
संवाद
आजच्या काळात परस्परातील संवाद कमी होत चालला आहे हे सत्य आहे. घराघरात विचारांचे आदान प्रदान कमी झालेले आहे. जग जवळ आले, पण माणूस माणसापासून दूर जात आहे, हे आजचे कटू सत्य आहे. विविध यांत्रिक उपकरणांची भरमार झाली आहे. त्यासोबतच मानवाची मनेही यंत्रवत झाली आहेत. याला कारण आपण भ्रमणध्वनी आणि दूरदर्शनला जबाबदार धरतो. ते तर जबाबदार आहेतच, पण यासोबतच मानवामध्ये असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार देखील कारणीभूत आहेत.
भ्रमणध्वनी आजच्या काळाची गरज आहे. पण तो गरजेपुरता वापरला जात नाही. त्यात असणारे वेगवेगळे कार्यक्रम मग ते कोणत्या दर्जाचे आहेत, याचा विचार न करता अतिशय आनंदाने बहुतेक मनोरंजन म्हणून पाहतात. मग ते पाहत असताना कुणी हाक मारली, कुणी बोलावले काहीही त्यांना ऐकू येत नाही. कारण त्यांना बाह्य जगाची गरजच उरलेली नाही. काही ठिकाणी तर घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे भ्रमणध्वनी आहेत आणि ते त्यात इतके गर्क असतात, की जवळपास त्यांच्यातील संवाद न च्या बरोबर असतो. दूरदर्शनची गोष्ट याहून वेगळी नाही. क्रिकेटचा सामना असताना तर भूक तहान विसरून ते त्यात गर्क असतात. अर्थात भ्रमणध्वनी आणि दूरदर्शन ही उपयोगी उपकरणे आहेत. त्याचा योग्य आणि अचूक वापर कसा करावा हे खरेतर प्रत्येकानी समजून घेतले पाहिजे. अतिशय संवेदनशील ही उपकरणे आहेत. पालकांना जागृत राहून आपली पाल्ये काय पाहतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. पालक व मुले यांच्यातील संवाद कमी होऊ नये, यासाठी पालकांनी दररोज एक ते दोन तास मुलांसोबत घालवले पाहिजेत. त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टीपासून मुलांना परावृत्त केले पाहिजे.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मानवाचे षड्रिपू आहेत. आजच्या काळात हे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यावर विजय मिळवणे ही सोपी गोष्ट नाही, पण प्रयत्नाने काही अंशी नियंत्रण मिळवू शकतो. आपण सामान्य लोकं. वाईट गोष्टीचा राग येणारचं. संपत्तीचा लोभ राहणारच. पण आपल्या पूर्वजांपेक्षा आपल्यात हे विकार जास्त बळावत चालले आहेत. मने संकुचित झालेली आहेत. आई वडिलांविषयी केवळ संपत्तीपुरते प्रेम उरले आहे. बरेच जण आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. अर्थात सर्वच तसे असतात असे नाही. एकमताने एकत्र खेळणा-या बहिण भावामध्ये लग्नानंतर दुरावा दिसून येतो. खूप संपत्ती असूनही आईवडीलांनी मुलींना थोडाही भाग दिल्याचे आवडत नाही. हे सर्व विकारांनी निर्माण झालेले खेळ आहेत. समजुतदारपणापेक्षा हेवेदावे, मत्सर वाढलेले आहेत.
अशा शुल्लक गोष्टीतून दुरावा निर्माण होऊन आपसातील संवाद बंद झालेले आहेत. समाजात आजच्या घडीला अनेक बहिणींची दिवाळी होत नाही. बहिण भावाचं नातं इतकच मर्यादित आहे का? आपण सध्या मृत्यूलोकात जगतोय. एक दिवस प्रत्येकाला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. कोण जाणे, पुढचा जन्म मिळतो कि नाही, आणि मिळाला तर आपण कुणाला ओळखणार नाही. धन, संपत्ती, ऐश्वर्य, आप्त सर्व इथेच राहणार. कोणी सोबत येणार नाही. म्हणून मानव जन्म मिळाला तर करून घ्या सत्कर्म. बोला सर्वांशी मोकळे. ‘संवाद हा मन जाणण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे’. जास्तीत जास्त संवाद साधा. विचारांचे मंथन होऊ द्या. समस्या येतील नी जातील संवाद हाच त्यावर रामबाण उपाय आहे.
श्रीमती सुलोचना लडवे
ता. जि.अमरावती
========

