युवा महोत्सवात ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

युवा महोत्सवात ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला नवी ओळख
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि. ०५ ऑगस्ट): विद्यार्थी विकास कक्ष, मुंबई विद्यापीठ आणि पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५९ वा “युवा महोत्सव” दि. ०४ ऑगस्ट २०२६ रोजी पी.एन.पी.कॅालेज वेश्वी,अलिबाग येथे आयोजित करण्यात आल्या होता.
या युवा महोत्सवात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्य, वादविवाद, वक्तृत्व, चित्रकला, मूर्तीकला, मेहंदी, कार्टूनिंग, कोलाज, कथाकथन आदी विविध कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथील १० विद्यार्थ्यांनी ८ स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. कु. आलिया सलीम गोंडेकर हिने इंग्रजी कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. असबा इश्तियाक धनसे व कु. सोनिया सज्जाद हसवारे यांनी इंग्रजी वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. अरमीना झहीर सय्यद हिला कोलाज स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक, तर कु. जान्हवी मधुकर पाटील हिला कार्टूनिंग स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॅा. नीलम हजारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. पियुषा पाटील व प्रा. चिन्मय राणे यांचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तसेच आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. निलम म्हात्रे व प्रा. कौशिक बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. कु. आर्य गौतम पाटील व कु. परी कासार यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या यशाबद्दल प्रा. डॉ. संदीप घाडगे, प्रा. सुरज पुरी, प्रा. हर्षदा चेवले तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला नवी ओळख मिळाली आहे.



