महामानव : सुभाषचंद्र बोस
अनिता व्यवहारे

महामानव : सुभाषचंद्र बोस
होऊन फकीर ध्येय मंदिरात रंगला
ना जुमानिलें तुंग पर्वता नि जंगला
सैन्य ते आशेवर जगणारे, वाऱ्यावर तरंगणारे,
शांत ना कधी, श्रांत ना कधी
भारती आरती म्हणूनी गाऊ या चला
जय सुभाष मंत्र, दशदिशात निनादला
अखिल विश्वाचा पाठीवर थोर आपली भारतीय संस्कृती आणि भारत माता. भारत भूमी म्हणजे नवरत्नांची खाण’. अनेक शूरवीर, नरवीर या भूमीवर जन्माला आले. ब्रिटिशांच्या अंदाधुंद छळाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी जणू त्यांनी इथे जन्म घेतला असावा. आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने आदर्श नेता म्हणून आपले नाव भारताच्या नकाशात कोरले गेले. यापैकी एक थोर रत्न म्हणजे ‘सुभाष चंद्र बोस’. अनामिक महामानव तेच असतात; जे स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून मातृभूमी, देशासाठी स्वतःचे आयुष्य व्यतीत करतात.
जन्मोजन्म त्यांचा देशासाठी 23 जानेवारी 1897 रोजी काळोखाचा पडदा दूर करण्यासाठी तमाने त्याग करून तेजस्वी रवी किरणांची बरसात करत अरुणोदय केला. सगळीकडे मंगलमय वातावरण. काय होते या सृष्टीच्या मनात! कोणता आनंद घेऊन हा दिवस उगवला होता. तिकडे ‘जानकीनाथ बोस आणि प्रभावती देवी बोस’ यांच्या आयुष्यातही आल्हाददायक वातावरण होते. त्या दिवशी सकाळी एक मंगलमय क्षणी प्रभावती देवी यांच्या कुशीत ‘सुभाषबाबू’ नामक एका तेजस्वी सूर्य दीपाचा उदय झाला. जणू संपूर्ण तारे-तारकांनी पृथ्वीवर पुष्पवर्षाव केला. बोस यांच्या सुखवस्तू कुटुंबांमध्ये एकूण तेरा बहीण भावंडं असलेले सुभाषबाबू हे अपार बुद्धिमत्ता, प्रखर जिज्ञासा, अदम्य जीवन निष्ठा आणि धगधगीत वैराग्य यांचा अनोखा संगम असलेलं हे ‘पुष्प, सु -मन’ देशभक्तीने सुगंधित असलेलं. त्यामुळेच त्या काळी माती मधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमत असे गुणगान या प्रसंगी ‘सुभाषबाबू जन्मले भारत भूमी ही झाली भाग्यवान’.
‘इतिहासाच्या पानोपानी त्यांच्या बलिदानाने निनादले गानं’
लहानपणापासून देशभक्ती अंगी रुजलेली असल्यामुळे ते तेव्हापासून नेताजी झाले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व स्वीकारले. नेतृत्व कर्तृत्व कधी उसने मिळत नाही ते स्वतः हून स्वीकारावं लागतं, पण अशावेळी जोखीम पत्करावी लागते हे निश्चित. ‘जिंकलात तर नेतृत्व आणि हरलात तर मार्गदर्शन’! सुभाषबाबूंना बहुधा हे मान्य असाव..! त्यांना अन्याय, अवमान या गोष्टी कधीच आवडल्या नाहीत. तर लहान वयापासून त्यांनी याविरुद्ध बंड करायला सुरुवात केली. तल्लख बुद्धी असल्याने शिक्षणाची आवड. त्यामुळे त्यांनी आय सी एस परीक्षेत भरघोस यश मिळवले. त्या काळच्या अंदाधुंदपणे वागणाऱ्या ब्रिटिशांच्या आहारी जाणं त्यांना पटलं नाही. त्यांना त्यांच्या गुलामगिरीत राहणं रुचलं नाही. गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी
‘शांत ना कधी, ना कधी श्रांत’ म्हणत लढा द्यायला सुरुवात केली.
इन्सान इन्सान नही है जो हवा के साथ बदले
इंसान तो सिर्फ वो है जो हवा का रुख बदले||
आणि हेच करत सुभाषबाबूंनी राष्ट्रीय आंदोलन उभारले. त्यात स्वतःला झोकून दिले. ते नेहमी इतरांचा विचार करण्या आधी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहात. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की, ‘अंतरात्मा ही काही बाजारात मांडायची किंवा सौदा करण्याची वस्तू होऊ शकत नाही’. त्याग आणि कष्ट ही स्वराज्य संवादाची किंमत असते. त्यांच्या मनाच्या उद्यानात रोज नवनविन कल्पनांचे फुले उमलत, तर विचारांची कमळे फुलताना दिसून येत. असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व त्यांच्या ठायी होते म्हणूनच ‘दिव्यत्व आणि नेतृत्व’ या गुणांनी संपन्न असलेले हे व्यक्तिमत्व…!! त्यांनी आपल्या या अगाध ज्ञानाच्या बळावर रणशिंग फुंकले. आणि पायातील गुलामीच्या बेड्या तोडल्या. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” असं म्हणत लोकांना एकत्र करत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतः नेतृत्व करत ‘आझाद हिंद सेनेची’ स्थापना केली. म्हणूनच सूर्यासारखा तेजस्वी तारा या भारतभूमी वरचा तमाचा पडदा दूर करू शकला. आणि भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा, त्याच्या नावाचा जयघोष निनादला.
कदम कदम बढाये जा
खुशी के गीत गाये जा
ये जिंदगी है कौम की
तू कौम पे लुटाए जा
आणि हेच त्यांनी खरं करून दाखवलं. त्यामुळे ते पुढच्या पिढीला म्हणू शकले. ‘हम लाए हैं तुफां से कश्ती निकाल के..| इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के’.| जय हिंद! ‘सुभाषचंद्र बोस’ यांना विनम्र अभिवादन!!!
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
======





