काव्यस्फूर्तीच्या समाधानातून लेखणीबद्ध झालेले ‘ऋणनिर्देश’; बी.डावकरे
मराठीचे शिलेदार समूहाच्या कायम ऋणात मी
काव्यस्फूर्तीच्या समाधानातून लेखणीबद्ध झालेले ‘ऋणनिर्देश’; बी.डावकरे
मराठीचे शिलेदार समूहाच्या कायम ऋणात मी
ऋणात सदा
राहतो ताईदादा
कायमचा मी
आज सकाळी सहजच संदेशाचे वाचन करत असताना राहुलभाऊंचा तुमचा फोटो पाठवा हा संदेश वाचला आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्वरित मी माझा फोटो पाठवून दिलासआणि शाळेच्या पुढच्या प्रवासाला निघालो. काही वेळाने पाहिलं तर माझे ‘हायकू काव्य’ सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकल्याचा संदेश वाचावयास मिळाला. हे पाहून मनाला समाधान वाटले. गेल्या जुलै २०२३ पासून शिलेदार समूहातील विविध रचनांमध्ये लेखन करत असताना शिलेदार समूहाच्या प्रशासक सहप्रशासक यांच्या डोक्यातून येणारे विषय व त्यावर माझ्यासारख्यांना लेखन करताना होणारे विचारांचे द्वंद्व याचा ताळमेळ घालून रचना साकार कराव्या लागतात.
वाढती लोकसंख्या व पोटापाण्यासाठी, नोकरीसाठी स्थलांतरित होणारी जनता रेल्वेमध्ये जीवघेणा प्रवास करत असतात अशा आशयाचे सामाजिक चित्र हायकू रचनेसाठी दिले गेले. खरंतर आपण आजपर्यंत अनेकदा वर्तमानपत्रातून किंवा इतर प्रसारमाध्यमातून आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं की, यातून बऱ्याच जणांना आपला प्राण गमवावा लागला. आजच्या धावपळीच्या युगात वेळेचे काटेकोर बंधन पाळणं हे फार जिकिरीचे काम आहे,आणि त्यातूनच घाईगडबडीत हा प्रवास करत असताना नक्कीच अपघाताची शक्यता असते, म्हणून मला यावर हे शब्द सुचले आणि ते मी शब्दात मांडले. हीच रचना परीक्षकांना आवडली आणि त्यांनी मला हा बहुमान प्राप्त करून दिला.
मध्यंतरीच्या काळात राहुलभाऊंनी त्यांच्या मनाची खंत समूहामध्ये बोलून दाखवली की, साप्ताहिक साहित्यगंध प्रकाशित करत असताना येणाऱ्या अडचणी,आर्थिक बाबींचे नियोजन या सर्व गोष्टींचा त्यांनी समूहात उहापोह केला.वर्गणी परत करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला तेव्हा मनामध्ये विचारांचे काहूर माजले.ज्या शिलेदार समूहाने आपल्याला आपल्या मनातील भावनांना सुंदर असं विचारमंच निर्माण करून दिलं ते जर बंद पडत असेल तर……. ही कल्पनाच उद्विग्न करत होती.
यावर समूहातील ज्येष्ठ शिलेदार ताई दादांनी राहुल भाऊंना विनंती करून, आम्ही तन-मन-धनाने आपल्या सोबत आहोत असा शब्द दिला,मीही त्यात सहभागी झालो आणि पुन्हा एकदा आपला शिलेदार समूह जोमाने कामाला लागला. मला या निमित्ताने राहुलभाऊ तुम्हाला आश्वस्त करायचं आहे की,शिलेदार समूहाचा परिवार सुखामध्ये जसा सोबत होता तसा अडचणीच्या व कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा आपल्या सोबत सदैव राहील याची तुम्ही कधीही चिंता करू नका. तुम्ही हे करत असताना स्वतःच्या तब्येतीलाही जपा ही एका सवंगड्यांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे.
शिलेदार समूहातील ताई दादांना माझी हात जोडून प्रार्थना आहे की जे रोपटं लावलं व त्याची जोपासना केली ते करत असताना त्यांना की त्याला हालापेष्टा सहन करावा लागल्यात याचा आपण गांभीर्याने विचार करावा. आज त्या शिलेदारसमूहाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. त्यासाठी निश्चितच आपणा सर्वांचा हातभार सहकार्य लाभलेलं आहे.आणि या बळावरच हे सर्व शक्य झालेलं आहे.याही पुढे आपण सर्वांनी या वटवृक्षाच्या फांद्या कशा विस्तारता येतील व त्याचे मुळ व खोड भक्कमपणे कसे उभे राहील या दृष्टीने विचार करूया. माझ्या हायकू रचनेला आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छारुपी आशीर्वादांचा मी मनःपूर्वक स्वीकार करतो धन्यवाद.
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



