मानसिक तणाव आणि मुखवट्याची दुनिया
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

मानसिक तणाव आणि मुखवट्याची दुनिया
मानसिक तणाव माणसाला असला की त्याची देहबोली भाषा बदलते. यालाच आपण इंग्रजीमध्ये ‘बॉडी लँग्वेज’ असे म्हणतो. मानसिक तणाव असला की सतत चिडचिड होते. कारण नसताना एकमेकांवर ताशेरे मारले जातात. कधी कधी मानसिक तणावाखाली माणूस एकदम शांत होतो. डिप्रेशन मध्ये देखील जातो. किंवा मनातल्या गोष्टी पटकन बोलून रिकामे तरी होतो. माणसाच्या शारीरिक हालचाली वरून डोळ्यांच्या हवभावावरून, चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन वरून आपण त्याला मानसिक तणाव आहे का? तो आनंदात आहे का?दुखात आहे. हे आपण लगेच जाणतो.
शब्दांच्या दुनियेपेक्षा ही देहबोलीची भाषा अगदी दिसून येते. जाणवते.स्पष्ट होते. मानसिक तणाव येतो हे बरोबर आहे. पण हा तणाव कोणाशी तरी बोलून दाखवावा. मनातच ठेवला, तर त्याला आजारांच्या माहेरघरात लोटले जाते. कधी लिहून रिकामे व्हावे.कधी खास मित्रांना सांगावे. कधी आई -बाबा जवळ बोलावे. कधी कुटुंबातील प्रिय व्यक्तीला बोलून दाखवावे. आपल्या मनातील काही गोष्टी शेअर केल्याने आपली तब्येत उत्तम राहते व योग्य सल्ला मिळतो. पण ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याकडूनच सल्ला घ्यायचा आहे. हे मात्र तेवढेच खरे. आपण स्वतः विश्वासाचे रोप पेरले तर विश्वासाचे झाड उगवेल. त्याला विश्वासाची फुले येतील. तर चला एकमेकांच्या हृदयात विश्वासाची रोपे लावूया आणि मानसिकतेचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न तरी करू या.
मानव हा जीवनामध्ये विविध मुखवटे घालूनच चालतो. रागाचा मुखवटा, मत्साराचा मुखवटा, प्रेमाचा मुखवटा, द्वेशाचा मुखवटा, अगदी प्रेमाचाही मुखवटा असे विविध अंगी मुखवटे घालून तो जीवनात वावरत असतो. मानव हे मुद्दाम करतो असे नाही. कुटुंबामध्ये त्याचे वागणे वेगळे असते. समाजामध्ये वागणे वेगळे असते. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी वागणे वेगळे असते. कारण त्याला स्वतःची इमेज जपायची असते. एकंदर काय तर तो माणूस नेमका कसा आहे हे आपल्याला कळतच नाही. त्याच्याबरोबर आपण काही दिवस, महिने, वर्ष राहिलो तर आपल्याला त्याच्यातल्या स्वभावाच्या खाचा-खोचा कळायला मदत होते.
पण एखाद्या माणसाने आपल्यासमोर एखादा मुखवटा धारण केला तर आपण वर्षानुवर्ष त्याच्या बरोबर राहिलं तरी सुद्धा त्याचा स्वतःचा जो बाज आहे तो लक्षात येत नाही. कारण तो जगात मुखवटा घालूनच वावरत आहे. अशा व्यक्तीला किंवा मानवाला ओळखणे फार कठीण जाते. त्यामुळे सच्चा माणूस जो आहे तो बाजूला पडतो. आणि मुखवटा धारण केलेला माणूस पुढे जातो. पण एकदा का त्याचा मुखवटा उतरला गेला की मग त्याचे काही खरे नसते. म्हणून माणसाने कायम सावधगिरी बाळगावी. आपले कुटुंब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. त्याचप्रमाणे आपण मैत्री केलेल्या काही ठराविक मित्रांपैकी काही आपल्या बाजूने उभे राहणारे मित्र असतात. काही बघायची भूमिका घेणारे असतात. तर काही मला काय करायचे? ह्या भूमिकेचे असतात.
म्हणून मुखवटा धारण केलेल्या माणसाला ओळखणे कठीण आहे त्याच्याबरोबर मैत्री केली तर जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे सांगणे कठीण आहे त्याचबरोबर मैत्री करावी मुखवटा धरण न केलेल्या व्यक्तींशी करावी कारण त्याचा मुखवटा कधी ना कधी तो गळून पडणार आहे पण मुखवटा कोणी धारण केला हे समजणं फार कठीण आहे. मग प्रत्येक व्यक्तीचा अंदाज घेऊन वागणेच बरोबर आहे. आपल्या कुटुंबाशी एकरूप राहणे योग्य आहे. कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक संबंध न ठेवता सामाजिक संबंध ठेवले तर कदाचित त्रास होणार नाही. सर्वांशी जागरूकपणे वागले पाहिजे. काही माणसं दिलखुलास असतात. ती लगेच ओळखू येतात. अशा दिलखुलास व्यक्तींबरोबर दिलखुलास मैत्री करावी.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे





