किल्ले तुंग किल्ला
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळते. उंचच उंच डोंगर, नजर उभी करणारे सह्याद्रीचे उत्तुंग उभे कडे, दऱ्यांखो-यातून वाहणारे पाणी, धबधबे, नद्या, वृक्षराजी अशा संपूर्ण वातावरणामुळे आपसूकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश पवन मावळ. या प्रांतात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत.
पूर्वीच्या काळी ‘बोरघाट’ या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे. हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यावरून पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, मोरगिरी पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील हा गिरीदुर्ग. या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. त्यासाठी आधी लोणावळा स्टेशन येथे पोहचून इतर वाहनाने घुसळखांब येथे जाता येते. येथून दीड तास चालत गेल्यावर तुंगवाडीत पोहचते.
सन १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. परंतु १२ जून १६६५ मध्ये पुरंदर तहानुसार हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. या किल्ल्याचा गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.
गडाच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे. ४०० मीटर चढाई केल्यानंतर एक प्राचीन प्रवेशद्वार दिसते. गोमुखी पद्धतीचे हे प्रवेशद्वार म्हणजे ‘गणेश दरवाजा’. गणेश दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर हनुमान दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळ हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते. तसेच दरवाजामध्ये सैनिकांच्या राहण्याची देवडी आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक छोटासा तलाव पाहायला मिळतो पूर्वीच्या काळी या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाई. प्रवेशद्वार ओलांडून किल्ल्याच्या आत आपल्याला एक गणेश मंदिर दिसते. मंदिराच्या मागच्या बाजूस खंदक पाहण्यास मिळतो. किल्ल्यामध्ये एक इमारत दिसते. ही इमारत म्हणजेच सदर. इतिहास काळात गुप्त खलबत ह्या इमारतीत होत असावी. बालेकिल्ल्यावरती तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर जमिनीत खोदलेली गुहा दिसते. या गुहेमध्ये पावसाळ्याशिवाय इतर ऋतू २-३ जणांची राहायची सोय होऊ शकते.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
==========



