“नयनमनोहर कृत्रिम बेट, नैसर्गिक मनःशांतीची अनुपम भेट”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू' काव्यस्पर्धेचे परीक्षण

“नयनमनोहर कृत्रिम बेट, नैसर्गिक मनःशांतीची अनुपम भेट”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू’ काव्यस्पर्धेचे परीक्षण
कल्पना ही एक अशी शक्ती आहे की, जिच्या जोरावर माणूस वाळूत किल्ला बांधू शकतो, हवेत रंगमहाल बांधू शकतो, किंवा पाण्यात बंगला उभारू शकतो. कल्पनेपलिकडची कल्पना हीच तर कल्पनेची अद्भूत अदाकारी असते. एखादा सिद्धहस्त कवी असो की चित्रकार जो तो आपापल्या दुनियेतला जादूगार असतो. कवी, लेखक रसिकांना शब्दाने मंत्रमुग्ध करू शकतो तसाच एखादा चित्रकार आपल्या कुंचल्याने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडू शकतो. म्हणून तर हा एक जादूई अविष्कार वाटतो. जगाच्या पाठीवर जशा कांही मानव निर्मित कृत्रिम कलाकृती आहेत तशाच कांही निसर्ग निर्मित कलाकृती सुद्धा आहेत. ज्या सामान्य बुद्धीमत्तेला कोडे वाटावेत अशा. निसर्ग जितका अद्वितीय महान कलाकार आहे तशाच अविश्वसनीय कलाकारीचे दान मानवाला सुद्धा मिळालेले असते. कुठे वैयक्तिक असते तर कुठे सामुदायिक असते इतकेच.
काल ‘शुक्रवारीय हायकू’ काव्य स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र पाहता अशाच कल्पनाशक्तीचे दर्शन घडते. या कृष्णधवल चित्रात अतिशय शांत, प्रसन्न निसर्गरम्य वातावरणाचे दर्शन होते. एखाद्या सरोवरातील संथ पाण्यावर तरंगणारे हे एक अतिशय सुंदर उद्यान दिसते आहे. जे मनाला एक आगळीवेगळी शांती प्रसन्नता प्रदान करते. पाण्यावर तरंगता पूल. आखीव रेखीव फुलांची कमान, आजूबाजूला हिरवीगार झाडे झुडपे, आणि मध्यभागी एक छानसा मंडप. हे सर्व दृश्य निसर्गाशी जवळीक साधणारे असून. जीवनप्रवासाचे प्रतिकच म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही. हे एक कृत्रिम बेट म्हणजे अथांग अमर्याद जीवनसागरात तरंगणारा एक छोटासा मनप्रसन्न विसावाच भासतो. जिथे थकल्या भागल्या जीवाला क्षणभर विरंगुळा लाभावा, निखळ निर्मळ आनंद मिळावा असे एक प्रफुल्लित स्थान वाटते.
अशा चित्रावर हायकू निर्मिती करणे आहे. विशेषतः जपानी हायकूकारांच्या मते निसर्ग चित्र हा हायकू काव्य रचनेचा मुख्य विषय असतो. ज्यावर अतिशय परिणामकारक हायकू काव्य निर्मिती होवू शकते. ज्यातून अनेक पैलूंचे दर्शन सतरा अक्षरात घडवता येते. आणि येथेच हायकूकार कवीच्या कल्पनाशक्तीचा खरा कस लागतो. चित्राचे बारकाईने निरीक्षण करून नेमका क्षण अधोरेखित करणे हेच खरे आव्हान असते.
‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आ. राहुल दादा नेहमीच सर्वच काव्यप्रकारासाठी अत्यंत कल्पक विषय देत असतात. ज्यातून आपल्याला एक सामाजिक, वैश्विक, नैसर्गिक संदेश देता येऊ शकतो. आपल्या काव्य कलेने नेमके हेच आव्हान स्वीकारले पाहिजे आणि तशीच काव्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ मनोरंजन हा उद्देश नसून प्रबोधनाचा मुख्य हेतू साधला जावा. वाचकांना अंतर्मुख करता यायला हवे. इतके सकस लेखन आपल्या हातून व्हावे हीच अपेक्षा असते.
जाता जाता इतकेच म्हणेन की, आजकाल समूहात दैनंदिन लेखनात किंचित उदासिनता जाणवते. असे न होता आपल्या सर्वासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, त्याचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यावा आणि सातत्यपूर्ण लेखन करून या समूहाच्या माध्यमातून मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध करण्यात आपले उच्च योगदान देण्यास कटिबद्ध असावे. आज मला हायकू परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कविवर्य/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



