हायकू अर्थविस्तार गर्भीतार्थ: गणेश पाटील
वृक्ष माझा सखा सोबती.!.....वृक्षसंपत्ती
हायकू अर्थविस्तार गर्भीतार्थ: गणेश पाटील
येता आपत्ती।
वृक्ष सखा सौबती।
वृक्ष संपत्ती।।
वृक्ष माझा सखा सोबती.!…..वृक्षसंपत्ती
‘हो! वृक्ष माणसाचा खरा मित्र आहे.वृक्ष हाच माणसाचा खरा सखा सोबती आहे.’ माणूस वृक्षाशिवाय जगूच शकत नाही.वृक्षच तर माणसाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू देतो.अगदी माणसाला अंतिम श्वासापर्यंत प्राणवायू वृक्षच देतो.जेव्हा प्राणवायू घेण्याची क्षमता माणसात नसते तेव्हा मृत्यू होतो.मात्र तरी पण मानवाला मृत्यूनंतरही वृक्षच साथ देतो. मृत्यूनंतर माणूस स्वत: जळत नाही तर माणसाच्या देह (पार्थीव शरीर) बरोबर वृक्षच जळत असतो.
खरचं किती वास्तव आहे ना? अखेर वृक्षच सोबतीला येतो.कुणीही सोबत येत नाही.कुटुंबीय आप्तेष्ट सगेसोयरे अंतिम अमरधाम पर्यंत पोहचवायला येतात.मात्र सोबतीला माणसाबरोबर वृक्षच जळतो.संत तुकारामांनी सांगितलेच आहे,’वृक्षवेली आम्हा सोयरी वनचरे।’
मानव प्राणी जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत वृक्षाच्या छत्रछायेतच जीवन जगतो.वृक्ष आॅक्सिजन अर्थातच प्राणवायू पूरवितो.वृक्ष फळं देतो. वृक्ष फुलं देतो.वृक्ष सूगंधही देतो.माणूस उन्हानं लाही लाही झाल्यावर शितल सावली वृक्षच देतो. आरोग्यासाठी औषधीही वृक्षच देतो.महत्वाचे म्हणजे हे सृष्टीचक्र नीट चालावे म्हणून जलचक्र ही तर वृक्षच फिरवतो.वृक्षांची थंडगार हवा लागली कि ढगांनाही धरतीवर पाऊस पाडण्याची जणू आज्ञाच मिळते नाही का?
अहो!एकप्रकारे वृक्षच आपणास जल अर्थात जीवन देतो.वृक्षाची मुळे खोल जमिनीत रूततात त्यामुळेच भूजल ही वाढण्यास मदत होते.शिवाय वृक्ष जमिनीला(भूमी)घट्ट पकडुन ठेवतो ज्यामुळे मृदेची धूप (अवनती/नाश) होत नाही.जी मृदा अर्थात सूपिक माती माणवास उदरनिर्वाहार्थ शेतीसाठी उपयुक्त ठरते ती वृक्षामुळेच!वृक्षामुळेच पर्यावरण शुध्द व प्रदूषणमुक्त होत असते. वृक्षामुळेच सूंदर रम्य निसर्ग लाभतो.आपली धरती माता(वसूंधरा पृथ्वी/धरा/अवनी) वृक्षामुळेच तर तर सुंदर हिरवी हिरवीगार दिसते. अहो! ,’वृक्ष म्हणजे धरतीमातेचा अलंकारच!’
माणसावर जेव्हा जेव्हा आपत्ती येते.संकटं येतात. दु:ख येतात. कष्ट येतात.ऐवढेच नव्हे मानवी जीवनात आनंद येतात.सुखं येतात.सण ऊत्सव येतात.तेव्हा तेव्हा वृक्षच सखा सोबती सारखा कामी येतो.जरा आपल्या जीवनात डोकावून बघा म्हणजे समजेल!
उन्हाळ्यात वृक्षाखाली गार छायेत बसावेसे वाटते.आपल्या दूचाकी तसेच चारचाकी गाड्या कितीही वातानुकूलित असल्या तरी एखाद्या वृक्षाच्या छायेत लावाव्याशा वाटतात कि नाही? जंगलात ,शेतात गेल्यावर वृक्षाखालीच बसून न्याहरी करावीशी वाटते कि नाही? भरदुपारी चालून चालून थकल्यावर एखाद्या झाडाखालीच विश्रांती घ्यावीशी वाटते.भूख लागल्यावर ,काही खावेसे वाटल्यावर,आजारपणात आपणास फळचं आठवतात. निरनिराळ्या फळांचा आस्वाद आपण वृक्षामुळेच तर घेतो. घरात गॅस संपला कि पारंपारिक चूल्हा आठवतो.मग! झाडाचचं सरपण कामी येते. हिवाळ्यात कुडकुडणारी थंडी वाजू लागली की रात्री अन् दिवसाही चौकाचौकात वृक्षाच्या डहाळ्यांची शेकोटी करून ऊब घेतो.संध्याकाळी गावात एखाद्या भल्या मोठ्या वृक्षाच्याच खाली पारावर चावडी चालते. गावातील ज्येष्टनागरीकांच्या गप्पा रंगतात त्या झाडाखाली पारावर!कडुनिंब, वड, पिंपळ, उंबर अशा विशाल झाडांखाली मुलं विविध खेळ खेळतात.वडाखाली सूरपारंब्यांचा आनंद घेतात.
आखाजीला तर सासूरवाशीनी महिला कडुनिंबाच्या,आंब्याच्या झाडाला झोका बांधून मोठ मोठी झोके खातात व गाणी गातात.मुलांना काऊचिऊच्या गोष्टी सांगतांना वृक्षच आठवतो. वृक्ष आहेत तरच चिमणी पाखरं आहेत.चांदोमामाचे गाणं म्हणतांना आपण मुलांना निंबोळीचे झाड दाखवितो (चांदोमामा…. निंबोळीच्या झाडामागे लपलास काय),सण- उत्सव ,मंगल कार्य असले कि आपणास प्रथम वृक्षच आठवतो. सुवासिनी महिला वटसावित्रीला वडाची मनोभावे पूजा करतात व फेर धरतात.आम्रवृक्षाची पानं,पानांचे तोरण,डहाळ्या,तसेच यज्ञविधीसाठी विविध वृक्षांच्या डहाळ्या ज्याला समिधा म्हणतात. व्रत पूजासाठी विविध वृक्षाची पानं,फुलं,फळं! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वृक्ष सोबतीला असतो. जेव्हा वृक्ष ताट मानेनं ऊभा असतो तेव्हा तो सावली, फळे, फुले, हवा,प्राणवायू तर देतोच मात्र वृक्ष जेव्हा कोलमडतो तेव्हा तो आपलं सर्वस्व देऊन जातो.
वृक्ष जीवंत असतांनाही आपल्या डोक्यावर छाया देतो व कोलमडल्यावरही आपणास ईमारतीच्या रूपात तोच तर निवारा देतो.माणसाला आजन्म नव्हे तर मृत्यूनंतरही उरुणपूरतो तो वृक्षच असतो.वृक्ष जळाल्यावरही कोळसा होऊन मानवाला शेगडीत कामाला येतो.विस्तव होऊन वृक्षच अन्न शिजवितो.वृक्ष किती परोपकारी असतो.मरणोत्तर जीवनाचेही सर्वस्व वृक्षच अर्पण करितो.
जागतिक तापमान वाढ, प्रदुषण, प्रजन्याचे घटते प्रमाण,घटती भूजल पातळी,जमिनीचा र्हास,उघडे बोडके डोंगर,अभयारण्याचा नाश,जंगली वन्य प्राणींचा शहर गावातील मानवी वस्तीतला असूरक्षित शिरकाव या सराव समस्या ,संकटं,दु:ख,आपत्ती माणसाच्या वाट्याला येऊ लागली आहे.कारण,अमाप प्रचंड वृक्षतोड!जंगलं नष्ट झाली.वृक्ष संपत्ती नामशेष होऊ पहाते आहे. रस्ते रूंदीकरण, नवीन हमरस्ते तयार करणे,नवीन उद्योग स्थापन करणे अशा विकासाच्या नावाखाली अमाप वृक्षांची कत्तल होते आहे.याचा परिणाम रस्ता परिसरातले तापमान वाढ आहे.प्रचंड तापमानामुळे वाहन चालकांना थकवा येणे , आरोग्यावर विपरित परिणाम,यामुळे वाहनावरिल नियंत्रण सूटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषण वाढले आहे.वृक्ष तापमान व ध्वनी प्रदूषण , वायुप्रदूषण नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून रस्त्याच्या दुतर्फा योग्य सुरक्षित अंतरावर वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. उघडे बोडके डोंगर वृक्ष लागवड करून हिरव्यागार वनराईनं बहरुन जाऊ द्या! वृक्ष आपल्या आयुष्याचे खरे साथीदार आहेत.वृक्ष हिच खरी संपत्ती आहे.वृक्ष असले तर जीवनात काहीच कमी पडणार नाही.
म्हणूनच सांगतो,
“वृक्ष लावा।वृक्ष वाढवा।वृक्ष वाचवा।”
“व्हा!वृक्षमित्र।वृक्ष संपत्ती जपा।वृक्ष जगवा।”
“सामर्थ्य वृक्षाचे जाण मानवा। येता आपत्ती।”
“वृक्ष माझा सखा सोबती!……वृक्ष संपत्ती।”
श्री गणेश नरोत्तम पाटील
(जी.एन. पाटील)
नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित
वल्लभ विद्यामंदीर पाडळदा बु।
ता: शहादा जि: नंदूरबार
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह





