Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

ऑरा.. ( व्यक्तिमत्व प्रभाव )

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे

0 5 9 4 1 4

ऑरा.. ( व्यक्तिमत्व प्रभाव )

व्यक्तिमत्त्वाभोवतीचं अदृश्य वलय म्हणजे ‘ऑरा’ होय. काही माणसं पहिल्यांदा भेटतात आणि त्यांच्याशी फारसं बोलणंही झालेलं नसतं तरी त्यांच्या उपस्थितीने मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. आपलाच समूह पहा..!! इथे काही व्यक्ती वसुधा फाउंडेशनशी छान जोडल्या गेलेल्या आहेत. आपण एकमेकांना जवळून पाहिलेलं सुद्धा नाही किंवा कधी भेटलेलो सुद्धा नाही परंतु आपल्या लेखन साहित्यामुळे आपण एकमेकांना ओळखायला लागलेला आहोत आणि रोजची तुमची जी लेखणी आहे ती बहरली समूहात खूप आनंद होतो आणि त्याला रिप्लाय देताना मनापासून हर्ष होतो. चुकून एखाद्या दिवशी माझ्याकडं झाले नाही तर मला ते आपण काहीतरी चुकलंय असे वाटते.

हेच आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत की, जे आपल्याला प्रेरित करतात. आपल्याला एकमेकांचा रंग माहिती नाही. दिसता कसे माहित नाही. परंतु आपण एकमेकांजवळ खेचले गेलेलो आहोत. का?? तर आपली आपुलकी वाढत चाललेले आहे या एका समूहामुळे साहित्यिक लेखणीमुळे मनःपूर्वक धन्यवाद आपल्याला! हाच तो ऑरा आपण जपला पाहिजे. म्हणजेच काय तर काही व्यक्तींच्या आसपास गेल्यावर नकळत आपल्याला सुरक्षित, आनंदी किंवा सकारात्मक वाटतं.

नेमकं हे काय असतं?

यालाच अनेकदा “ऑरा” (Aura) असं म्हटलं जातं. ऑरा म्हणजे केवळ चेहऱ्याचं सौंदर्य नाही आणि केवळ कपडे, पैसा किंवा पदामुळे निर्माण होणारी गोष्टही नाही. एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा, स्वभावाचा, बोलण्याचा, वागण्याचा आणि इतरांशी असलेल्या नात्यांचा एकत्रित प्रभाव तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जाणवू शकतो. काही व्यक्ती दालनात प्रवेश करतात आणि वातावरणातच चैतन्य निर्माण होतं. त्यांना काही विशेष करण्याची गरज नसते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, बोलण्यातला आत्मविश्वास आणि वागण्यातली आपुलकी हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण ठरतं.काय बरोबर ना.,!! तर काही व्यक्ती फार कमी बोलतात; पण त्यांचं मौनही प्रभावी असतं. त्यांच्यातील शांतपणा, संयम आणि स्थिरता समोरच्याला जाणवते.म्हणून ऑरा हा आवाजापेक्षा उपस्थितीचा प्रभाव आहे.असे मला तरी वाटते.

ऑरा कशामुळे निर्माण होतो ?

आपले विचार आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. सतत नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या वागण्यात अस्वस्थता दिसू शकते. त्याउलट सकारात्मक विचार, आत्मविश्वास, कृतज्ञता आणि इतरांबद्दलचा आदर व्यक्तिमत्त्वात वेगळीच प्रसन्नता आणतो. चेहऱ्यावरचे हास्य, डोळ्यांतील आत्मविश्वास, शब्दांतील नम्रता आणि कृतीतील प्रामाणिकपणा यांचा मिळून एक सुंदर प्रभाव निर्माण होतो. पण ‘ऑरा’ निर्माण करण्यासाठी सतत आनंदी असल्याचा आव आणण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख, संघर्ष आणि अपयश असते. तरी त्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची क्षमता आणि दुसऱ्यांशी माणुसकीने वागण्याची वृत्ती व्यक्तिमत्त्वाला वेगळे तेज देते.

सुंदर ऑरा म्हणजे काय?

सुंदर ऑरा म्हणजे प्रत्येकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न नव्हे. तर आपुलकी, माया, प्रेम जिव्हाळा या शब्दातून ओथंबून भरलेले विचार, वागणूक व नम्रता होय. अहंकारावर नम्रता विजय मिळवते. द्वेषापेक्षा प्रेम केल्याने माणुसकी जपली जाते. तक्रारीपेक्षा कृतज्ञता असले तर माणसं जवळ येतात. दिखाव्यापेक्षा प्रामाणिकपणा असावा म्हणजे चार लोकात आपण खुलून दिसतो.ज्याच्या उपस्थितीत दुसऱ्याला स्वतःबद्दल चांगले वाटते, त्या व्यक्तीचा ऑरा खऱ्या अर्थाने सुंदर असतो. कधी एखाद्या व्यक्तीला भेटून आपण म्हणतो, “काय माणूस आहे! किती सकारात्मक ऊर्जा आहे!” हीच त्या व्यक्तिमत्त्वाची ताकद असते. आपल्या ऑरासाठी सर्वात महत्त्वाचे आहे मन स्वच्छ ठेवणे. ‘शब्द हा विचाराचा पुत्र आहे’ हे लक्षात ठेवून कायम मुखातून येणारे शब्द हे कोणाच्या जिव्हारी लागणार नाही त्याचा विचार करून बोलावेत.

दुसऱ्याशी तुलना कमी करु नये. मनातला राग साठवू नये. जे आवडले नाही व्यक्तीतले ते समोरच्या व्यक्तीला ठामपणे सांगण्याची भूमिका ठेवावी. पण ते गोड शब्दात सांगावे की जेणेकरून त्याला राग येणार नाही. जेव्हा असे वाटेल की राग येणार आहे त्या व्यक्तीला, तेव्हा आपल्या स्वतःच्या कृतीतून ते त्याला दाखवून द्यावे. शक्य तिथे मदतीचा हात द्यावा. आपल्याचुका मान्य कराव्यात. माफ करा किंवा सॉरी बोलून रिकामे व्हावे. सॉरी म्हणाले तर कोणी लहान होत नाही. पण ह्या दोन शब्दांमध्ये अतोनात ताकद आहे. या दोन शब्दांमुळे प्रेमाची, जिव्हाळ्याची माणसं जपली जातात. कोणाचे मन दुखावले जात नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जे करत आहोत ते योग्य आहे हा विश्वास स्वतःवर ठेवावा. आणि सर्वात महत्त्वाचे स्वाभिमान बाळगा. कारण बनावट व्यक्तिमत्त्व कितीही सुंदर दिसले तरी त्याचा प्रभाव फार काळ टिकत नाही. खोटे हसणे, खोटे बोलणे हे जास्त दिवस टिकत नाही. खरा ऑरा हा बाह्य रूपाने तयार होत नाही, तो विचारांनी आणि आचरणाने घडतो.

शेवटी, प्रत्येक व्यक्तीभोवती काहीतरी अदृश्य प्रभाव असतो. तो प्रभाव प्रेमाचा असेल, सकारात्मकतेचा असेल किंवा तणावाचा असेल तो आपल्या वागण्यातून निर्माण होतो. म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती असे वलय निर्माण करूया की, आपण निघून गेल्यानंतरही लोकांच्या मनात आपली आपुलकी, प्रेम, जिव्हाळा,सकारात्मकता आणि माणुसकी राहावी. कारण खरा ऑरा तो नसतो जो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. खरा ऑरा तो असतो जो आपल्या सहवासातून दुसऱ्याच्या मनातही प्रकाश निर्माण करतो….. ज्ञानाचे दीप पेटवतो.

साठवू बुद्धिपात्रात ज्ञानबिंदू
यात प्रेम भावना जागवू
भारताचे भविष्य उत्तम बनवू
भारतीच शान जगात वाढवू..

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे