Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

ओव्यातील आयुष्य जगणारी कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’

अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

0 4 8 2 9 0

ओव्यातील आयुष्य जगणारी कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’

तेव्हा नाही केले आई तुझ्या शब्दांचे मोल…!
आता कुठूनही असावे अज्ञानाला ज्ञानबळ…!
कवी सोपानदेव चौधरी यांच्या ओळीतील खंत, अनुभव आणि जीवनदर्शन आपल्याला आपल्या आयुष्यातही सहज दिसून येतात. सोपानदेवांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी. शाळेच्या उंबरठ्यापर्यंत कधी पाऊल न ठेवलेल्या, अक्षर ओळखही नसलेल्या या स्त्रीने लोक काव्यास अविस्मरणीय असा ठेवा दिला. त्या म्हणायच्या, “विठोबाचे अन् रामाचे मंदिर याच माझ्या शाळा”. घरातील कामे, संसाराचा सारीपाट आणि आयुष्याचा रंगमंच या सगळ्यातून जन्म घेत गेल्या त्यांच्या ओव्या. त्या ओव्या मुलगा सोपानदेव यांनी जपून ठेवल्या; पण आपल्या ‘अडाणी’ आईच्या ओव्यांवर सुशिक्षित महाराष्ट्रात हसू होईल. या भीतीने त्या त्यांनी पुढे आणल्या नाहीत. नशिबाने हे लिखाण प्र. के. अत्रे यांच्या हाती पडलं आणि ते उद्गारले, ‘ही तर माजघरात दडलेली बावन्नकशी सोन्याची खाण आहे’.

तेव्हा सोपानदेवांना उमगलं. ‘कोकिळेच्या घशातून सूर स्वतःहून झरतात, प्राजक्त उमलला की सुगंध पसरतो’. तसंच प्रतिभा ही निसर्गाची देणगी असते. आणि ती त्यांच्या आईमध्ये अफाट होती. बहिणाबाई स्वतः म्हणत, “माझी माय सरसोती मला शिकवते बोली…!” त्यांच्या प्रत्येक ओळीमधून निसर्ग, संसार, दुःख-सुख, करुणा, प्रेम, तत्त्वज्ञान आणि स्त्रीहृदयाची कोमलता झिरपत राहते. बहिणाबाईंच्या कविता म्हणजे स्त्रीजीवनाचा आरसा… सासरच्या दु:खाचा उल्लेख करताना त्या म्हणतात,

आसू नाही ती सासू कशाची,
आसरा नाही तो सासरा कशाचा…!
आणि माहेरची ओढ व्यक्त करताना,
रात-दिन गजबज असं खटल्याचं घर,
सदा आबादी आबाद माझं असं माहेर…!

माहेरच्या सावलीसारखी भिमाई आणि महाजन बाप त्यांच्यावरील प्रेमाने बहिणाबाईंच्या अनेक ओव्या उजळून निघतात. सुख-दुःखाच्या ताण्यातून जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं मन त्यांनी आपल्या शब्दांत मांडलं आहे. सासरी त्यांना अतोनात कष्ट सोसावे लागले. तरी त्यांनी सकारात्मकता सोडली नाही. सकाळी गोठा, शेती, घरातील धावपळ तरीही त्या इतर आयाबायांना गाण्यांच्या ओव्या म्हणत धीर देत.
‘उठ सासुरवाशीण बाई, उठ जानं शेतीकामाचा घोर’. सणउत्सवांत त्या स्त्रियांसाठी खेळ, टिपऱ्या, फुगड्या घेऊन वातावरण रंगवायच्या. झोका घेताना त्यांना आठवायचं माहेर.. माझा झोका, माझा झोका चालला भरी भरी जी… गेला झोका गेला झोका चालला माहेराला जी…!

कोणी विचारलं जरी,काय ग सारखं माहेरचं गातेस?” तरीही त्या डगमगल्या नाहीत. विधवापणाचा आघात पण मनाची ताकद ढळली नाही. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांच्यावर पर्वत कोसळला पतीचं निधन, लहान दोन मुलं. अश्रूंच्या थेंबांतूनही त्यांनी शब्दांचे मोती ओवले.

लपे करमाचे रेखा माझ्या कुंकवाच्या खाली,
पुशीसनी गेलं कुंकू, रेखा उघडी पडली…
पण त्या तुटल्या नाहीत. त्या म्हणाल्या,
जरी फुटल्या बांगड्या मनगटी,
तुटे मंगळसूतर, उरे गया ची शपथ…!

लोकांनी कीव केली तेव्हा ठामपणे त्यांनी सांगितलं,
“नका करू माझी किव… झालं माझं समाधान, आता माझा मले जीव…!” त्यांच्या काव्यातील वैधव्य, दुःख कमालीच्या करुण, पण सामर्थ्यवान ताणाने व्यक्त होतं. बहिणाबाई म्हणतात, “अरे संसार संसार, त्याला कधी खोटा म्हणू नये…देवळाच्या कळसाला कोणी लोटा म्हणू नये…! सुख-दुःखाचा समतोल, जपणूक, ओढ, जबाबदारी, आत्मबल संसाराची प्रत्येक शिदोरी त्यांनी अनुभवली आणि शब्दांतून जगाला दिली. त्या आपल्याला शिकवून जातात,
“जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाचं…!
उच्च गगनासारखं, धरित्रीच्या रे मोलाचं!”

लोककवी, लोकसहज, लोकसंस्कृतीच्या परंपरेला जपणाऱ्या, बहिणाबाई चौधरी या अद्भुत स्त्रीमूर्तीला मनःपूर्वक स्मरण आणि विनम्र अभिवादन…!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे