Breaking
नागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

जीवन प्रकाशमान करू पाहणाऱ्या लाखो प्रबुद्ध मनांचा संगम म्हणजे ‘जनसागर’; स्वाती मराडे

गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे परीक्षण

0 6 2 7 9 7

जीवन प्रकाशमान करू पाहणाऱ्या लाखो प्रबुद्ध मनांचा संगम म्हणजे ‘जनसागर’; स्वाती मराडे

गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण

कालच म्हणजे १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर या ऐतिहासिक ठिकाणी ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर आलेले चित्र चारोळी स्पर्धेसाठीचे चित्र म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर उसळलेला जनसागर. तो पांढरा शुभ्र घुमट म्हणजे दीक्षाभूमीचा स्तूप. त्याभोवती फडकणारे पंचशील ध्वज आणि त्याकडे जाणारा माणसांचा अखंड प्रवाह. यालाच ‘जनसागर’ किंवा ‘भीमसागर’ म्हणतात. हा नुसता मेळा नाही, तर स्वाभिमान आणि समतेच्या शोधात आलेला लाखो लोकांचा महासागर आहे. ज्या समाजाला शतकानुशतके अस्पृश्यता आणि भेदभाव सहन करावा लागला, त्यांच्यासाठी हा दिवस नव्या जन्माचा दिवस ठरला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीय अन्यायाविरुद्ध लढण्यात घालवले. त्यांच्या मते, माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावरून नव्हे तर कर्तृत्वावर ठरले पाहिजे.

“अन् पुन्हा पसरो‌ मनावर, शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी, माणसासम वागणे..” ही मनिषा घेऊन, बौद्धविचार अंगिकारत विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या याच पवित्र भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सुमारे पाच लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबरला आणखी तीन लाख लोकांनी धम्म स्वीकारला. इतिहासात एकाच ठिकाणी झालेली ही जगातील पहिली सर्वात मोठी धार्मिक धर्मांतरण क्रांती होती.

बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारताना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित समाजाचे स्वप्न पाहिले होते. या भूमीवर त्यांनी आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, ज्या आजही प्रत्येक बौद्ध अनुयायी पाळतो. त्यामुळेच आज दीक्षाभूमी ही तीर्थक्षेत्र वाटते, प्रेरणाभूमी वाटते. येथे येणारा प्रत्येक अनुयायी बाबासाहेबांच्या संघर्षाप्रती कृतज्ञ होतो आणि शिक्षणाची प्रेरणा घेऊन जातो. समतेचा विचार सोबत घेतो, न्यायाने वागण्याची हिंमत बांधतो अन् मनात नवा आत्मविश्वास जागवतो. शांततेचा वसा घेत मानवतेची ज्योत अंतरी पेटवतो.

यावर्षी या ऐतिहासिक घटनेला ७० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे नागपूरमध्ये देश-विदेशातून लाखो अनुयायी दाखल झाले. काल दीक्षाभूमीवर जनसागर होता. अंतरीच्या भावनांचा मोठा जागर होता. येथील भव्य स्तूपाचे दर्शन घेतले तरी मिळणारी प्रसन्नतेची अनुभूती घ्यायला जनसागर उसळतो. आनंदाच्या उधाणाचीच ही भरती. येथील भव्य स्तूप सांचीच्या स्तुपाच्या धर्तीवर बांधला आहे. हा भारतातील सर्वात मोठा घुमट असलेला स्तूप आहे. दीक्षाभूमीवरील जनसागर म्हणजे गर्दी नाही, तर डॉ. बाबासाहेबांनी पेटवलेल्या ज्ञानाच्या ज्योतीने आपले जीवन प्रकाशमान करू पाहणाऱ्या लाखो प्रबुद्ध मनांचा संगम आहे.

आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेनिमित्ताने या विषयावर व्यक्त होताना मनात कृतज्ञतेचा सोहळा साजरा झाला नि अनेकविध रचना साकार झाल्या. मनोमन दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अलवार भावना शब्दरूपात विसावल्या. सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे