिला, एक पाकीट दिलं त्यात तीन हजार रुपये होते आणि प्रेमाने तिच्या तोंडात पेढा भरवला. सगळे अवाक..! “हे काय?” सासूबाईंचा आवाज आता कडक झाला. “शांत! आज कुणीही मध्ये बोलायचं नाही. आज माझ्या सुनेने ते करून दाखवलं आहे, जे करण्याची इच्छा माझ्या मनात होती… पण मी कधीच करू शकले नाही. मीसुद्धा आयुष्यभर काही बंधनांमध्ये जगले. पण या पोरीने आपली जिद्द सोडली नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “हिने एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला, तो पास केला आणि आज तिच्या हातात Appointment Letter आलं आहे.” मंगेश सहज म्हणाला, “असं काय मोठं? एखादी छोटी-मोठी नोकरी लागली असेल.” सासूबाईंचा आवाज आणखी कडक झाला. “मंगेश! शांत रहा. आपल्या पत्नीला शुभेच्छा देण्याऐवजी हे काय बोलतोस? तुला माहिती तरी आहे का ती कोणत्या पदावर लागली आहे?” त्यांनी Appointment Letter मंगेशसमोर ठेवलं. “वाच!” मंगेशने कागद हातात घेतला. वाचता वाचता त्याचा चेहरा बदलला. तो काही क्षण स्तब्धच राहिला. “हे… हे कसं शक्य आहे?” त्याच्या हातातलं पत्र थरथरत होतं.
Assistant Manager! तेही अशा कंपनीत, जिथे सहजासहजी नियुक्ती होत नव्हती. आणि विशेष म्हणजे… ती कंपनी त्याच्याच ग्रुपची दुसरी कंपनी होती! मंगेश काही क्षण शांत राहिला. मग तो उठला. माधुरीजवळ गेला. तिच्या हातात पेढा ठेवला आणि म्हणाला, “अभिनंदन, माधुरी! मी चुकलो. मला माफ कर.” मुलंही धावत आली. आईला मिठी मारली. आज पहिल्यांदा त्या घरात माधुरीला कुणी “घर सांभाळणारी स्त्री” म्हणून नव्हे, तर स्वतःची ओळख निर्माण करणारी व्यक्ती म्हणून पाहत होतं. माधुरीने सगळ्यांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आनंद होता. ती म्हणाली, “मला कुणाचाही राग नाही. आणि कुणीही माझी माफी मागू नका. तुम्ही सारे माझेच आहात. उलट त्या दिवशी तुम्ही मला ‘मूर्ख’, ‘अडाणी’, ‘तुला काही येत नाही’ असं बोलला नसता, तर कदाचित मी इतकं मोठं धाडस केलंच नसतं. आज जे काही आहे, त्यात तुमचा वाटाही आहे.”
“आई-बाबांनी मला साथ दिली, म्हणून मी हे करू शकले. आयुष्यात काही साध्य करायचं असेल तर कधी कधी वेळ, वय, परिस्थिती आणि भीती…. सगळ्यांना मागे टाकावं लागतं. बंधनं तोडावी लागतात असं नाही; कधी कधी फक्त त्यांच्यापलीकडे चालत जावं लागतं.” ती थोडी थांबली. “यश मिळणं मोठी गोष्ट आहे; पण आपल्या यशाच्या क्षणी आपली माणसं आपल्या सोबत असणं, हा त्याहून मोठा आनंद आहे.” तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. “आज मला नोकरी मिळाली… पण त्याहून मोठी गोष्ट मला मिळाली आहे. माझं हरवलेलं ‘मी’ मला पुन्हा सापडलं आहे.”
सासूबाईंनी तिला मिठीत घेतलं. सासरे तिच्या डोक्यावर हात ठेवून उभे होते. मंगेश शांतपणे तिच्याकडे पाहत होता. मुलं तिच्या कुशीत होती. आणि त्या क्षणी ज्या घरात कधी तिच्या स्वप्नांना जागा नव्हती, त्याच घराने आज तिच्या स्वप्नांना सलाम केला होता. स्त्री घर सांभाळते म्हणून ती कमी शिकलेली नसते. ती शांत असते म्हणून ती कमजोर नसते. ती त्याग करते म्हणून तिच्यात क्षमता नसते असंही नाही. कधी कधी तिची शांतता ही तिची कमजोरी नसते… ती तिच्या संयमाची सीमा असते. आणि ज्या दिवशी त्या संयमाचा बांध फुटतो, त्या दिवशी एक गृहिणी जन्माला येत नाही, एक व्यक्तिमत्त्व जन्माला येतं.
स्त्रीला संधी दिली तर ती घर घडवते… आणि संधी स्वतः निर्माण केली तर ती स्वतःचं विश्व घडवते. माधुरीनेही तेच केलं. तिने कुणाशी लढून विजय मिळवला नाही; तिने स्वतःला हरवू दिलं नाही. तिने कुणाचा पराभव केला नाही; तिने स्वतःच्या क्षमतेला जिंकून दाखवलं. आणि म्हणूनच तिच्या आयुष्यातील तो दिवस केवळ नोकरी मिळाल्याचा दिवस नव्हता…..!! तो दिवस होता, ‘एका स्त्रीने स्वतःला पुन्हा ओळखल्याचा…’एका घराने आपल्या सुनेची किंमत ओळखल्याचा… आणि एका हरवलेल्या ‘मी’ला पुन्हा सापडल्याचा! माधुरी… नावातलं माधुर्य आता तिच्या आयुष्यातही उतरलं होतं.
डॉ. राजेश चंद्रकांत काळे
‘राजस’
ता. जि. नागपूर
=======



