Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

सुखाचा शोध… की समाधानाचा मार्ग?

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर

0 5 4 7 2 3

सुखाचा शोध… की समाधानाचा मार्ग?

“सुख पाहता जवा पाढे, दुःख पर्वताएवढे” संतांचे हे वचन जीवनाचे सार सांगून जाते. माणसाच्या आयुष्यात सुख-दुःख ही एका नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी त्यांचे प्रमाण मात्र सारखे नसते. सुख क्षणभंगुर, तर दुःख जणू दीर्घकाळ सोबत करणारे अशी आपली भावना असते. पण खरोखरच असं आहे का? की आपल्या दृष्टिकोनातच काहीतरी कमी-जास्त आहे? आपलं आयुष्य जणू एक जरदारी वस्त्र. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. हे वस्त्र कधी ना कधी जीर्ण होणारच, याची जाणीव ठेवून जगलो, तरच समाधान लाभेल. कारण सुख हे बहुतेक वेळा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं, संपत्ती, सुविधा, मान-सन्मान. एखादी गोष्ट मनासारखी मिळाली की क्षणभर सुख लाभतं; पण ते टिकत नाही.

याउलट ‘समाधान ही अंतर्मनातून येणारी, शाश्वत भावना आहे साधेपणा, कृतज्ञता आणि मानसिक शांततेवर आधारलेली.’ संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी”, तर संत नामदेव सांगतात,
“दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे”. म्हणजेच सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण क्षणिक सुखाच्या मागे धावत राहतो. पण त्या धावपळीत आनंद हरवून बसतो. एक उदाहरण आठवतं. एक कुटुंब साध्या जीवनातही आनंदी होतं. नंतर पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं मिळालं; पण वेळेअभावी नात्यांपासून दूर गेलं आणि तिथेच सुख असूनही आनंद हरवला.

म्हणूनच ‘सुख आणि आनंद यांत फरक ओळखणं गरजेचं आहे.’ ‘सुख बाहेरून येतं, तर आनंद आतून उमलतो.’ प्रसिद्ध कवी गदिमांच्या कवितेतील एका पिल्लासारखं आपणही कधी कधी आपल्या शेपटामागे फिरत राहतो सुख बाहेर शोधत. पण ‘खरं सुख आपल्या जवळच असतं, आपल्या मनात, आपल्या दृष्टिकोनात.’ ‘अर्धा भरलेला प्याला पाहून एक जण आनंदी होतो, तर दुसरा त्याच्यातलं कमी पाहून दुःखी होतो.” म्हणजेच, ‘जसा दृष्टिकोन तसं सुख.’

मला वाटतं, सुख मोठ्या गोष्टीत नसतं; ते छोट्या क्षणांत दडलं असतं.. ‘कुटुंबाचा आधार, मायेचा स्पर्श, मित्रांची साथ, आणि कोणीतरी आपल्या आनंद-दुःखात सहभागी होणं…’ ‘काटेरी वाटेवर चालताना अचानक कोणीतरी गालिचा बनून साथ देणं, यालाच कदाचित सुख म्हणत असावं.’ आणि माझ्यासाठी? “मनातील शब्द कागदावर उमटतात, आणि तुम्ही ते वाचून मनापासून प्रतिसाद देता.”
यातच आजचं माझं सुख दडलं आहे.

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे