“देशभक्तीची साकार संकल्पना- “अटल वंदना!”
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
“देशभक्तीची साकार संकल्पना- “अटल वंदना!”
अटलजींच्या साहित्याचा मंचीय अविष्कार
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे-दि.२५डिसें.(प्रतिनिधी) भारताचे लोकप्रिय दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर हा जन्मदिन. यंदा अटलजींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त त्यांच्या कविता, संसदेतील गाजलेली भाषणे, विदेश नीती विषयक धोरणे आणि विविध विषयावरील त्यांची अभ्यास पूर्ण ठाम मते यांचा वेध घेणारा एक मंचीय कार्यक्रम एकता मासिकाच्या वतीने नुकताच सादर करण्यात आला. मा. मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते भारत माता व अटलजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
अजातशत्रू म्हणून प्रसिध्द असलेले राजकीय नेता आणि निस्सीम देशभक्त अटल बिहारी वाजपेयी यांची संपूर्ण कारकीर्द चित्तवेधक होती. अभ्यासू संसदपटू, धारदार विरोधी पक्षनेता, यशस्वी परराष्ट्र मंत्री, कर्तृत्ववान पंतप्रधान, उत्तम वक्ता आणि लोकप्रिय जननेता असा त्यांचा चमकदार जीवन प्रवास एक निर्मल व्यक्तीमत्वाचे पारदर्शक दर्शन घडवतो. याच चमकदार पार्श्वभूमीचा वेध घेण्याच्या उद्देशाने “कृतज्ञता स्मरण उपक्रम” अंतर्गत हा मंचीय कार्यक्रम सादर करण्यात आला.
यामध्ये “भारत सिर्फ एक जमीन का टुकडा नही; यह एक राष्ट्रपुरुष आहे !” ही अटलजींची मातृभूमी वंदना, “आर्ओ जिसमे हिम्मत हैं, “है ये आवाहन,” “कदम मिलाकर चलना होगा !” हे कार्यकर्त्यांना केलेले उद्बोधन, “शरयू पूछती राम कहा है ? यमुना पूछती कृष्ण कहा है?” ही आणि अशा अनेक भेदक कविता, कित्येक रंजक किस्से, विरोधकांचाही आदर करणारी निरलस वृत्तीचे दर्शन घडवणारे मनस्वी किस्से, अशा अटलजींच्या उपलब्ध साहित्याच्या आधारे कार्यक्रमाचे संहिता लेखन डाॅ. दिलीप कुलकर्णी यांनी केले आहे. तसेच, डाॅ.अनुजा कुलकर्णी, देवदत्त भिंगारकर आणि संज्ञा भिंगारकर यांनी ओघवत्या भाषेत कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण केले.
अटलजींच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध विषयांचा उहापोह करताना देशहिताबाबत कठोर असलेले अटलजी कवी म्हणून किती संवेदनाशील मनाचे होते, याचा पुनःप्रत्यय देणारा हा कार्यक्रम
“वंदे मातरम्!” या रसिकांच्या उत्स्फूर्त उद्घोषाणेने रंगतदार होत गेला. भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित या कार्यक्रमात एकताच्या संपादक रूपाली भुसारी व त्यांचे सहकारी यांचा मोलाचा सहभाग लाभला.
एकताचे व्यवस्थापक श्री. उपासनी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कवियत्री स्वाती दाढे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सराफ तसेच डॉ. आनंद बर्गे इत्यादींसह अनेक मान्यवर निमंत्रित कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रयोग अटलजी जन्मशताब्दी वर्षात सर्वत्र सादर करण्याचा संयोजकांचा मानस असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.



