आदिवासी महिला पत्रकाराच्या विनयभंगाचा आरोप; अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
पारशिवनी ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप; व्हॉईस ऑफ मीडियाची कठोर कारवाईची मागणी
आदिवासी महिला पत्रकाराच्या विनयभंगाचा आरोप; अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
पारशिवनी ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप; व्हॉईस ऑफ मीडियाची कठोर कारवाईची मागणी
नागपूर/हिंगणा: पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका आदिवासी महिला पत्रकारासोबत सुरक्षा रक्षकाने असभ्य वर्तन, शिवीगाळ, जातीय अपमान तसेच विनयभंग केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित सुरक्षा रक्षकाविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘पुढाकार न्यूज २४’च्या प्रतिनिधी तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सदस्या निर्मला श्रावण मरकाम, वय ३७ वर्षे, रा. ढवलापूर, ता. पारशिवनी, या २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते साडे ११ सुमारास उपचारासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात गेल्या होत्या. केस पेपर व ओपीडीची पावती काढून त्या रांगेत उभ्या असताना सुरक्षा रक्षक चंद्रभान उर्फ शेखर कोलते हा आपल्या ओळखीच्या व्यक्तींना रांगेतून पुढे जाऊ देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता संबंधित सुरक्षा रक्षकाने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ‘तुझे आयडी कार्ड दाखव, तुझ्यासारखे पत्रकार खूप पाहिले आहेत,’ असे म्हणत सुरक्षा रक्षकाने कागदपत्रे, ओपीडी पावती व मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच अपमानास्पद शब्दांचा वापर करून आदिवासी समाजाचा उल्लेख करत जातीय स्वरूपाची शिवीगाळ केल्याचा आणि अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला आहे.
या घटनेनंतर सुरक्षा रक्षकाने रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देता ११२ क्रमांकावर फोन करून ‘महिला रुग्ण धिंगाणा घालत आहे’, अशी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी महिला पत्रकाराला रुग्णालयातून आपल्या वाहनातून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास व अपमान सहन करावा लागल्याचे महिला पत्रकाराने म्हटले आहे.
या प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र अद्याप अपेक्षित कठोर कारवाई झालेली नसल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध व्हिडिओ व इतर पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच तक्रारीतील आरोपांची कायदेशीर तपासणी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, असभ्य वर्तन आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लागू होणाऱ्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, नागपूरचे पालकमंत्री, अनुसूचित जाती-जमाती आयोग, राज्य महिला आयोग तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांकडेही सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे महत्त्वाचे ठरणार असून, पोलिसांच्या चौकशीनंतरच घटनेबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



