Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनधाराशिवपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

गुणवत्ता पुन्हा मिळवता येते; संस्कार पुन्हा मिळवता येत नाहीत

पालक मेळाव्यातील कळकळीचा संदेश..!!

0 5 9 7 0 2

गुणवत्ता पुन्हा मिळवता येते; संस्कार पुन्हा मिळवता येत नाहीत

पालक मेळाव्यातील कळकळीचा संदेश..!!

आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने चांगले गुण मिळवावेत, उच्च शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात मोठे यश संपादन करावे, अशी प्रत्येक पालकांची मनापासून इच्छा असते. त्यासाठी आपण मुलांच्या शिक्षणावर, गुणवत्तेवर आणि भवितव्यावर भर देतो. हे निश्चितच आवश्यक आहे; परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचे काही असेल, तर ते म्हणजे मुलांवर होणारे संस्कार आणि त्यांच्याशी असलेले आपले भावनिक नाते.

गुणवत्ता कमी झाली तर ती पुन्हा मिळवता येते; परंतु एकदा संस्कारांची दिशा चुकली तर ते पूर्ववत करणे अत्यंत कठीण असते. परीक्षेत कमी गुण मिळाले तर पुन्हा अभ्यास करून ते वाढवता येतात. एखाद्या विषयात अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु चुकीची संगत, चुकीचे विचार आणि चुकीच्या सवयी मनात रुजल्या तर त्यातून बाहेर पडणे कठीण होते.

म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी केवळ मुलांच्या गुणांकडे पाहू नये, तर त्यांच्या मनाकडेही पाहिले पाहिजे. मुलांच्या मनात काय चालले आहे? त्यांना कोणत्या अडचणी आहेत? त्यांचे मित्र कोण आहेत? त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते? कोणत्या गोष्टींचे आकर्षण आहे? हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. मुलांना सतत आदेश देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांचे मित्र बनावे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनावे. जेव्हा मुलांना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आई-वडिलांना किंवा शिक्षकांना सांगता येते, तेव्हा त्यांच्या मनात चुकीचे विचार रुजण्याची शक्यता कमी होते.

आज मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मुलांच्या हातात जग आले आहे. त्यातून ज्ञान मिळते, पण त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींचा प्रभावही पडू शकतो. त्यामुळे मुलांवर केवळ नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी जवळीक, संवाद आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. माझी सर्व पालकांना एक कळकळीची विनंती आहे—आपल्या पाल्यासाठी वेळ काढा. पूर्वीच्या काळाप्रमाणे निदान रात्रीचे जेवण तरी सर्वांनी एकत्र बसून करा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि मुलांना प्रेमाने विचारा

“आज शाळेत काय झाले?”
“आज तुला काय नवीन शिकायला मिळाले?”
“कोणी तुला त्रास दिला का?”
“तुला काही अडचण आहे का?”
“तुझ्या मनात काही आहे का, जे तुला माझ्याशी बोलायचे आहे?”
हे प्रश्न साधे आहेत; पण त्यातून मुलांच्या मनाचा दरवाजा उघडू शकतो.

जीवन एकदाच मिळते. बालपण एकदाच येते. आपल्या मुलांचे बालपण पुन्हा परत मिळणार नाही. त्यामुळे पैसा, संपत्ती आणि सुखसोयी देण्याबरोबरच त्यांना आपला वेळ, प्रेम, विश्वास आणि संस्कार देणे हीच खरी पालकांची जबाबदारी आहे. शाळा मुलांना शिक्षण देते; पण घर मुलांना जीवन जगण्याची दिशा देते. शिक्षक ज्ञान देतात; पण पालकांचे प्रेम आणि संस्कार मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी करतात. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी हातात हात घालून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते; गुण कमी पडले तर पुन्हा मेहनत करून वाढवता येतील, यश मिळाले नाही तर पुन्हा प्रयत्न करता येतील; पण हरवलेले बालपण परत मिळणार नाही, आणि हरवलेले संस्कार सहज परत आणता येणार नाहीत. म्हणून आपल्या पाल्याला फक्त यशस्वी नाही, तर सुसंस्कारी, संवेदनशील, जबाबदार आणि चांगला माणूस बनवूया. “गुणवत्ता ही जीवनाला उंची देते; पण संस्कार जीवनाला दिशा देतात.” हीच पालक आणि शिक्षक म्हणून आपली खरी जबाबदारी आहे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी
भारत विद्यालय बेडगा
ता उमरगा जिल्हा धाराशिव.
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 7 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे