जे. एस. एम. महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि २७) ‘माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गलोकाहून थोर मला हिचा अभिमान’…असे अभिमानाने सांगून आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना अभिमानाची भावना देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन-अर्थात मराठी राजभाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील ‘मराठी वाङमय व भाषा अभ्यास मंडळा’तर्फे या निमित्ताने जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील व मराठी विभागप्रमुख डॉ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हस्ताक्षर स्पर्धा, बोला मराठीत, मराठी साहित्य व लेखक यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील एकूण १५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात यानिमित्त शैक्षणिक तसेच कथा, कादंबरी, चरित्र, नाटक, कविता अशा वाचन साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातील स्मार्ट क्लासरूममध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मराठी अभिमान गीताने झाली. प्रा. जयेश म्हात्रे यांनी ‘मराठी भाषा आणि तिचे भवितव्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मराठी विभागातील बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा, साहित्य व ज्ञानपीठ पुरस्कार यावर आधारीत ध्वनीचित्रफीत यावेळी प्रदर्शित करण्यात आली. प्रा. सुरभी वाणी, प्रा. हर्षला महाजन तसेच कु. संयोगी नाईक, कु. श्रेया अधिकारी यांनी सर्व स्पर्धा, उपक्रम व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.



