ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि.२७ फेब्रुवारी २०२६) जनता शिक्षण मंडळाच्या ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विधी महाविद्यालयातील तीन वर्षीय आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी मराठी भाषेच्या महतीवर प्रास्ताविक सादर केले, तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. नीलम म्हात्रे यांनी बहारदार काव्यवाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. याप्रसंगी प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी परीक्षक म्हणून मोलाची जबाबदारी पार पाडली.
मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी (देवनागरी) हस्ताक्षर स्पर्धेत’ कु. मनश्री पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सौ. सुरेखा बिर्जे आणि कु. शुभम जुईकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. त्यानंतर झालेल्या ‘बोला मराठीत’ या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संविधान, मूलभूत हक्क, मैत्री, हास्य, झोप आणि प्रेम यांसारख्या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. या स्पर्धेत
कु. कृष्णाली घरत हिने प्रथम,
श्री. रोहन खोत याने द्वितीय आणि सौ. नेहा पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
काव्यवाचन स्पर्धेमध्ये कु. जास्मिन देवळेकर या विद्यार्थिनीने आपल्या स्वरचित कवितेच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. याच वेळी ग्रंथालय सहाय्यक कु. श्वेता कावजी यांनी मराठी पुस्तकांचे छोटेखानी ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सर्व स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय समिती प्रमुख प्रा. सूरज पुरी यांनी प्रा. नीलम म्हात्रे आणि प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या सोहळ्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधि आर्य गौतम पाटील, विद्यार्थी समन्वयक आदित्य कांबळे, स्वरूप पाटील, सानिका घरत, कृष्णाली घरत, कुश चोपडा आणि आर्या पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विधी क्षेत्रात मराठीचा वापर वाढवणे आणि भाषेप्रती आदर निर्माण करणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.



