“प्रवासातील आनंदाची उधळण …पळत्या झाडांचे निरीक्षण”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“प्रवासातील आनंदाची उधळण …पळत्या झाडांचे निरीक्षण”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
किती विलोभनीय असते ना बालपण! निरागस, गोंडस, लोभस. लहानपणी कुठे गावाला जायचे म्हटले की कशी मज्जा यायची ना! जाणे तरी कुठे असायचे? वर्षातून एकदा दिवाळीसाठी मामाच्या गावी किंवा लग्न समारंभासाठी. कळत तर काही नव्हते, पण तो गावाला जाण्याचा आनंद स्वर्गवतच! वेळेच्या वेळेला बस असायच्या, मग एक तास आधी जाऊन वाट पाहणे आलेच. बसमध्ये बसल्यानंतर भावंडांशी भांडण करून खिडकीजवळ बसायचे. उद्देश एकच पळणारी झाडे पाहणे. बस पुढे जायची आणि झाडे मागे पळायची. अगदी रोडच्या जवळची झाडे वेगाने पळत तर लांबची गोल हळुवार पळत आहेत असा भास होई. केकतीला आलेले उंच उंच मनोरे ( फुलांचे ) पाहताना आणि ते पळताना पाहून अजाण मनाला कितीतरी प्रश्न पडत. झाडे का पळतात? आईने किती जरी समजावले बस पळते म्हणून तसे वाटते पण माझ्या बालमनाला ते कधी पटलेच नाही. हे झाड बघ, ते झाड बघ किती वेगाने पळतेय.. ते दूरचे हळुवार, पूर्ण प्रवासात फक्त झाडे पाहणे या व्यतिरिक्त काही आठवत नाही.
गुरुजींनी शिकवलेली झुकझुक आगीनगाडी कशी होती हे माहित नव्हते. कारण आमच्या परिसरात ती नव्हतीच. पण “पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया” हे वाक्य मात्र मला पूर्णपणे लागू पडायचे. खरं म्हणजे, आजही ती पळती झाडे मला जशीच्या तशी दिसतात. आता कधी जाणे झालेच (सहसा जाणे होतच नाही.) मामाच्या गावी तर ती झाडे मी आजही आवर्जून पाहते. अगदी बालभावनेने पण ती लहानपणीची मजा मात्र येत नाही.
आज राहुल दादांनी “पळती झाडे” हा विषय स्पर्धेसाठी दिला आणि पुन्हा पुन्हा ती झाडे नजरेसमोर पळू लागली. जणू बाल मनाला बालपण जगण्यासाठी डीवचू लागली. आज कर्तव्यावरून परतताना मुद्दामहून पळती झाडे नजरेत भरण्याचा प्रयत्न केला पण बालपणीची ती पळती झाडे त्यांची सर कुठे? समूहात आज दमून झोपण्याइतके बालमनाच्या शिलेदारांनी झाडांना पळवले. चला श्रावण सरीमध्ये छोटीशी सहल काढून घेऊ या आनंद पळती झाडे पाहण्याचा. मग काय? येताय ना ?
झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया…!
सर्व शिलेदारांना बालकाव्यलेखनासाठी भरभरून शुभेच्छा! थोडेसे बालकाव्याविषयी चिंतन करून लेखन करूया. मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतश: ऋण.. धन्यवाद!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/ मुख्यपरीक्षक/कवयित्री
©संकलक मराठीचे शिलेदार समूह



