सावित्रीच्या लेकी
कु.संगिता रामटेके/भोवते
सावित्रीच्या लेकी
तू माय अन् तूच आई
शिक्षणाचे पंख देणारी
माझी सावित्री माई,
त्याकाळातही तू धीराची
ज्योतिबांच्या साथीने
पेलली धुरा स्त्री शिक्षणाची
तुझेच तेज दिसते लेकीत
तुझे कष्ट तुझी अविरत यत्ने
चकाकती उच्च सिंहासनी, जणू रत्ने.
स्त्री आता, ‘रांधा वाढा उष्टी काढा’ या विचारसरणीतून बाहेर पडत आहे. नोकरी आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहे. ती पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहे म्हणून तिचा दर्जा वाढला का? नाही. अजूनही पुरूषप्रधान संस्कृतीच आहे आणि त्यास कारणीभूत स्त्रीच आहे. रात्री दारू पिऊन नवरा मारत असेल, धिंगाणा घालत असेल, तरी सकाळी तीच बाई उठून त्याला वाढते, सेवा करते. यावर अनेक जणींच मत असेल की, हेच आपले संस्कार आहेत. मग मार खाणं? उत्तर येईल -तिचे नशीब. सावित्रीमाईंनी शेणगोळे खाऊन आपल्याला शिकवलं ते अन्याय सहन करायला का? आणि तो वारंवार स्त्रिनेच का सहन करावा? असे प्रश्न येत नाही का? आले तरी ते अनुत्तरितच राहतात.
कालच आमच्या शाळेतील स्वयंपाकीन बाई सांगत होती की, नवीन दाखल पात्र मुलांमधील एका मुलाचे वडील खूप दारू पितात आणि धिंगाणा घालतात, मग त्यांची बायको त्यांना काठीने झोडपून काढते. मी म्हटलं, वा!काय हिम्मत आहे! परंतु आता नव्याने रुजू झालेली अविवाहित माझी सहकारी म्हणते,’ पण हे योग्य नाही ना?’ म्हणजे स्त्रीने स्वतःच, स्वतःचे हक्क पुरूषांच्या पायाशी गहाण ठेवायचे का?
सावित्रीमाय अजून एकदा जन्म घे गं माय! ह्या तुझ्या लेकी, तू आयतं कष्ट करून वाट तयार करून दे, आम्ही फक्त पुढे जाणार म्हणतात. भारतात १८ व्या शतकात अनेक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी, बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह बंदी, केशवपन, सतीप्रथा इत्यादी विरोधात चळवळी केल्या. महाराष्ट्रात या चळवळीत स्त्री हक्कासाठी महात्मा ज्योतिबा फुले, आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील पुरूषप्रधान संस्कृतीला आव्हान दिले. त्यांना समाजसुधारणा करण्यासाठी समाजाशी खूप मोठी झुंज द्यावी लागली.
यावेळेस सावित्रीबाईंची जयंती धुमधडाक्यात साजरी झाली. खूप ठिकाणी तर ‘मी सावित्री बोलतेय’ असा एकपात्री प्रयोग करण्यात आला. सावित्रीमाई सारखी वेशभूषा करून सावित्रीमाई बनण्यापेक्षा तिचे तत्व पाळणे जनसेवा करणे उच्च विद्याविभूषित होऊन दोन्ही घरची पणती बनणे आवश्यक आहे. अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची धमक अंगी बाणवली की सावित्री स्वतःच लेकीच्या कौतुकात आनंदी होईल. माझं झिजणं माझ्या लेकींना सोन्याची चकाकी देऊन गेलं म्हणून सुखावेल.आताच्या मुली नटणं मुरडणं आवडीने करतात.तरीही त्या समंजस आणि जबाबदार आहेत. परंतु सामाजिक कर्तव्ये पार पाडण्यास जेव्हा त्या धडाडीने पुढे येतील, तेव्हाच त्या सावित्रीच्या खऱ्याखुऱ्या लेकी मानल्या जातील. जय सावित्री! जय ज्योतिबा!
‘सावित्रीमाईने दिला हा, ज्ञानाचा वसा,
पुढे नेणार ह्या लेकी, तिचा वारसा..’
कु.संगिता रामटेके/भोवते
साकोली,भंडारा



