रूपयाची समस्या या शोधप्रबंधाची कहाणी
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

रूपयाची समस्या या शोधप्रबंधाची कहाणी
“कुठल्याही देशाच्या आर्थिक धोरणाची इस्टानिष्टता विकास खर्चावरून ठरवायची असते आणि विकास खर्चातही रस्ते, कालवे, विद्युत व दूरसंचार या सारख्या लोकोपयोगी कामांना प्राधान्य द्यावे लागते. हे निष्कर्ष लावले, तर ईस्ट इंडिया कंपनीची राजस्व पध्दतीच गर्हणीय ठरेल. भारताने इंग्लंडला अमाप दिले आणि इंग्लंडकडून भारताला अक्षरशः काहीही मिळाले नाही. “ही दोन्ही विधाने आश्चर्यकारक वाटतील, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातील सत्यता निविर्वाद आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रबंधामध्ये ब्रिटिश लोकांनी 1833 ते 1915 या प्रदीर्घ कालखंडामध्ये भारतात कशा कर पध्दती लागू केल्या आणि करातून मिळालेल्या पैशाचा उपयोग कसा बेजबाबदार पध्दतीने केला याचे विवेचन केले आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकारे यांच्यातील महसुली जमाखर्चाचे अंदाजपत्रक कसे चुकीचे होते याचे दाखले त्यांनी तपशीलासह या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवले आहे.
रूपयाची समस्या या शोधप्रबंधाची कहाणी:
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात म्हणजे इग्लंड आणि अमेरिकेध्ये उच्च शिक्षण घेतले.ज्या कालखंडात त्यांचे शिक्षण चालू होते, तो कालखंड भारतावर इंग्रजांचा एकछत्री अंमल असणारा कालखंड होता. भारतासाठी ब्रिटिशांनी कायदे करायचे आणि भारतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारायची या कायद्यांच्या विरुद्ध जो वागेल त्याला शिक्षा घायची आणि शिक्षा ही योग्य ठरविण्यासाठी न्यायव्यवस्था अधिक भक्कम करायची. या दोन्ही यंत्रणेचा उपयोग भारताचे आर्थिक शोषण करण्यासाठी करावयाचा व इग्लंडला त्याचा प्रचंड प्रमाणात नफा मिळवून द्यायचा ही नीती ब्रिटिश सरकारची होती.
इ.स.1720 पासून ब्रिटिशांचे हेच धोरण 1926 पर्यंत म्हणजे तब्बल 226 वर्ष भारतात चालू होते. इंग्रजांनी भारतासाठी काही सामाजिक सुधारणा केल्या त्यात त्यांनी शिक्षण सर्वासाठी खुले केले. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठे याची निर्मीती केली. भारतीय लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली ब्रिटिशांच्या या धोरणामुळे अनेक भारतीय इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आले. बहुतांश भारतीयांनी वकिली परिक्षा देण्यासाठी परदेशी शिक्षण घेतल्याचे दिसून येते.
किंबहुना आपली विलक्षण देशभक्ती एवढया स्वाभिमानीपणे परदेशात विद्वतेच्या पातळीवर कोणत्याही व्यक्तीने दाखविली नाही. परदेशात राहून आपल्या देशाप्रती एवढी प्रखर निष्ठा उच्च शिक्षणासाठी इंग्लंड, अमेरिकेत गेलेल्या कोणत्याही भारतीयाने दाखविली नाही. ती केवळ आणि केवळ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविले आहे.आणि त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्यांचा ‘रुपयांची समस्या’ हा संशोधन ग्रंथ होय. हा संशोधन विषय त्यांनी आपल्या एम.ए.च्या अभ्यास विषयाच्या वेळीच निवडला होता. या विषयाचा व्यासंग चालू असतांनाच एम.ए.चा शोध प्रबंध ‘ईस्ट इंडिया कपंनी प्रशासन आणि अर्थनिती’ असा होता. त्याचा उत्तरार्ध म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकराचे हे संशोधन होते.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=======



