मराठीचे शिलेदार संस्थेचे कवी शैलेश गायकवाड यांचे राज्यस्तरीय बालकाव्य स्पर्धेत मोठे यश
'आमचा नंदी' कवितेने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक!

मराठीचे शिलेदार संस्थेचे कवी शैलेश गायकवाड यांचे राज्यस्तरीय बालकाव्य स्पर्धेत मोठे यश;
‘आमचा नंदी’ कवितेने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक!
विंचूरचे कवी सुपुत्र गायकवाड यांचा अभिमानास्पद गौरव
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि १३ सप्टेंबर): महाराष्ट्रातील मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अग्रेसर असलेली सामाजिक संस्था मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे प्रसिद्ध बालकवी शैलेश गायकवाड यांच्या बालकवितेने अभिमानास्पद गौरव प्राप्त केला आहे. पोळा सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बालकाव्य स्पर्धेत (२०२६) विंचूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण कवी श्री. शैलेश शिवाजीराव गायकवाड यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यांच्या ‘आमचा नंदी’ या बालकाव्य रचनेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक (सर्वोत्कृष्ट स्थान) मिळाला आहे. या राज्यस्तरीय बालकाव्य स्पर्धेचे आयोजन ‘आम्ही बालकवी मराठीचे शिलेदार समूह, नागपूर’ यांच्या वतीने करण्यात आले होते. पोळा या शेतकऱ्यांच्या लाडक्या सणाचे आणि कृषी संस्कृतीचे औचित्य साधून या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
“मराठीची संस्कृती… आपली परंपरा… पोळा आपला सण…!” हा विचार या स्पर्धेच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न झाला. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवींनी सहभाग नोंदवला होता. त्यातून विंचूरचे ग्रामीण कवी श्री. शैलेश गायकवाड यांच्या ‘आमचा नंदी’ या कवितेने परीक्षकांची मने जिंकली आणि या रचनेला राज्यात सर्वोच्च स्थान प्राप्त झाले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक व प्रशासक श्री. राहुल पाटील सर आणि मुख्य परीक्षक व प्रशासक सविताताई पाटील ठाकरे यांनी या स्पर्धेचे अत्यंत चोख आणि यशस्वी नियोजन केले.
श्री. गायकवाड यांच्या या यशाबद्दल आयोजक समितीकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच विंचूर परिसर आणि साहित्य क्षेत्रातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “ग्रामीण मातीतला कवी… बालमनातला स्वप्नरंग…!” अशा शब्दांत त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या या यशामुळे विंचूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच मराठी भाषेची श्रीमंती अधिकाधिक वृद्धीगंत झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.



