Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

ऑस्ट्रेलियन लव बर्ड्स

शर्मिला देशमुख -घुमरे

0 4 8 2 9 0

ऑस्ट्रेलियन लव बर्ड्स

नावात काय असते? यावर बरेच चिंतन मनन झाले असेल. अशाच एका नावाप्रमाणेही गुण व नावाच्या विरुद्ध गुणधर्म असणाऱ्या पक्षांचा स्वानुभव. निसर्गात मन मुक्त विहारनारे पक्षी पाहून मन अगदी त्यांच्या सवे आकाशात भरारी घेत असते माझे. त्यांचा आनंद पाहून मीही आनंदी होते, त्यांचे निरीक्षण करणे आवडते मला. पण पक्षी पिंजऱ्यात ठेवणे अजिबात आवडत नाही. एके दिवशी घरच्यांचे पक्षी प्रेम अचानक कसे उभारून आले. मला काही समजले नाही आणि मी नको नको म्हणत असतानाही घरामध्ये ‘ऑस्ट्रेलियन लव बर्ड्स’च्या जोडीने गृहप्रवेश केला.

नव्या नवरीचे कौतुक जसे चार दिवस तसेच पक्षांचेही झाले. हळूहळू त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावरच आली. मला मात्र ‘काम कमी ‘म्हणून हे आणखी काळजी घेण्यासाठी मला आणलेले काम वाटले आणि मी ते अगदी काळजीपूर्वक पार पाडले. असाच एक वर्षाचा अवधी लोटला आणि कोरोना कालखंडास सुरुवात झाली आणि पुन्हा सर्वांचे लव बर्ड्स वरील प्रेम आणखीनच उभारून आले. घरी बसून मुलांना काहीतरी मनोरंजन हवेच की म्हणून आणखी लव बर्ड्स आणायचे ठरले. माझा मात्र विरोधच होता. कारण हे प्रेम किती दिवसाचे हे मला पक्के माहीत होते. यावेळी मात्र नियोजनबद्ध पक्षी आणायचे ठरवण्यात आले. मग काय गॅलरीला जाळी ठोकून त्यांच्यासाठी मोठे घरच बनवण्यात आले. “हौसेला मोल नसते” हे खरेच! पिंजऱ्यातील लव बर्ड्स चा प्रवेश मोठ्या घरात झाला. मग त्यांना सोबत म्हणून आणखी पक्षी आणण्यात आले. आता चार जोड्या झाल्या होत्या. ते आणले जरी जोडीने होते तरी जोड्या मात्र त्यांनी आपापल्या पसंतीनेच बनवल्या. खूप प्रेमळ पक्षी होते ते… एकमेकांना खाऊ घालायचे, एकत्रच बसायचे ,एकत्र झोपायचे..अगदी जवळ जवळ.

ज्या दुकानातून पक्षी आणले त्या दुकानात संख्येने खूप पक्षी होते ते. एकच पक्षी सगळ्यांना खाऊ घालायचा ..मजेशीर वाटले. नावाप्रमाणेच होते जणू ते. पण “दावणीचा गुण” म्हणतात ना ..असेच काही आपल्या घरात झाले. त्यांचे कौतुक म्हणून युट्युब पालथे घालण्यात आले. त्यांच्या सवयी ,आवडी निवडी,खाण्याच्या पद्धती ,खाण्याचे विविध पदार्थ ,त्यांना खेळण्यासाठी खेळण्या, मटके रंगवून त्यांच्या ब्रीडिंग ची व्यवस्था, नियमित वेगवेगळा आहार… एक ना अनेक जणू पीएचडीच केली त्यांच्यामध्ये. प्रत्येक पक्षाचे नामकरण करण्यात आले.राजा-बबली,बंटी-चांदणी, सुरजी- राणा,रोशनी-रानेश.अशी त्यांची नावे व जोड्या .त्यांच्या ब्रीडिंग साठी मटक्यावर पेंटिंग करून खिडकीत मटके बांधण्यात आले. हळूहळू जोड्यांचा त्यावर कब्जा सुरू झाला आणि भांडणास सुरुवात झाली. लव बर्डचे रूपांतर ‘अँग्री बर्ड्स’मध्ये झाले. मटके शिल्लक असतानाही एकाच मटक्यासाठी सगळ्यांची भांडणे. जी मादी बलवान ठरली तिला ते मटके मिळाले. पुन्हा दुसऱ्या मटका साठी भांडण. असे करत करत एकदाची मटकी फिक्स झाली. पण शत्रुत्व काही संपले नाही. तसे हे पक्षी फार प्रेमळ होते अगदी आपल्या हातावर येऊन धान्य खात,अंगा खांद्यावर बसत. जितके प्रेमळ तेवढेच हुशार आणि समजदारही होते. धान्य संपले तर, नर पक्षी अगदी बेडरूममध्ये येऊन चक्कर मारून खायला मागून जात . त्यांना आमची आणि आम्हाला त्यांची भाषा समजू लागली होती. नावाने बोलावले की त्यांना ते समजे.

अशा भांडणा भांडणात ब्रीडिंगची सुरुवात झाली होती. बबली नावाची मादी सगळ्या माद्यांची बॉस होती. तिच्या वाट्याला जाण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. सर्वप्रथम तिनेच अंडी घातली आणि नवीन पाहुण्यांचा घरात प्रवेश झाला. अर्थातच आमचे सर्व लक्ष त्या नव्या पाहुण्यांच्या कौतुकातच.. आता हे आधी आणलेल्या पक्षांना रुचेल तर ना? पिल्लांना घ्यायला गेले की ‘सुरजी’ नावाची मादी आमच्यावर आक्रमण करू लागली कधी डोक्यावर बसून केस ओढ ,कधी हाताचा चावा घे, एकदा तर डोळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. अरे बापरे! हे कसले लव बर्ड्स? पण ती अशी का वागतेय हे आमच्या लक्षात आले. मग तिच्याकडेही लक्ष दिले की ती शांत होई. हळूहळू सर्वच मटकी पिल्लांनी भरून गेली आणि घराचे गोकुळ झाले.

खाणे जास्त झाले की काय कुणास ठाऊक?(कारण दुकानात अगदी वेळेलाच फक्त खायला ठेवत ,आम्ही कायमच खायला ठेवलेले असे.) माद्या माद्यांमध्ये जोरदार भांडणे होऊ लागली. भांडणात डोके फोड ,पायाची बोटे तोड, चक्कर येऊन पडेपर्यंत भांडणे.. अगदी रक्तबंबाळ होऊन जात असत. भांडणाऱ्या माद्यांपैकी एक मादी जर पिंजऱ्यात कोंडली तर दुसरी वरून आणि ती पिंजऱ्याच्या आतून अशी भांडणे सुरू होत. त्यांचे भांडण सोडवण्याचे काम मात्र निरंतर चालू होते. ते रक्त आणि तो युद्धसंग्राम पाहून त्यांची किव करावी की रागाने मारावे हे मला समजेना. कोणत्याही हालतीत त्या भांडणे विसरायला तयार नव्हत्या. एकमेकींच्या मटक्यात जाऊन अंडे फोडून येत. काय करावे हा माझ्यासमोर मोठा यक्ष प्रश्न होता. मी त्यांच्या भांडणासमोर जणू हातच टेकले होते.

एक दिवस मात्र मी सर्व पक्षी पिंजऱ्यात भरले आणि जिथून आणले होते, त्याच ठिकाणी नेऊन सोडले आणि सुटकेचा श्वास घेतला. तशा त्यांच्या गोड स्मृती आजही मनात तशाच आहेत .बऱ्याच वेळा त्यांच्या आठवणीत मन रेंगाळते. आज ते पक्षी नाहीत तरीही त्यांचे फोटो, आठवणी आहेत आणि त्यांच्यासाठी बांधलेली मटकी आजही तशीच आहेत जणू त्यांच्या परतण्याची वाट पाहत…..!

शर्मिला देशमुख -घुमरे
ता. केज जि.बीड
=====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे