अलिबागमध्ये सर्वजातीय वधूवर केंद्र सुरू
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
एक सशक्त आगरी समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘आगरी समाज संस्था’ या एका गैर-राजकीय संघटनेची स्थापना समाजातील काही नोकरदार आणि व्यवसायिक लोकांनी एकत्र येऊन केली. अलिबागमध्ये उच्च दर्जाच्या आगरी समाज सभागृहाची निर्मिती आणि तरुणांना व्यवसाय आणि रोजगारासाठी जागरूक करून संधी उपलब्ध करून देणे ही प्रमुख उद्दिष्टे संस्थापकांनी ठेवली आहेत.
सामाजिक परिस्थितीची जाण ठेवून विविध अभिनव उपक्रम आगरी समाज संस्था राबवत असते. त्याच भावनेतून सर्व जातीय वधूवर केंद्र स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्य परिस्थितीत विवाह जमवणे अत्यंत कठीण काम होऊन बनले आहे. पूर्वी समाजातील लोक एकमेकांच्या परिवाराला जवळून ओळखायचे त्यामुळे एकमेकांच्या माहितीतून विवाह जमवला जायचा. परतू आता शिक्षणामुळे आणि नोकरीमुळे बाहेरच्या गावी रहावे लागत असल्याने एकमेकांच्या मुलांबद्दल माहिती कमी असते.
त्यामुळे एकमेकांच्या परिचयातून लग्न जमणे शक्य होत नाही. म्हणून वधू वर केंद्र ही काळाची गरज बनली आहे.
प्रत्येक समाजाच्या संघटना ह्या आपापल्या समाजाचे वधू वर केंद्र चालवतात. परतू समाजाची निकड ओळखून आगरी समाज संघटनेने सर्वजातीय वधूवर केंद्र गावदेवी मंदिर, रामनाथ – अलिबाग येथे दि. 13 एप्रिल 2025 रोजी सुरू केले. सदर केंद्र यापुढे दर रविवारी सायंकाळी 4 ते 6 वेळेत नियमितपणे सुरू राहील.
केंद्रामध्ये सर्व जातीच्या वेगवेगळ्या फाईल असतील तसेच आंतरजातीय लग्न करण्याची इच्छा असणाऱ्यांची सुद्धा वेगळी फाईल ठेवली जाईल. याशिवाय घटस्फोटीत, विधवा, विधूर यांची सुद्धा नोंदणी केली जाईल. एक वर्षांकरिता नवीन नाव नोंदणी करण्यासाठी रु 300 मात्र देणगीमूल्य संस्थेकडे जमा करावे लागेल. सामाजिक भान ठेवून पहिल्या महिन्यामध्ये नाव नोंदणी करणाऱ्या मुलींसाठी फक्त रु 100 मात्र देणगीमूल्य जमा करावे लागेल.
लग्न जमवणे हा एक व्यवसाय झाला आहे. अशावेळी आगरी समाज संस्थेतर्फे अत्यल्प देणगीमूल्य घेऊन वधूवर नोंदणी करत असल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक भावनेतून सुरू केलेला असा एकमेव उपक्रम आगरी समाज संस्थेने केल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.
सदर कार्यक्रमास अनेक विवाहोत्सुक वधू वर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि गावदेवीच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी रामनाथ ग्रामस्थ मंडळ आणि मंदिर कमिटीचे श्री शशिकांत गुरव यांनी आजपासून वधूवर केंद्र सुरू होत असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहखजिनदार श्री राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी मंचावर श्री शशिकांत गुरव, लक्ष्मण ठाकूर, शैलेश पालवणकर, सचिन गुरव, कुमार पालवणकर, सुशांत गुरव, संघटनेचे सल्लागार श्री अनंत म्हात्रे, अमरनाथ जुईकर आणि उपाध्यक्ष श्री सुनिल तांबडकर, तसेच अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री तुषार थळे इ मान्यवर उपस्थित होते.
आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या विविध उपक्रमांची आणि भावी वाटचालीची माहिती, तसेच सदर वधूवर केंद्राचे काम कसे चालेल याची माहिती दिली. याशिवाय श्री अमरनाथ जुईकर, अविनाश सुतार, वीरेंद्र पवार, अजय म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यामध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री मनोहर पाटील यांनी विशेष कष्ट घेतले. यावेळी मोरया कॉम्प्युटर्सचे श्री मिलिंद पाटील, सौ दिपश्री पाटील, जयश्री म्हात्रे, माधवी पवार, पराग गुरव, आदित्य जुईकर यांनी इतर व्यवस्था पाहिली.
सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि मंडळाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार श्री राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले तसेच रामनाथ ग्रामस्थ मंडळ आणि मंदिर कमिटीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण कार्यकारी मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय संस्थेचा शालेय पुस्तक उपक्रम सुद्धा सुरू आहे. त्यामध्ये वापरलेली पुस्तके संस्थेकडे जमा करून घेतली जातील तसेच विद्यार्थ्यांना पाहिजे असलेली पुस्तके विनामूल्य देण्यात येतील. सदर उपक्रमाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आणि उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी 9527308133 या नंबर वर संपर्क अथवा व्हॉट्स अँप द्वारे संपर्क करावा असे आवाहन कार्यकारी मंडळाने केले आहे.



