माझी आजी
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

माझी आजी
माझी आजी… पण आमच्यासाठी आई..! आम्ही तिला ‘आई’ म्हणायचो… पण ती होती आमची आजी. ज्या काळात स्त्री स्वतःसाठी काही मागत नव्हती,फक्त देत रहायची त्या काळाची ती निःशब्द प्रतिनिधी होती..! मी पाहिलेली आई म्हणजे शांत… खूप शांत…! संयमी, निर्विकार आणि मनात सागर भरलेला. तिने स्वतःचं मन कधी मांडलं असेल? असं मला आजही वाटत नाही. “स्वतःचं अस्तित्व विरघळून टाकणारी, घरासाठी, कुटुंबासाठी आणि लोकांसाठी जगणारी ती..! आज आपण थकतो, थांबतो, कधी म्हणतो, ‘आज कंटाळा आलाय, आज मी नाही काम करणार’! पण आईने कधी असं म्हटलं असेल का? तिला कधी इच्छा झाली असेल का? की मला फिरायला जायचंय…! मला ती साडी आवडली… मला ते दागिने हवे आहेत…!?,कधी बाहेर जेवली असेल? कधी स्वतःसाठी काही मागितलं असेल? आणि मनानं त्याचं उत्तर एकचं आलं..नाही..!
तिचं जगणं म्हणजे नि:शब्द त्यागाचं व्रतच. दिवाळी आली की, एका रात्रीत फराळ तयार. स्वयंपाकाला कधीही सुट्टी नाही… कधी कंटाळा पण नाही. तिच्या पती राजांना म्हणजे माझ्या आजोबांना गुरुवार,शनिवार सांग्रसंगीत स्वयंपाक लागायचा. सात-आठ माणसांचा स्वयंपाक न कंटाळा करता करायची ती..तरी ओठांवर कायम हसू.! आज आपण सुखसोयींनी जगतो, स्त्रीसक्षमीकरणाचा झेंडा उंचावतो… पण कधी-कधी वाटतं, “खरं स्वातंत्र्य त्या स्त्रियांकडेच होतं”. त्यांच्या कडे समाधान होतं प्रेम होतं.आनंद होत. निळ्या चोळीतील आमची आजी,आमच्यासाठी आईसमान तिची नणंद गीता आत्या, दोघी नणंद भावजयांचं खूप जमायचं.. दुसरी एक नणंद सीता आत्या..पण ती थोडी लांबचं.
नाती अशीच असतात. कधी घट्ट, कधी सैल, पण त्यातही सुसंवादाचा गंध कायम होता. माझे वडील घरात सर्वांत मोठे ज्यांना आम्ही दादा म्हणायचो.. आमची आजी सुद्धा त्यांना दादा म्हणायची पण अहो जाऊ बोलायची.. अ..हो-जा..हो. म्हणायची.. आणि सगळ्यांशी आदराने बोलणारी ती. माझ्यावर तिचा जीवच वेगळा.. गुपिते सांगायची, पण कुणाची कधी एक ही तक्रार केली नाही. बाबांच्या धाकात आयुष्य गेले. मग नणंद-दीरांच्या, नंतर मुलांच्या,शेवटी सुना-जावयांच्या. इतकं आयुष्य धाकाखाली गेलं, पण चेहऱ्यावर कधी कटुता नव्हती. ती देवतुल्य होती…! शांत, सुसंस्कृत, सहनशील, पण आतून लोखंडासारखी मजबूत. आजोबा मात्र सुशिक्षित, टापटीप. गणेशनगर सहकारी साखर कारखान्यातील अधिकारी.
लोक त्यांना “साहेब” म्हणायचे. इंग्रजी बोलता येत नव्हते. परंतु वाचता येत होतं आणि समजत मात्र सगळं होतं.ते रेडिओवर इंग्रजी बातम्या ऐकणारे, शिस्त आणि संस्कार यांचं प्रतीक. लहान जावई बी.ए. झाल्यावर त्यांचा आनंद किती गगनात मावेनासा झाला होता.! आणि मी ग्रॅज्युएट झाले तेव्हा मी त्यांना इंग्रजीत पत्र लिहून पाठवलं. त्यांची छाती अभिमानाने भरून आली होती. आजीसाठी आजोबा फक्त पतीच नव्हते, तर ते तिचे साहेबच होते. तिच्या बोलण्यात, वागण्यात, नजरेत आदर आणि मर्यादेत कमाल होती. त्या वेळच्या स्त्रिया… स्वतःचा आवाज न उंचावणाऱ्या, पण संपूर्ण घर परंपरा आणि संस्कारात ठेवणाऱ्या, सगळं शांतपणात सांभाळणाऱ्या..! आज आम्ही स्वतंत्र विचार बाळगणाऱ्या स्वतःसाठी जगायला शिकलेल्या आहेत. आणि त्यामागे ‘आई, आजी आणि त्यांच्या आधीच्या त्या निःशब्द स्त्रियांचा इतिहास आहे. माझी आजी आणि अशा तमाम आई आजी यांना सलाम.!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
========





