श्री ग्रंथ गणेशाचा देखावा; अत्रे प्रशालेत गणेशोत्सव उत्साहात
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
श्री ग्रंथ गणेशाचा देखावा; अत्रे प्रशालेत गणेशोत्सव उत्साहात
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे, दि. 7 सप्टें. (प्रतिनिधी) सार्वजनिक गणेशोत्सव हे पुण्याचे वैशिष्ट्य असून संपूर्ण शहरात गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे. कलांची अधिष्ठाता असलेल्या गणपतीच्या या उत्सवात विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम सर्वत्र उत्साहाने सुरू असतात. असाच उत्साह रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी दाखवला असून प्रशालेच्या अत्रे वाचनकक्षात बुद्धीची देवता अशा प्रिय गणेशाचा देखावा आणि गणपती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात गणपती विषयक पुस्तके गणपतीच्या विविध भावमुद्रा असलेल्या मूर्तीं, छायाचित्र, गणपतीची माहिती सांगणारी विविध दैनिके व नियतकालिकां मधील मजकूराची कात्रणे, तसेच ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या वैयक्तिक संग्रहातील काही गणेश मूर्तींचाही समावेश प्रदर्शनात आहे.
आशा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मुलांनी ही गणेशासंबंधी माहितीचा कात्रण संग्रह केला आहे. या प्रदर्शनाची संकल्पना आणि संयोजन ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्री गणेशाच्या आरत्या, स्तोत्र, कविता व सुभाषितांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे यांच्यासह शाळेतल्या सर्व वर्ग शिक्षकांनी मुलांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
सार्वजनिक उत्सव व सण समारंभानिमित्त विद्यार्थ्यांमार्फत असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याची अत्रे प्रशालेची प्रथा असून विद्यार्थ्यांच्या भरभरून प्रतिसादात असे कार्यक्रम यशस्वी होतात, असे अत्रे प्रशालेच्या वतीने सांगण्यात आले.



