पाऊस कवीमनाचा: मराठी भावविश्वाचा ओला आरसा
संजय गरबड मराठे ठाणे

पाऊस कवीमनाचा: मराठी भावविश्वाचा ओला आरसा
पाऊस पडतो तेव्हा फक्त आभाळ रिकामे होत नसते, तर मराठी कवीचे काळीज कागदावर उभे स्रवत असते, अशी एक सुंदर जाणीव मराठी साहित्यात नेहमीच अधोरेखित झाली आहे. निसर्गाच्या चक्रातील ‘पावसाळा’ हा ऋतू विज्ञानासाठी केवळ जलचक्राचा एक भाग असेल; परंतु मराठी साहित्यासाठी आणि विशेषतः मराठी कवितेसाठी तो मानवी भावनांचा एक अथांग उत्सव आहे. मराठी संस्कृती ही मूळ कृषीकेंद्री आणि पर्यायाने पावसावर अवलंबून राहिलेली संस्कृती असल्याने, मराठी माणसाचे पावसाशी असलेले नाते केवळ भौतिक नसून ते अत्यंत तरल आणि आत्मिक आहे. पहिल्या पावसाच्या मृद्गंधापासून ते ढगांच्या गडगडाटापर्यंत, आणि शेतातल्या काळ्या आईच्या आनंदापासून ते मानवी मनाच्या विरहापर्यंत, मराठी कवितेने पावसाचे प्रत्येक रूप केवळ अनुभवले नाही, तर त्याचे ‘अक्षरायन’ केले आहे. मराठी कवितेत पाऊस हा केवळ एक ऋतू म्हणून नाही, तर मानवी मनाचा आरसा बनून वावरत आला आहे. पाऊस सगळ्यांसाठी सारखाच असतो, पण प्रत्येक माणूस आपापल्या मनाच्या पात्रात तो झेलत असतो, हेच याचे खरे गमक आहे.
मराठी कवितेत पावसाचा संदर्भ अगदी संतसाहित्यापासून ते आधुनिक नवकवितेपर्यंत आणि तिथून पुढे थेट शोषित – वंचित विश्वाच्या विद्रोहापर्यंत अतिशय प्रगल्भपणे विस्तारत गेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेत पाऊस हा एका विराट ताकदीसह आणि मानवी भावनांचा मेळ घालत प्रकट होतो. त्यांच्या ‘गर्जतो मेघ’ आणि ‘पाऊस’ यांसारख्या रचनांमधून निसर्गाचे रौद्र, भव्य रूप आणि माणसाच्या अंतर्मनातील भावलोल यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. कुसुमाग्रजांचा पाऊस केवळ सृष्टीला भिजवत नाही, तर तो मानवी मनातील क्रांतीला आणि प्रेमाला एकाच वेळी साद घालतो. निसर्गाला स्वतंत्र अस्तित्व देऊन त्याचे अत्यंत तरल मानवीकरण करण्याचे खरे श्रेय मात्र आधुनिक मराठी कवितेत बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना जाते. बालकवींनी पावसाकडे एका लहान मुलाच्या कुतूहलाने पाहिले. त्यांची ‘श्रावणमास’ ही कविता मराठी रोमँटिक निसर्गकवितेचा पाया मानली जाते. “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” या त्यांच्या ओळींमध्ये पाऊस हा सृष्टीला सोन्याचा साज चढवणारा, मानवी मनातील मरगळ झटकून तिथे आनंदाची पखरण करणारा एक जिवंत, चैतन्यमयी सखा वाटतो.
बालकवींच्या या आनंदाला पुढे ‘बा. भ. बोरकर’ यांनी गोव्याच्या मातीचा रसरशीतपणा आणि उत्सवप्रियता दिली. बोरकरांच्या जगात पाऊस पडताच सगळं काही अचानक जिवंत होतं. “सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं…” असे म्हणत अंगणातल्या बायका हसत बाहेर पडतात, ओल्या केसांत फुलं खोचतात आणि चिखलात पाय टेकून मुलं उड्या मारतात. बोरकरांचं मनच मुळात उत्सवप्रिय होतं, त्यामुळे त्यांच्या सरींना दु:खाची किनार नसते; उलट त्या आनंदाच्या घुंगरांनी नाद करतात. हा पाऊस निव्वळ आकाशातून पडत नाही, तो गावभर नाचत सुटतो आणि संपूर्ण सृष्टीला एका अलौकिक सोहळ्यात बदलून टाकतो. पुढे तोच पाऊस बोरकरांच्या रसरशीत चैतन्याकडून हळूच वळतो आणि मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत अधिक कोमल, अधिक ‘रेशमी’ होतो. “श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा…” म्हणताना पाडगावकरांच्या पावसात सरी धावत नाहीत, तर त्या दोन प्रेमी जीवांच्या कानात कुजबुजतात. इथे पाऊस म्हणजे दोन मनांच्या मधली शांत, गोड जवळीक ठरतो. ओल्या केसांवरून फिरणारा हात, छत्रीखाली खांदा खांद्याला लागणे आणि या धुंदीत संपूर्ण जग नकळत एक सुंदर गीत बनणे… हा पाडगावकरांच्या पावसाचा बाज आहे.
मराठीतील आधुनिक कवितेचे प्रणेते ‘बा. सी. मर्ढेकर’ यांच्याकडे आले की, पावसाचे रूप पुन्हा एकदा बदलते. मर्ढेकरांच्या पावसावर अनेक आशयघन रचना आहेत, जिथे पाऊस हा निव्वळ रोमँटिक न राहता मानवी अस्तित्वाचे, महानगरीय संवेदनेचे आणि जगण्याच्या व्याकुळतेचे प्रतीक बनतो. मर्ढेकरांच्या जगात पावसाचे थेंब मानवी मनाच्या तळाशी असलेल्या वैचारिक आणि भावनिक संघर्षाला कवेत घेतात. पण निसर्गाचा हाच पाऊस जेव्हा रात्रीच्या अंधारात बदलतो, आभाळ काळं पडतं, तेव्हा तो सुरेश भट यांच्या गझलेत एका तीव्र, आक्रंदणाऱ्या वेदनेचे रूप घेतो. “रात्र पावसात भिजली, तरी मन कोरडंच राहिलं…” या ओळींमधून बाहेर निसर्गात पाण्याचे साम्राज्य असताना, खिडकीवर पाणी धाव घेत असताना आणि रस्ते ओले, दिवे धूसर झालेले असताना, आतल्या मनात मात्र विरहाची ‘राख’ उरलेली दिसते.
भटांच्या कवितेतला हा पाऊस मनातल्या विरहाच्या जखमा धुवत नाही, तर त्यांना अजून खोल करतो. तिथे पडणारा प्रत्येक थेंब जणू काळजाला टोचत म्हणतो—”ती नाही…” भटांच्या पावसात भिजताना अंग ओलं होतं, पण हृदय मात्र विरहाच्या आगीत जळत राहतं. आणि शेवटी, जेव्हा विरहाची ही आग विझते, तेव्हा उरते एक संध्याछाया… शांत, धूसर आणि रिकामी. ही संध्याछाया म्हणजेच कवी ग्रेस यांच्या कवितेतला पाऊस. “पाऊस कधीचा पडतो, झाडांची हालती पाने…” या रचनेत ग्रेस यांच्या पावसात कसलाच गडगडाट नसतो, ना सुरेश भटांसारखा आक्रोश असतो. तिथे असते फक्त एक संततधार रिमझिम. जुन्या आठवणी अलगद डोळ्यांत येतात, मनात कुठेतरी संथ पाणी साचू लागतं, आणि माणसाला शब्दही बोलावेसे वाटत नाहीत. हा पाऊस माणसाला स्वतःच्याच आत डोकावायला लावणारा ‘एकांत’ आहे.
हा पाऊस जेव्हा स्त्री-मनाच्या आणि गृहिणीच्या नजरेतून पाहिला जातो, तेव्हा त्यात घरगुती ओढ आणि कौटुंबिक सुखाचे रंग भरले जातात. कवयित्री शांता शेळके यांची ‘आला पाऊस मातीच्या वासात गं’ ही कविता पावसाचे आगमन आणि मनाला होणारा अतीव आनंद टिपणारी अतिशय गोड व गेय रचना आहे. पहिल्या पावसाच्या सुवासाने प्रफुल्लीत होणारे स्त्री-मन शांताबाईंनी अत्यंत सुलभतेने टिपले आहे. कवी अनिल म्हणजेच आ. रा. देशपांडे यांच्या ‘बाई या पावसानं लावली झिमझिम’ या प्रसिद्ध कवितेत पावसाळी गावरान वातावरणाचे आणि अशा वातावरणात घरातील गृहिणीच्या मनात निर्माण होणाऱ्या संमिश्र भावनांचे, तिच्या घरगुती व्यापांचे आणि हळव्या मनःस्थितीचे सुरेख वर्णन आले आहे. शहरी किंवा वैचारिक पातळीवरून हा पाऊस जेव्हा लहान मुलांच्या निरागस जगात प्रवेश करतो, तेव्हा तो अतिशय मजेशीर आणि हवाहवासा वाटणारा खेळ बनतो. कवी गिरीश यांची ‘खुळा पाऊस’ ही कविता लहान मुलांच्या भावविश्वाला आणि त्यांच्या अल्लडपणाला स्पर्श करणारी एक अतिशय लोकप्रिय रचना आहे. लहानग्यांच्या नजरेतून पावसाचे लहरी आणि गमतीशीर वागणे कवी गिरीश यांनी या कवितेतून हुबेहूब मांडले आहे.
हा झाला पाऊस मानवी भावभावनांच्या वैयक्तिक पातळीवरचा; पण जेव्हा हा पाऊस ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा राहतो, तेव्हा त्याचे रूप सामाजिक, साधे आणि तितकेच वास्तववादी बनते. बहिणाबाई चौधरी यांच्या साध्या-सोप्या अहिराणी आणि ग्रामीण भाषेत पाऊस हा बळीराजाचा विधाता तर आहेच, पण सोबतीला तो घरगुती आनंदाचा सोहळाही आहे. त्यांच्या ‘येता पाऊस पाऊस’ या कवितेत पावसाचे आगमन आणि उसळणाऱ्या हंगामात घरात होणाऱ्या भजी-वड्यांसारख्या छोट्या-छोट्या आनंदाचे सुंदर वर्णन आढळते. रानकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. धो. महानोर यांच्या अनेक निसर्गकवितेत पावसाच्या विविध आणि विलोभनीय छटा पाहायला मिळतात. महानोरांच्या शब्दांत पाऊस आणि काळी माती याचे नाते स्त्री-पुरुषाच्या आदिम मीलनासारखे रानवेडे होते.
“नभ उतरू आले, चिंब थरथरले, श्रावण पाऊस, गाणे गात सुटले…” म्हणताना महानोरांनी मातीचा सुवास आणि हिरवेगार रान जिवंत केले. पुढे हीच परंपरा गीतकार विठ्ठल वाघ आपल्या समर्थ लेखणीने पुढे चालवतात. विठ्ठल वाघ यांची ‘पाऊस’ ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी पावसाला केवळ निसर्गाचा भाग न मानता, शेतकऱ्याचा “खरा सहोदर” म्हणजेच सख्खा भाऊ आणि मातीवर माया पसरवणारा “रेशमी हाताचा” सखा म्हटले आहे. “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, येतो पावसाळा, शेतकऱ्याच्या घरात मग, सुखाचा गलबला…” हा त्यांचा सूर गरिबीचे चटके विसरायला लावून बळीराजाच्या घरात भाकरीची नवी आशा घेऊन येतो.
परंतु, हा पाऊस जेव्हा येतच नाही, जेव्हा तो गावाकडे पाठ फिरवतो, तेव्हा कवितेचा हा सुखाचा गलबला एका भीषण आक्रोशात आणि कारुण्यात बदलतो. कवी यशवंत मनोहर यांच्या ‘कालचा पाऊस’ या कवितेपाशी आले की, पावसाचे हेच ना येणे कोरड्या दुष्काळाचे जीवघेणे महाकाव्य बनते. यशवंत मनोहर लिहितात, “कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे.” या ओळींमधून कोसळणारे कारुण्य डोळ्यांत पाणी आणते. आभाळ कोरडे राहिल्याने जेव्हा “झाडे करपली, माथी हरपली” अशी अवस्था होते, तेव्हा गावाकडचे जगणेच उद्ध्वस्त होते. पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडणेही सोडून दिले आहे, कारण आता आशेचा किरण उरलेला नाही. नदीच्या काठाने पाण्यासाठी नाही तर ‘मरण’ शोधत फिरणारा आणि आयुष्याच्या काठाने थेट ‘सरण’ (चिता) नेसून भिरभिरणारा शेतकरी जेव्हा या कवितेत उभा राहतो, तेव्हा पावसाचे ‘न येणे’ हे थेट मृत्यूचे आमंत्रण ठरते. मनोहर यांच्या कवितेतला हा पाऊस निसर्गाचा लहरीपणा नाही, तर तो व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाच्या नशिबाचा क्रूर पोरखेळ मांडणारा ठरतो.
थोडक्यात सांगायचे तर, मराठी कवितेतील पाऊस हा केवळ आकाशातून पडणारे पाण्याचे थेंब नसून ते मानवी संवेदनांचे अथांग संचित आहे. शहरातल्या सिमेंटच्या जंगलात खिडकीतून दिसणारा पाऊस, प्रियकराच्या छत्रीत भिजणारा पाऊस, विरहाने होरपळणारा पाऊस, लहान मुलांचा खुळा पाऊस, गृहिणीची झिमझिम आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर पडणारा पाऊस जेवढा खरा आहे; तेवढाच ‘आमच्या गावात आलाच नाही’ म्हणून आसवांवर पीक काढायला लावणारा यशवंत मनोहरांचा कोरडा पाऊसही तितकाच विदारक आणि वास्तव आहे. आभाळातून पडणारे पाणी किंवा त्याचे न पडणे सर्वांवर सारखेच परिणाम करत नाही. ज्याचे मन आणि जगणे जसे असते, तसाच तो पाऊस त्याला आपल्या कवितेत झेलता येतो. जोपर्यंत माणसाच्या मनात भावनांचे ढग जमा होत राहतील आणि जोपर्यंत धरित्रीवर मातीचा सुगंध किंवा तिचा कोरडेपणा कवीला अस्वस्थ करत राहील, तोपर्यंत मराठी कविता या पावसाच्या अनंत आणि टोकाच्या रूपांचे महाकाव्य अशीच अव्याहतपणे लिहीत राईल.
संजय गरबड मराठे
उल्हासनगर, जिल्हा ठाणे
=============



