
0
4
0
8
9
0
जांगडगुत्ता
हातात घेता गणिताचं पुस्तक
सूत्र, पदावल्यांचा मारा
भूमितीच्या काढा आकृत्या
कसोट्यांचा चुकेना फेरा
लक्षात राहायचा नाही पत्ता
डोक्यात व्हायचा जांगडगुत्ता..१
कोण जिंकला कोण मेला
कोण झाला राजा कुठला
अमुक राज्य तमुक राजधानी
सणावळ्यांनी भुगाच पडला
इतिहासात कुणाची सत्ता
डोक्यात व्हायचा जांगडगुत्ता..२
विज्ञानाचा केमिकल लोच्या
समीकरण काही जुळेना
भाषेमध्ये व्याकरण पाठ
अलंकार अर्थ कळेना
प्रश्नोत्तराचा गिरवून कित्ता
डोक्यात व्हायचा जांगडगुत्ता..३
एवढं सगऴ कठीण पाहून
जीव बेजार व्हायचा नुसता
सोपं होऊन जायचं सगळं
शिक्षकांनी समजावून देता
गुंता सुटून जायचा पुरता
सहज सुटायचा जांगडगुत्ता..४
स्वाती मराडे
ता.इंदापूर, जि.पुणे
0
4
0
8
9
0





