“All आईज On बुमराह’; डॅा अनिल पावशेकर
अगं बाई अरेच्चा...!!!
“All आईज On बुमराह’; डॅा अनिल पावशेकर
- अगं बाई अरेच्चा…!!!
भारत पाक दरम्यान पुर्वार्धात निरस झालेल्या लढतीत उत्तरार्धात चुरस निर्माण होत अखेर भारताने पाक ला अवघ्या सहा धावांनी मात दिली आहे. फलंदाजांच्या टुकार कामगिरीला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी पांघरून घालत टीम इंडियाचे वस्त्रहरण रोखले आहे. खेळपट्टी जिवंत असली की नामचीन फलंदाज, गोलंदाजांसमोर कशी नांगी टाकतात हे कालच्या सामन्यात दिसून आले. दोन्ही बाजूंच्या फलंदाजांनी प्रचंड उताविळपणा दाखवत बेक्कार फलंदाजी केलेली आहे. आपला संघ सामना जरी जिंकला असला तर यांत बरेच खाचखगळे असून यांत सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा पुढच्या फेरीतल्या सामन्यात वाटचाल कठीण होऊ शकते.
झाले काय तर सामन्यावर पावसाचे सावट असल्याने पाक ने प्रथम गोलंदाजी पत्करली आणि त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. रोहीतने आपल्या स्टाईलने फलंदीजाचा गिअर टाकला परंतु सलामीला आलेला विराट लवकरच पाक च्या गळाला लागला. खरेतर विराट क्रमांक तिनचा फलंदाज, याच क्रमांकावर तो रमतो, विक्रम रचतो. प्रारंभी सावध खेळत संघाला आकार देतो, अॅंकरची भुमिका निभावतो. पण या सामन्यात तो पुरता फसला आणि येणार्या बहुतांशी प्रत्येक फलंदाजाने विराटची नक्कल करत हवेत चेंडू भिरकावत पाक संघाला कॅचेस पकडायची प्रॅक्टिस दिली. तिसर्याच षटकांत शाहीन आफ्रिदीने त्याची फेवरेट विकेट म्हणजेच रोहीतला टिपत टीम इंडीयाला बॅकफूटवर ढकलले होते.
दोन बाद एकोणवीस धावां ही खरोखरच आदर्श स्थिती नव्हती परंतु आले पंतच्या मना तिथे कुणाचे चाले? मैदानावरील दबाव झुगारत पंतने ह्रदयातील धडधड वाढवणारी खेळी केली. कदाचित एकाच सामन्यात दोन्ही संघाकडून खेळणारा तो एकमेव फलंदाज असावा. त्याची फलंदाजी भारतीय संघाच्या धावा तर वाढवित होती पण पाक संघाला बळीचे आमिष पण दाखवित होती. पंत चे कमीतकमी अर्धा डझन झेल सोडत पाक संघाने त्याचे भरपूर लाड केले. कधी फ्लिक तर कधी ग्लॅमरस फटके मारत त्याने पाक गोलंदाजांच्या डोक्यावर अक्षरशः मिर्या वाटल्या.
तर दुसर्या टोकावर अक्षर पटेलने धडपडत त्याला साथ दिली. मात्र सूर्या, दुबे, जडेजा आणि पांड्याच्या पहिले अक्षरला पाठवणे थोडे खटकले. बहुदा आफ्रिदी, नसीम शहा, मो. आमीरच्या स्विंगची धार बोथट करणे हा त्या मागचा उद्देश असावा. मात्र बकरेकी अम्मा कबतक खैर मनाती, नसीमने त्याच्या दांड्या उडवत त्याची धडपड थांबवली. आठव्या षटकांत साठीत तिन बळी जाताच सूर्याने मैदान गाठले परंतु टीम इंडीयाची तब्येत सुधरायचे नाव घेत नव्हती. कारण एका टोकाला मो. आमीरची लाईन, लेंथ, स्विंग तर दसरीकडे नसीम, हॅरीस रौफच्या रफ्तार समोर आपले फलंदाज झिंगाचिका करू लागले होते. या त्रिकुटासमोर सूर्या, शिवम दुबे तर जणुकाही कसायासमोर कोकरासारखे हतबलपणे उभे होते आणि तेवढ्याच केविलपणाने ते त्यांना शरणसुद्धा गेले.
अर्धा संघ शंभरीच्या आंत परतला असला तरी पंत, जडेजा, पांड्या बाकी होते. मात्र आजचा दिवस फलंदाचा नव्हताच. पंतचा वारंवार बाद होण्याचा आत्मघातकी प्रयत्न अखेर फळाला आला आणि तो मो. आमीरचा बळी ठरला. पुढच्याच चेंडूवर जडेजाने आत्मसमर्पण करताच आपला संघाला शंभरीतच निपटण्याची भिती निर्माण झाली. शेवटी पांड्या, अर्शदीप आणि मो. सिराजने थोडीफार लाज राखत धावसंख्या ११९ वर पोहोचवली. वास्तविकतः या अपुर्या धावसंख्येवर बचाव करावा की आक्रमण या दुविधेत आपण असतो. पण पहिला डाव संपताच मो. आमीर छोटेखानी मुलाखतीत आपल्या संघासाठी महत्वाची टीप्स देऊन गेला. त्याच्या मते पाक संघाला चांगले खेळावे लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. खरी गोम इथेच होती.
आपल्याकडे गोलंदाजीतील हुकमी एक्का बुमराह असल्याने अॅाल आईज अॅान बुमराहवर होत्या आणि गरज होती त्याला उत्तम क्षेत्ररक्षणाची. पाक कडे बाबर आझम, रिझवान शिवाय बाकी फलंदाज म्हणजे लगी तो लाख की नहीं तो खाक की सारखे आहेत. या दोघांना वेसन घातले तर पाक चा वारू उधळत नाही. बुमराहच्या पहिल्याच षटकात रिझवानला दुबेने जीवदान देऊन रसभंग केला पण लगेच बाबरचा काटा काढत बुमराहने बोहणी करून दिली. धावसंख्या तोकडी असल्याने पाक वर दबाव नव्हता आणि दहाव्या षटकापर्यंत अर्धे टारगेट गाठले होते परंतु उस्मान खान, फखर झमान सामन्याचा दबाव झेलू शकले नाही. अक्षर पटेल, पांड्याने दोघांना माघारी पाठवत टीम इंडीयाला आशावादी ठेवले होते.
पंधराव्या षटकांत बुमराह आला आणि त्याने विजयाचे फ्लड गेट्स ओपन केले. खेळपट्टीवर फेविकॅाल लावून बसलेल्या रिझवानचा त्रिफळा उडवत त्याने विजयाचे रूझान टीम इंडियाकडे वळवले. पाकला शेवटच्या तिन षटकांत ३० धावांची गरज हार्दिकने शादाब खानला फसवत विजयाचा मार्ग प्रशस्त केला. तरीपण इफ्तीकार अहमदच्या रूपाने खेळपट्टीवर अस्सल फलंदाज असल्याने धाकधूक होतीच. बुमराहचे एकोणविसावे षटक निर्णायक ठरले. त्याने इफ्तिकार अहमदला अर्शदिपकडून झेलबाद करत आपला विजय आवाक्यात आणला. शेवटच्या षटकांत १८ धावा पाक शेपटाच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. त्यातही रोहीतने डिआरएसचा वापर करत इमाद वसीमचा बळी घेत पाकचा पराभवावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात वर्चस्व गाजवले ते दोन्ही बाजूंच्या गोलंदाजांनी. त्यातही पाक गोलंदाजांना खेळपट्टीच्या ताजेपणाचा भरपूर फायदा झाला. विशेषतः नसीम शहा, मो. आमीरने आपल्या फलंदाजांना चांगले चकवले. तर आफ्रिदी, रौफने वेगवान मारा करत आपल्या फलंदाजांना खिळवून ठेवले. या चौकडी समोर पंत, पटेल (३९ धावा), पंत सूर्या (३१ धावा) ह्या दोन भागीदार्यांनी धावसंख्या शंभरावर पोहोचली. पाक कडून बाबर रिझवान (२६ धावा), रिझवान उस्मान खान ( ३१ धावा) व्यतिरीक्त इतर भागीदार्या नसल्याने आणि डॅाट बॅाल जास्त खेळल्याने पाक संघ पाठलागात पिछाडला. बुमराहने भारतीय गोलंदाजीचे नेत्रुत्व करतांना महत्वाचे तिन बळी टिपत पाकचे कंबरडे मोडले. अर्शदीप सिराजने शेवटच्या गड्यासाठी केलेली सात धावांची छोटीशी का होईना भागीदारी केली, जी अखेर दोन्ही संघाच्या जय पराजयात महत्वपुर्ण ठरली.
आपल्या विजयात जीव ओतला तो गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी. विशेषतः बाबरचा सूर्याने स्लिपमध्ये घेतलेला झेल आणि इफ्तिकारचा अर्शदीपने डिपमध्ये घेतलेला झेल. याशिवाय पंतचे यष्टीपुढे आणि यष्टीमागचे योगदान विसरता येणार नाही. सूर्या, दुबे आणि जडेजा यांना फलंदाजीत सुर गवसणे आवश्यक आहे. तर पाक ने आपले दोन्ही सामने गमावत पुढील फेरीतला प्रवेश खडतर करून ठेवला आहे. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीचे पाक फलंदाजांनी मातेरे केले. रिझवान वगळता बाकी सगळे फलंदाज पाहुणे कलाकारा सारखे आले आणि गेले. भारतातर्फे सर्वाधिक धावा करणार्या रिषभ पंतला वारंवार जीवदान देणे पाकच्या अंगलट आले. थोडक्यात काय तर त्यांनी रिषभ पंतची कॅच टाकली, मॅच टाकली असे म्हणावेसे वाटते.
दिनांक १० जून २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com