Breaking
अहमदनगरनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

वारी पंढरीची; अनिता व्यवहारे

अहमदनगर

0 4 8 3 0 0

वारी पंढरीची

चला चला हो पंढरीला जाऊ
जीवाच्या जिवलगा पाहू||
अशी अनंत आस मनात ठेवून
“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ||
पंढरीनाथ महाराज की जय||”

असा जय घोष सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमत आहे. याचं कारण आहे आषाढी वारी. आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या वाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. अशाच या वारी सोहळ्याचे तुकोबांच्या वैकुंठवासानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्यात रूपांतर केले. वारीची ही परंपरा त्यांनी तशीच चालू ठेवली पण देहू देवस्थानची सर्वांगीण वृद्धी ही केली. ते ज्येष्ठ वैद्य सप्तमीला संत तुकारामांच्या पादुका घेऊन आळंदीत येत असत. तेथून माऊली ज्ञानदेवांच्या पादुका पालखीत घालून पंढरपूरला आणल्या जात. म्हणूनच तर
“ज्ञानोबा माऊली तुकाराम||”
या भजनाचा उगम झाला.

कार्तिकी वारीला महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आपल्या तिर्थक्षेत्रावरून पंढरपूरला येतात. विशेष म्हणजे संत कबीर महाराजांची पालखी तर श्रीक्षेत्र काशीहून श्रीक्षेत्र पंढरपूरला येते. आषाढी वारीला अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी पंढरपुरात येतात.’पंढरीचा पांडुरंग म्हणजे श्री विठ्ठल’ महाराष्ट्राचे संतांचे आराध्य दैवत.संत ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, एकनाथ, नामदेव, सोपान देव, मुक्ताबाई, सावता,गोरोबा, चोखामेळा, कबीर हे संत देखील विठ्ठलाचे भक्त आणि विठुरायाची पंढरी ही संतांचे माहेर आणि विठुराया म्हणजे वारकऱ्यांचे मायबाप. ते जणू भक्तांना सांगत असतात की,
‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज|
|सांगत असे गुज पांडुरंग|| त्यामुळेच तर या मायबापाच्या भेटीसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो वारकरी संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. या वारीच्या सोहळ्याला कुणालाही आमंत्रण द्यावे लागत नाही. ज्याला पंढरीची ओढ असते तो त्या वारीत सहभागी होतो. ‘वारी म्हणजे विठ्ठल परिक्रमा’ आणि ही परिक्रमा महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातून, खेड्यापाड्यातून, गावापासून, शहरातून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा.

‘वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा’. येथे लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद नाही. कारण ‘भेदाभेद अमंगळ.. नामजपातून मिळते फळ
हाच भाव प्रत्येकाच्या मनी दाटलेला दिसून येतो.अशीच ही पालखीचे गावागावातून जात असताना श्रीरामांच्या पुण्यनगरीमध्ये दाखल होते आणि आमच्या या श्रीरामपूर नगरीला जणू पंढरीचा रूप प्राप्त होतं.ठिकठिकाणी भक्ती भाव दाटून येतात आपण वारीला जाऊ शकत नाही पण जे वारकरी वारीतून पंढरीला निघाले आहेत त्यांच्या रूपात विठुरायाला पाहून श्रीरामपूरकर चे भाविक या वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन होतात. फुलांच्या पायघड्या अंथरून ठिकठिकाणी अन्नक्षेत्र उभारून आदराने स्वागत करून त्यांचे पोट पूजा केली जाते. तिथून पुढे निघून हीच पालखी पुढे केशव गोविंद नगरीमध्ये म्हणजे बेलापूर येथे मुक्कामी जाते. बेलापूर खुर्द ही माझी कर्मभूमी.दरवर्षी पालखी तिथे येते तेव्हा ती माझी शाळेच्या प्रांगणातच उतरते. सर्व विद्यार्थी शिक्षक मनोभावे पालखीचे दर्शन घेतात. जणू ‘ज्ञानमंदरी माझ्या अवतरली पंढरी’||
‘माझे विद्यार्थी रंगून जाती त्यात बनुनी वारकरी||
आणि हे वारीतलं पावित्र्यमय वातावरण पुढची पालखी येईपर्यंत आमच्या शैक्षणिक वर्षात आम्हाला अल्हाददायी ठरत. यावर्षी मी शाळेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे तिथे पालखी आली तेव्हा मी शाळेत नव्हते. सकाळपासून मनात पालखीच्या दर्शनाची ओढ.तेवढ्यात शाळेतील शिक्षकांचा फोन आला. मॅडम पालखी आपल्या शाळेजवळ आहे अजून. येताय का दर्शनाला? क्षणाचा विलंब न लावता मी बेलापूरला निघाले पण काही वेळातच पालखीने तिथून प्रस्थान केले मन थोडं खट्टू झालं.. पण पालखी थोडी पुढे जाऊन थांबणार होती घाईघाईत तिथे जाऊन पालखीचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे तिथेही देवाकडे स्वतःबरोबर ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी साकडं घालताना
बा विठ्ठला तूच आमचे जीवन आगम -निगमाचे स्थान
तूच विठ्ठल आमचे सिद्धीचे साधन
लाभू दे माझ्या विद्यार्थ्यांना सुख शांतीचे धन ||
असे साकडे घालून मनात विठ्ठल नामाचा जयघोष करत घरी परतले.

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे