श्रद्धा व अंधश्रद्धा
मानव ज्यावेळी समूहाने राहायचा त्यावेळी त्याचे भटकंती अवस्था संपून तो स्थिर जीवन जगू लागला . निसर्गातील काही अफाट शक्ती ज्या मूर्त स्वरूपात तो पाहू शकत होता ,जीवन जगण्याचे बळ सामर्थ्य शक्ती त्यांचे जगणे सुकर करत होत्या त्या प्रचंड शक्तींना तो देव मानत होता. निसर्गातील पंचमहाभूते ज्यामुळे सृष्टी टिकून आहे त्या पृथ्वी ,जल अग्नी, वायू ,आकाश या पंचमहाभूतांना तो देव मानायचा. त्यांच्या प्रचंड सामर्थ्यापुढे हा मानव नतमस्तक होत होता. हळूहळू समूहाने राहणारा हा माणूस ऊन ,पाऊस, विजांचा लखलखाट, नद्यांचे लोट व वादळे या निसर्गातील शक्तीबद्दल त्याच्या कुतूहल्याबद्दल भीती आणि आश्चर्य त्याला वाटू लागले त्या अद्भुत सामर्थ्याला तो देव म्हणून त्यांची पूजा करणे धर्म व्यवस्थेची ही पहिली पायरी होती.
शेतीच्या शोधा नंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसे प्रथम निसर्ग आणि नंतर प्रतीकात्मक पूजा, प्रतीक मूर्ती वापरली जाऊ लागली. आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्याख्येत पूर्णपणे बसत नाही हे जीतके खरे तितकेच हेही खरे की जगात धर्माचे मूलतत्त्व एकच आहे मानव जातीचे कल्याण व पर्यायाने सर्वांचे कल्याण.धर्म म्हणजे काय हे गाडगेबाबांच्या शब्दात सांगायचे तर भुकेलेल्या अन्न, तहानलेल्यांना पाणी, बेघरांना आसरा, बेकारांना रोजगार दुखी झालेल्या मनास हिम्मत , गरीब मुलांना शिक्षण, अंधपंगू रोगी लोकांना औषध, मुक्या प्राण्याने अभय हाच खरा धर्म.
पण आजच्या काळात धर्म आणि धर्माचे स्वरूप बदलत चालले आहे .धर्माचे जसे रूप बदलले तसेच धर्माच्या आचरण सांगणारे कथाकथित भोंदू बाबांचे वर्चस्व वाढत चालले आहे. दिल्ली जवळ उत्तर प्रदेशातील हात रस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे सत्संगाच्या वेळ झालेल्या चेंगराचेंगरीत 122 जणांचे बळी गेले. असे प्रवचन देणारे भोंदू बाबा जे स्वतःला भोले बाबा म्हणून घेतात त्यांच्यावरील लोकांची ही श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा. समाजव्यवस्थेचा पराजय म्हणावा की श्रद्धेच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेणाऱ्या चालाख लोकांचा विजय म्हणावा. आलिशान गाडीतून आलेल्या बाबांच्या प्रवचनानंतर त्यांच्या पायाखालची धूळ कपाळी लावण्यासाठी लोकांनी धावपळ केली . आणि तीच त्यांना महागात पडली.ज्या मातीत आपण जन्मलो वाढलो त्या मातीचे ऋण फिरण्यासाठी प्रयत्नांची जोड देत आपले कर्म करत राहण, मेहनत करणं कधीही चांगलं. दैववादावर किंवा बुवाबाजीवर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्तृत्वावर स्वतःक्या जिद्द व विश्वासावर आपल्यात बदल घडवून आणून जीवनाची लज्जत वाढवणं कधीही लाजवाब असेल . या बाबांच्या पायाखालची धूळ ज्यांच्या वाटेवरची माती कपाळाला लावल्यास वेड्यासारखे धावलेल्या लोकांची पाप- पुण्य, दर्शन- मोक्ष या संकल्पना अतिशय आंधळ्या होत्या .त्यासाठी त्या बाबांच्या जाण्याच्या मार्गावरून हे लोक वेड्यासारखे सुसाट धावली.
चिखलामुळे निसरडे रस्त्यावर खाली पडल्यामुळे जमावाच्या तुफान गर्दी तुडवले गेले .काही गर्दीत श्वास न मिळाल्याने ,ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे मेले. हा जीवघेणा मोक्ष म्हणावा की अंधश्रद्धेचा बळी म्हणावा. आज समाजाने आपली विचारधारा बदलणे अगदी आवश्यक झाले आहे. असल्या भोंदूगिरीत अडकून राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा.जगा आणि जगू द्या तत्वाचे पालन करत स्वतःची व इतरांची प्रगती साधने व मानवतेच्या दृष्टीने होईल तशी इतरांना योग्य मदत करणे हाच माझ्या मते श्रेष्ठ धर्म व आचरण असेल .
अनुराधा भुरे, नांदेड
============



