नेटवर्क फार्माकोलॉजी विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे झाले आयोजन

नेटवर्क फार्माकोलॉजी विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे झाले आयोजन
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि २६ मार्च) दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर येथे “आयुर्वेद व काऊपॅथी- आधारित उत्पादनांच्या शास्त्रीय प्रमाणीकरणासाठी नेटवर्क फार्माकोलॉजीचा दृष्टिकोन” व या कार्यक्रमाची संकल्पना: “प्राचीन ज्ञान आणि आधुनिक आण्विक विज्ञान यांचा संगम” या संकल्पने अंतर्गत दि. २३ आणि २४ मार्च रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यशाळा सोसायटी ऑफ फार्माकॉग्नोसी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पारंपरिक आयुर्वेद आणि काऊपॅथी-आधारित ज्ञानपद्धतींचे आधुनिक मॉलिक्युलर आणि कम्प्युटेशनल साधनांशी एकत्रीकरण करून त्यांचे शास्त्रीय प्रमाणीकरण व औषध शोध प्रक्रियेत उपयोजन याबाबत जनजागृती करणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रदान करणे हा होता. कार्यशाळेचे मुख्य अतिथी डॉ. प्रकाश इटनकर, प्राध्यापक नागपूर विद्यापीठ येथील औषधनिर्माण शास्त्र विभाग यांनी आपल्या मार्गदर्शनात कॅन्सर, मधुमेह, दमा तसेच इतर दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनात काऊपॅथी- आधारित औषधांची उपचार क्षमता आणि उपयुक्तता अधोरेखित केली. त्यांनी उदयोन्मुख फार्मासिस्ट आणि संशोधकांना काऊपॅथीच्या शास्त्रीय प्रमाणीकरणासाठी आधुनिक संशोधन साधनांचा वापर करून संशोधन करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ञ वक्त्यांनी सहभाग नोंदविला.
प्रा. अमित कुडके, सहयोगी प्राध्यापक, डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर यांनी नेटवर्क फार्माकोलॉजीचा इतिहास, उपयोग, अलीकडील प्रगती आणि कार्यप्रवाह यावर अत्यंत माहितीपूर्ण व्याख्यान दिले. तसेच त्यांनी पबकेम, फार्ममॅपर, स्विस टार्गेट प्रेडिक्शन, एस.ई.ए.टार्गेट, युनिप्रोट, जीनकार्ड्स, स्ट्रिंग, साइटोस्केप आणि केईजीजी यांसारख्या विविध डेटाबेसेस व साधनांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. डॉ. महावीर घंटे, सहायक प्राध्यापक, गुरु घासिदास विश्वविद्यालय, बिलासपुर यांनी “औषध शोध प्रक्रियेमधील लक्ष्यांचे प्राधान्यक्रम निर्धारण” या विषयावर तज्ञ व्याख्यान देत औषध संशोधनाच्या प्रारंभिक टप्प्यात संभाव्य मॉलिक्युलर टार्गेट्सची निवड आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच डॉ. राहुल जावरकर, सहयोगी प्राध्यापक, डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती यांनी मॉलिक्युलर डॉकिंग या विषयावरील सैद्धांतिक संकल्पना आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. यामध्ये त्यांनी डिस्कव्हरी स्टुडिओ व्हिज्युअलायझर आणि पायमॉल यांसारख्या साधनांचा उपयोग करून मार्गदर्शन केले.
डॉ. अमोल वरोकर, सहयोगी प्राध्यापक, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर यांनी “नेटवर्क फार्माकोलॉजी दृष्टिकोनासह पंचगव्याचे रासायनिक वैशिष्ट्यीकरण” या विषयावर केस स्टडी सादर केली. या सादरीकरणातून पारंपरिक औषधी संयुगांचे आधुनिक विश्लेषणात्मक आणि कम्प्युटेशनल तंत्रांच्या साहाय्याने शास्त्रीय अन्वेषण कसे करता येते, हे स्पष्ट करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपाच्या प्रसंगी डॉ. उज्वला महाजन, प्राचार्य, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी यांनी सर्व मान्यवर संसाधन व्यक्ती तसेच सत्रांचे अध्यक्ष डॉ. दिनेश कवाडे आणि डॉ. गुलशन गुरुनानी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या प्राध्यापक वर्गातील डॉ. विद्या साबळे, डॉ. निलेश महाजन, डॉ. अमोल वरोकर, डॉ. रितेश फुले, डॉ. मोनाली दुमोरे, डॉ. देवेश्री नांदुरकर, डॉ. सुचित्रा मिश्रा, सचिन मेंढी, तसेच विद्यार्थी स्वयंसेवक कु.दीपाली नाकाडे आणि कु.आभा लिचाडे व संपूर्ण आयोजन समितीचे विशेष कौतुक केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि प्राध्यापकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध ठरली. आयुर्वेद आणि काऊपॅथी-आधारित उत्पादनांच्या शास्त्रीय प्रमाणीकरणासाठी नेटवर्क फार्माकोलॉजी या उदयोन्मुख आंतरशाखीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेने सर्वांना प्रेरित केले.



