Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“कुंचल्याचे बाह्यरंग, मनातल्या भावनांचे तरंग..”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू काव्य'स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 5 1 6 4 1

“कुंचल्याचे बाह्यरंग, मनातल्या भावनांचे तरंग..”; विष्णू संकपाळ

‘तिच्या’ पापणकडावरील हलकासा काजळ, नजरेतला भाव अधिक गहिरा वाटतो.

शुक्रवारीय ‘हायकू काव्य’स्पर्धेचे काव्यपरीक्षण

मानवी जीवसृष्टी हे एक अजब गजब चालते बोलते विद्यापीठ आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकाच हाडामांसाच्या गोळ्यातून साकारला असला तरीही प्रत्येकाचे रंग, रूप, स्वभाव वेगवेगळा आहे. पुन्हा त्यात काही व्यक्ती अंगभूत कलागुणांमुळे इतरांहून विशेष आहेत. ज्यामुळे त्या जगप्रसिद्ध होतात. अशा हजारो कलांपैकी चित्रकारिता ही एक अशी कला आहे की, ज्यातून शब्दांच्या पलिकडले भाव अचूक व्यक्त होतात. “चित्र कोणतेही असले तरी त्याचे स्वभाव गुण नेमकेपणे व्यक्त करण्याची ताकद कुंचल्यात असते”. बाल, किशोर, युवा, प्रौढ, वृद्ध या सर्व अवस्था चित्रातून हुबेहुब साकारण्याचे सामर्थ्य चित्रकाराच्या रेषात असते. ती एक त्याची भाषा असते. ज्यातून मानवी स्वभावाचे नाना पैलू व्यक्त होतात. चेहर्‍यावरील भाव मनातली घालमेल स्पष्ट करतात. सौम्य, रौद्र, सुखी, दुःखी, आनंदी, उदासी, वगैरे सर्व छटा अचूकपणे व्यक्त करण्याची कला कलाकारात असते. म्हणून तर कोणताही कलाकार म्हणजे एक दैवी अविष्कार असतो. जो इतरांहून खास ठरतो.

चित्र मग ते नैसर्गिक असो, पशू पक्ष्यांचे असो, विकास अथवा विनाशाचे असो, दुष्काळ अथवा सुकाळाचे असो, नंदनवन अथवा वाळवंट असो, शिशिर अथवा वसंत असो या सर्वातील सूक्ष्म अवस्था अत्यंत खूबीने उभ्या केल्या जातात. चित्रकारीतेत सुद्धा अनेक प्रकार आहेत त्या विस्तारात मी इथे जाऊ इच्छित नाही. मात्र तात्पर्य असे आहे की, कोणत्याही चित्रकाराचा कुंचला म्हणजे एक अद्भुत कलेचा मूर्तीमंत चमत्कृतीपूर्ण अविष्कार असतो. मायकेल एंजेलो, व्हिन्सेंट व्हॅन गाॅग, पावलो निकासो हे काही जागतिक चित्रकार तसेच राजा रवी वर्मा. एम एफ हुसेन. अमृता शेरगील. ही कांही भारतीय नावे आहेत.

आता कालच्या शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेल्या चित्राकडे वळूया. या चित्राचे बारकाईने निरीक्षण केल्यास कलाकाराची जादू स्पष्टपणे जाणवते. फिक्कट पिवळसर पार्श्वभूमीवर (कॅनव्हास) अत्यंत चतुराईने आणि विशेष कलात्मकतेने अशा काही रेषा ओढल्या आहेत की, ज्यातून एक सुंदर स्री मुख साकारले गेले आहे. यौवनाच्या बहरातले तेज तर दिसतेच, पण त्यासोबतच एक धीरगंभीर भाव स्पष्टपणे अधोरेखित होतो. अतिशय देखण्या तितक्याच सोज्वळ चेहर्‍याआडचे कांहीतरी उदासीन भाव झलकताहेत. तसेच तिचे काळेभोर बोलके डोळे लक्षवेधी आहेत. ते डोळे आपल्याशी काहीसा मूक संवाद करत असल्याचे जाणवते. पापणकडावरील हलकेसे काजळ नजरेतला भाव अधिक गहिरा करते. धनुष्याकृती दाट भुवया सौंदर्यात विशेष भर घालतात. मधोमध कोरलेली काळी टिकली साधेपणातली सभ्यता स्पष्ट करते. धारधार सरळ नासिकेने चेहर्‍याचा भारदस्तपणा नजरेत भरतो. त्यातच त्यातली नाजूक नथनी पारंपारिकतेची झलक दर्शवते.

मिटलेल्या जाडसर आकर्षक ओठात संयमित स्मित, किंचित गुढ उदासी आणि तटस्थ शांत भाव दर्शवतात. एकूण चेहर्‍याची ठेवण आणि भाव कुठेही उथळ न वाटता अत्यंत समतोल, संयमी, आणि भारदस्ततेचा मूर्तीमंत अविष्कार वाटतो. म्हणूनच हे चित्र म्हणजे एखाद्या तरूण स्त्रीच्या प्रसन्न तरीही काहीतरी गूढ भाव दर्शवणार्‍या अतिशय सुंदर व्यक्तिमत्वाचे हुबेहुब दर्शन घडवते. ही सर्व त्या चित्रकाराची खासियत आहे. कवी, लेखकांना शब्दांचे ईश्वर म्हणतात. मग या कुंचल्याच्या माध्यमातून कागदावर वेगवेगळे रंग भरून चित्रातून जिवंत भाव साकारणाऱ्या चित्रकाराला काय म्हणावे? खरेच खूप अद्भूत कला… जी त्या व्यक्तीला विश्वप्रसिद्ध तर करतेच. मात्र अनेक मानवी भावनांना कागदावर जिवंत करणारा कलाकार म्हणजे एक अलौकिक प्रयोगशाळाच म्हणावी लागेल.

‘हायकू लेखन’ सुद्धा असेच कलात्मक असावे लागते. आपल्याला चित्रविषय दिलेला आहे तर, त्या चित्राचे अचूक प्रतिबिंब रचनेत दिसायला हवे. रचना चित्राला न्याय देणारी असायला हवी. तशीच त्यात गुप्त असणारे सूक्ष्म भाव शब्द रूपात प्रकट व्हायला हवेत. चित्र रेखाटताना चित्रकार जितका तल्लीन झाला असेल तितकाच हायकूकार सुद्धा चित्रात हरवून जायला हवा. आणि तसेच शब्द उतरायला हवेत. अनेकांनी छानच लेखन केले आहे. भावी लेखणासाठी सर्वांना शुभेच्छा. आणि आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार…!!

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/कवी/लेखक/समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे