नावात काय असते?
शर्मिला देशमुख -घुमरे ता.केज जि.बीड
नावात काय असते?
खूप जुना प्रश्न हा.. नावात काय असते? खरंच, नावात काय असते? तसे पाहिले तर नावात काहीच नसते. स्वकर्तृत्वाने, स्वपराक्रमाने नाव अजरामर करणारे महामानव आपण पाहिले. त्यांनी थोडीच महापराक्रमी अशा कोणाचे नाव ठेवले होते. पण स्वतःचे नाव अजरामर केले, अशी अनेक उदाहरणे देता येतील. कुठेतरी वाचनात आले होते की, थोर व्यक्तींची, महापराक्रमी व्यक्तींची, देव देवतांची नावे ठेवू नयेत. आता का बरं ? हा प्रश्न तर नक्कीच पडणार. तर मला समजलेला अर्थ असा की ,त्यांनी जो पराक्रम , कार्य त्या नावाच्या भोवती अजरामर केलेले असते, ते कार्य नंतर नाव ठेवणारी व्यक्ती करू शकत नाही आणि त्या नावाचा अपभ्रंश, अपमान होऊ शकतो. फक्त तेच नाव त्याच्या कार्यासोबत अजरामर राहणे आवश्यक असावे.
फक्त नावाचा विषय नाही, तर आज काल विविध नेत्यांचे वगैरे पोशाख घालून त्यांना त्यांची गाजलेली गाणी जोडून रिल्स बनवण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. अगदी पॅम्पर्समध्ये वावरणाऱ्या मुलांना देखील शिवाजी महाराजांचा, जिजामातांचा असे पोशाख घातले जातात. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस असे मोठमोठे शब्द त्या रिल्स मध्ये टाकले जातात. आता विचार हा पडतो की नेमके त्या लहान चिमुकल्याचे कर्तृत्व कोणते ? तो शिवाजी महाराजांच्या जिजामातांच्या कार्याबद्दल जाणतो तरी का? हा ठीक आहे कौतुक म्हणून तुम्ही पोशाख वगैरे करू शकता परंतु त्यांना वापरलेली बिरूदे, राजाधीराज वैगेरे शब्द तुम्हाला योग्य वाटतात का? हे माझे मत. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. मत मतांतरे असू शकतात. पण उद्या चालून त्या मुलाने किंवा मुलीने असे कर्तृत्व गाजवलेच नाही किंवा चुकीच्या मार्गावर पाऊल ठेवले तर आपल्या मनाला काय वाटेल? हा सहजच माझ्या मनाला पडलेला प्रश्न.
नाव शिवाजी अन्
करतो मर्कट चाळे
महान नावाला कलंक
हे हातून न व्हावे…
आज समाजात आलेला ट्रेंड पाहून राहवले नाही, पोशाख नावे यांचे चित्र विचित्र प्रकार मनाला भावले नाही . खरं पाहता जयंती पुण्यतिथी ला शालेय स्तरावर आपण पोशाख वगैरे करू शकता कारण त्याद्वारे आपण सर्व विद्यार्थ्यांसमोर एक चित्र ठेवत असतो, एक आदर्श ठेवत असतो. त्या विषयावर ,भाषणे त्यांचे संवाद ,त्यांचे कर्तृत्व आपण समाजासमोर मांडू शकतो. पण पाळण्यातील बाळालाही तसा पोशाख करून रिल्स बनवणे कितपत योग्य?
असो स्वातंत्र्यकाळामध्ये ज्याचे त्याला स्वातंत्र्य विचाराचे, राहणीमानाचे ,पोशाखाचे, नावाचे. पण या गोष्टीवर थोडासा विचार व्हावा म्हणून हा लेख प्रपंच.
विचार कर मानवा
भर संस्काराचे मोती
नावात काय असते
नावात काहीच नसते
नको व्हावया नावाची माती
कर्तृत्व गाजवले ज्यांनी पृथ्वीतलावर
त्यांची टिकू दे पराक्रमाशी नाती
हवे तर त्यांचे संस्कार कर
तसे बनवण्याचा प्रयत्न कर
अन् मिळव स्वतंत्र नावासवे ख्याती……!!
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड





