‘धनी’ कामगाराच्या आयुष्याचा लेखाजोखा
संजय मुकुंदराव निकम लेखक, परीक्षक, समीक्षक गायत्री नगर कॅम्प मालेगांव, जि. नाशिक

‘धनी’ कामगाराच्या आयुष्याचा लेखाजोखा
पुस्तक (काव्यसंग्रह) परीक्षण
‘धनी’ हा काव्यसंग्रह कामगार जगताचे चित्रण करणारा एकविसाव्या शतकातील नव्या दमाच्या नव्या आशा आकाक्षांचा वेध घेणारा काव्यसंग्रह आहे. कवी रवींद्र भोसले हे आशावादी सकारात्मक विचारांचे कवी आहे. ‘धनी’ ही कविता गृहिणीचे भावविश्वाचे दर्शन घडविणारी आहे.
‘आठवड्याच्या सुट्टीला मी
वाट पाहते धन्याची ग.
एसटीचा वकृत झाल्यावर
जीव व्याकूळ होतो ग’
तसेच
‘माझ्या या पतीला
नोकरीत बळ मिळेल ग.
सार्या दुनियेमध्ये पतीला
कीर्तीचं बळ मिळेल ग’
आपल्या पतीचे सुख-दु:ख हे तिचे सुख-दु:ख असते. तिचे हे भावविश्व या कवितेतून प्रत्ययास येते. ‘विषमता’ ही स्त्री भ्रूण हत्येवरील कविता समाजाचे प्रबोधन करणारी आहे. मुलींशिवाय हा संसार अपूर्ण आहे. हे ही कविता सांगते. मुलींना गर्भात मारणे म्हणजे, समाजात स्वैराचार निर्माण करणे होय. ‘शेती’ या कवितेत कवी रवींद्र भोसले म्हणतात,
देशाला आधार देणारी, शेतकर्यांची शेती असते.
निसर्गाने दिला धोका तर, सरकारने सावरायची असते’.
आपला देश कृषी प्रधान असल्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शेती करणार्या शेतकर्यांवर नैसर्गिक आपत्ती दुष्काळाचे संकट आल्यावर सरकारने त्यांना मदत करुन उभे करावे असे कवी म्हणतात. ‘संसार’ या कवितेत कवी म्हणतात की, संसाराच्या ओझ्याखाली माय लेकरु दडपलेल. भडकती महागाई तरीही चिमुकल्यांचं निरागस हास्य नियतीने दिले ते आनंदाने झेललं. महागाईच्या या वणव्यात संसार आम्ही मांडल’ असा संसार करतांना संघर्ष करावा लागतो. ‘कामगार नेते’ या कवितेत कवी सांगतात की, ‘कोणत्या शब्दात सांगू तुम्ही आमच्यासाठी काय आहात. पिचलेल्या कामगारांची पहिली हाक आहात’. कामगार नेते हे कामगारांसाठी लढत असतात. त्यांच्यावरच कामगारांच अस्तित्व असतं. त्यासाठी कामगार नेते रस्त्यावरची लढाई लढत असतात. कामगारांचे हित जोपासत असतात.
‘त्रास’ ही कविता रोज कामगारांना होणारा त्रास, कुचंबना दर्शविते. ‘साहेबांची कटकट, जॉब वरची वटवट. पहिली पाळी, त्रास देते जास्त’ या कवितेच्या ओळी कामगारांना होणारा त्रास दर्शवितात. ‘आदर्श’ ही कविता जरा वेगळ्या धाटणीची आहे. यात ते म्हणतात, ‘महागाईने जनजीवन होरपळून निघाले तरी जनता गप्पच.. अन्याय करणारेच राजकारणी अधिकारी गावगुंड आदर्श वाटत असतात’ आजच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण कवीने अतिशय चपखल शब्दात केलेले आहे. माणुसकीची संवेदना किती प्रखर प्रकट होते. हे या कवितेवरुन वाचकास समजते. ‘जागतिक मंदी’ ही कविता कामगार विश्व कोलमडून गेल्यावर काय होते ते दर्शविते.
‘जागतिक मंदी संकट घेऊन आली
हाता तोंडाची नोकरी हिरावून घेऊन गेली’
जागतिक मंदीने कामगारांचे जीवन उध्वस्त केले. त्यांना देशोधडीला लावले. त्यांना आपल्या गावाकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कवी पुढे कवितेत म्हणतात
‘जागतिक मंदी कामगारास कंगाल करुन गेली.
गावाकडचा रस्ता दाखवून गेली.’ संघटना’ या कवितेत कामगारांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो हे कवीने सांगितले आहे. युनियन, ही कविता याच स्वरुपातील कविता आहे. ‘कधी कधी वाटतं’ ही रविंद्र भोसले यांची एकांतातील विरक्त व्यक्तीची कविता असल्याचा प्रत्यय ही कविता वाचतांना येतो.
‘कधी कधी वाटतं
या लोकांच्या कटकटीतून
या मंडळाच्या बैठकीतून
संघर्षमय राजकारणातून
यांच्यापासून दूर जाव’
असं कवीला वाटत आहे. तो विरक्त होतो. सर्वांपासून दूर जातो. निवांतपणे एकांतात रहातो. चिंतन, मनन करतो आणि कविता करत बसतो. हे या कवितेत कवीने रेखाटलेले चित्र वास्तवाला स्पर्श करणारे आहे. ‘चर्चा’ या कवितेत कवी म्हणतात,
‘चर्चेमध्ये अनेक विषय असतात.
काही चर्चा यशस्वी होतात.
काहींची नुसती चाल ढकल असते.
काहींमध्ये वाद होतात.
संघर्ष होतो. वणवा पेटतो.
मग नुसता वाद होतो.
वादांवर नुसती चर्चा’
कवींनी जे अनुभवले, सोसले ते कामगारांचे दु:ख वरील रचनेत मांडलेले दिसते. ‘सन्मान’ या कवितेत जे कामगारांसाठी राब राब राबतात, तेच भविष्यकाळात नेते होतात. तेच जपतात माणुसकी, वाढवितात आपुलकी’ जोडतात मने, हाच तर कामगारांचा मान सन्मान’ असे कवी या कवितेत सांगतात. ‘लाडले’ या कवितेत ते म्हणतात, आपण कामगार मध्यमंवर्गीय गरीब असल्याने एकमेकांच्या दु:खाची आपणास जाण असते. एकमेकांना साथ देऊन संसार फुलवायचा पुढे न्यायचा. समाजाने साथ दिली नाही तरी सत्य संयमाने पुढे जायचे असते हे कवी सांगतात. ‘संकट’ या कवितेत कवी रविंद्र भोसले म्हणतात, गरीब मुलीसंग लग्न संकट देऊन गेल’ घरच्या माणसांच्या नजरेतून उतरुन गेलो. गरीब मुलीसंग लग्न संकट देऊन गेले. वादळाविरुध्द सामोर जायच समजत गेल.’ या ओळी कवीच्या वास्तविक जीवनातील संघर्ष दर्शवितात. सतत वेगवेगळ्या संकटांना हा कामगार मोठ्या हिंमतीने सामोरा जातो. त्यावर मार्ग काढत पुढे वाटचाल करत राहतो. हे या कवितेवरुन वाचकाला समजते.
‘कामगार’ ही कविता कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी कविता आहे.. ‘बाजारपेठ खुली झाली तरी, कामगारावर अन्याय थांबला नाही., कामगार मालक संघर्ष कधी थांबला नाही. सरकार भांडवलदारांच्या पाठीशी कामगार तरीपण मोडणार नाही.’ या कवितेच्या ओळी कामगारांचे जीवन संघर्षाने भरलेले असल्याचेच सांगून जातात. वाचक अंतर्मुख होतो. विचार करु लागतो. ‘भांडण’ या कवितेत कवी रविंद्र भोसले म्हणतात, तुझ्या भांडणात माझ्या आयुष्याच चार वाटोळं झाल.’ कामगार नेते मालकाशी भांडतात. तसेच प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढतात. यात कामगार काम बंद झाल्याने देशोधडीला लागतो. हे या ओळी सांगतात. काही काळाने मला तुझ्या या भांडणाचे महत्व कळालं. मालक कामगारांच्या मागण्या या मान्य करत नसल्याने संघर्ष निर्माण होतो. काम बंद असल्याने मालक मग तडजोडीस तयार झाल्यावर कामगारांच्या मागण्या मान्य करतो. तेव्हा या भांडणाच महत्व कळतं. ते कामगारांच्या हिताचेच होते हे समजते.
कार्यकर्त्यची खंत’ ही कविता सांगते की, कामगारांनी प्रामाणिक कार्यकर्त्याला पाठिंबा दिला असता तर, कामगारांचा एक नवा इतिहास रचला गेला असता. असे कवी कवितेत सांगतो आहे. ‘संप’ ही कविता ही याच प्रकारची कामगारांच्या हक्काची कविता आहे. ‘सौदा’ या कवितेत नेते हे तिकीट मिळवण्यासाठी एखाद्या पक्षात प्रवेश करतात. तिकीट मिळालं नाही, तर पक्ष सोडतात. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना हे बंड नव्हे हक्क अस संगायचं असत. निवडून आल्यानंतर पुन्हा पक्ष प्रवेश करत सौदा करायचा असतो. असे कवी रविंद्र भोसले येथे सांगत आहे. ‘कष्ट’ या कवितेत कामगाराला आपण केलेल्या कामाचे महत्व समजत असते. त्यालाच या कष्टाचे मोल समजत असते. कष्ट म्हणजे काय असत हे कामगार झाल्यावरच कळत असे कवी म्हणतात. ‘संघटना’ ही कामगारांच्या ऐक्याचे प्रतिक असते. ती कामगारांच्या हितासाठी कार्यरत असते. कवी रविंद्र भोसले या कवितेत म्हणतात, ‘संघटना आली शिस्त आली बोनस मिळाला दिवाळी आनंदाने साजरी झाली’ या ओळी संघटनेच महत्व विशद करुन जातात. संघटना कामगारांची ताकद आहे. ‘रात्रपाळी’ या कवितेत कवी म्हणतो ‘रात्र पाळीच ओझं अंगावर घेऊनी कामगार कष्टाने घाईला येऊन करतोय आनंदाने काम’ हे कामगारांचं जिणं या कवितेतून मांडलं आहे.
रात्रपाळी संपताना चेहर्यावर हास्य फुलवतोय मशीन चालवता चालवता येणार्या कामगारांची वाट बघतोय’ या ओळी कामगारांच्या कष्टाचे महत्व विशद करणार्या आहेत. ‘कार्यकर्ता’ ही कविता नेत्यांचे काम करणार्या लोकांवर आधारीत आहे. तसेच कामगारांचे जे नेते असतात त्यांचे काम करणारे कार्यकर्ते कामगारच असतात हे या कवितेतून अधोरेखित होतं. ‘अपंगांचे जग’ ही कविता कवी रविंद्र भोसले यांची अतिशय संवेदनशील अशी कविता आहे. या कवितेत ते म्हणतात, ‘अपंगांचे जग म्हणजे हातपाय नसणे. बहिरेपण, आंधळेपण भरकटलेल्या वादळातही पेटत्या वाती प्रमाणे जळणं’ या वेदना या कवितेतून जाणवतात. अपंगाचे जग म्हणजे एकमेकांना सांभाळणं, माणसुकी जपता जपता सार्या समाजात किर्तीवंत होणं.’ माणसाने चांगले कर्म करणे आणि चांगुलपणाने वागणं हाच खरा धर्म आहे. हाच आदर्श देणारी ही कविता आहे. ‘टाळेबंदी’ ही रविंद्र भोसले या कवीची कविता ही कामगारांचे प्रश्न मांडणारी कविता आहे. प्रश्नांवरील उत्तर ही हीच कविता देते. ‘टाळेबंदी’ या कवितेत कवी म्हणतात, ‘टाळेबंदी म्हणजे टाळेबंदी असते. तुमचा आमचा घात असतो. कामगार आयुक्त संग चर्चा काामगार संघटनेबरोबर चर्चा असते.’ तसेच टाळेबंदी म्हणजे टाळेबंदी असते. चर्चेचे ते गुर्हाळ असते. कामगारांच्या मनात वर्ल्डकप असतो, मॅनेजमेंटच्या मनात फिक्सिंग असते.’ कामगारांच्या समस्या सोडविणे मालक व मॅनेजमेंटचे काम असते. ते टाळाटाळ करतात. त्यामुळे कारखान्यास टाळे लावले जाते. काम बंद ठेवले जाते. त्यात कामगारांचे हाल होतात. परंतु मालक लक्ष देत नाही. मॅनेजमेंटशी चर्चा होऊन मधला मार्ग काढून काम सुरु करावे लागते. हेही कविता सांगते.
निराशावादी माणसे’ ही कविता निराश आलेल्या माणसांवर लिहिली आहे. कवी निराशावादी माणसांना आपला मित्र समजतो. कारण दु:खी माणसाचे दु:ख हे दु:खी माणसे चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यांचे अनुभव त्यांच्या जवळ बसून समाजू शकतो. कवी म्हणतात, ‘निराशावादी माणसांना येते नेहमी माणसांचीच आठवण निराशावादी माणसे आहेत माझे मित्रच मित्र.’ ही माणुसकीची भावना या कवितेत आहे. ‘मन’ ही कविता वाचकाला वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते. माणसांचे मन कायकाय विचार करते. मनाची कल्पना ही कुठे भरारी घेते हे या कवितेत दिसते. एकदा वाटलं साहेब होऊन बघावं. मॅनेजरच्या खुर्चीवर बसावं. पण मन म्हटलं, साहेब झाल्यावर कामगार हित कोणी बघावं. ‘भागीदार’ या कवितेत कवी म्हणतात, कामगार हेच मालकाच्या सुख-दु:खात सामील होत असतात. कामगार हेच मालकाच्या व्यवसायात उद्योग धंद्ययात भागीदार असतात हे कवी सांगतो. ‘चांगभल’ ही कविता सांगते की, वार्याच्या प्रवाहाविरुध्द ठरवल जायचं. वार्याचा जोर बघून वाटले सोबत असाव कुणीतरी. हातामध्ये हात घेऊन केलेला संघर्ष करतो सर्वांचच चांगभल. ‘ओझ’ करार, संसार सोपा असता तर, कविता, संघर्ष, नोकरी, इर्षा, खेळ, साहेब, कु लूप आणि किल्ली, आशा उपकार, चेष्टा, नशीब, घरगडी, संदेश अंत, कशासाठी संप, दरारा या सार्याच कविता कामगारंच्या विविधांगी रुपाचे, परिस्थितीचे आणि सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडविणार्या आहेत. कामगारांचे सर्वांगीण सुख-दु:खाचे अनुभव वाचकास या कवितेतून वाचायला मिळतात. वाचकाला आपणही याचाच एक भाग आहोत याची अनुभूती येऊ लागते. तो या कवितांशी एकरुप होऊन जातो. आणि आपल्या जीवनाचा एक सर्वांगीण अनुभव त्याला यातून मिळतो. हेच या ‘धनी’ या काव्यसंग्रहाचे खरे गमक आहे.
संजय मुकुंदराव निकम
लेखक, परीक्षक, समीक्षक
गायत्री नगर कॅम्प
मालेगांव, जि. नाशिक



