पर्यटकांना खुणावतोय वैदर्भीय ‘चंद्रपूर किल्ला’
सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
पर्यटकांना खुणावतोय वैदर्भीय ‘चंद्रपूर किल्ला’
चंद्रपूर हे विदर्भाच्या दक्षिणेला वसलेले शहर आहे. पूर्वी गौंड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर, हे गाव किल्ल्याच्या आत होते. आता असलेले चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विस्तार होऊन चंद्रपूरचा किल्ला आता मध्यवस्तीत आला आहे. चंद्रपूरच्या किल्ल्याचा पाया खांडक्या बल्लाळशहा या गोंड राजाने घातला. त्याने चंद्रपूर येथे राजधानी वसवली. खांडक्या बल्लाळशाहच्या पदरी तेल ठाकूर नावाचा एक वास्तुशास्त्रज्ञ होता. त्याला इ.स. १४७२ मध्ये येथे किल्ला बांधायला सांगितले. तेल ठाकूराने पहाणी करून साडेसात मैलाच्या परिघाची आखणी केली आणि पायाभरणी केली.
खांडक्या बल्लाळशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हीरशहा गादीवर आला. त्यानेही परकोटाच्या चार वेशी उभारल्या. हत्तीवर आरुढ असलेला सिंह हे त्यांच्या शौर्याचे प्रतिक होते. हे प्रतिक त्यांनी राजचिन्ह म्हणून स्वीकारले. ते चिन्ह वेशीच्या चारही बाजूंना कोरून घेतले. चार दिशांना चार बलदंड दरवाजांबरोबर चार उपदिशांना लहान दरवाजे करण्यात आले. यांना खिडक्या म्हणतात. पुढे १५९७ ते १६२२ या काळात तटबंदीचे काम पूर्ण झाले. तटबंदीची उंची १५ ते २० फुटांची असून परिघ साडेसात मैल आहे. याचे दक्षिणोत्तर अंतर पावणे दोन मैल असून पूर्वपश्चिम अंतर सव्वा मैल आहे. पूर्व व दक्षिणेकडे झटपट नदी असून पश्चिमेला इरई नदी तटाजवळून वहाते.
या किल्ल्याला जटपुरा, अचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा असे दरवाजे असून यातील पठाणपुरा दरवाजा अतिशय सुरेख आहे. तसेच उपदरवाजे म्हणजे खिडक्यांनाही बगड, हनुमान, विठोबा, चोर आणि मसण अशी नावे आहेत. याशिवाय किल्ल्याला पूर्वी बालेकिल्ला होता. त्याचा वापर सध्या तुरुंग म्हणून करतात. याशिवाय अचलेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, गंगासिंगाची समाधी, रामाळा तलाव, रामबाग, कॅ. कोरहॅमचे थडगे इत्यादी वास्तु पहाण्यासारख्या आहेत. अचलेश्वर मंदिराजवळ असलेली राजा बीरशहाची समाधीही प्रेक्षणीय आहे.
हा वैदर्भीय किल्ला पाहण्यासाठी चंद्रपूर शहरामध्येच असल्याने चंद्रपूरला आलात कि झाले. येथे रेल्वे स्थानक व बस स्थानक आहे. वर्धा, नागपूर, यवतमाळ येथून सातत्याने बस चालतात. किल्ला हा शहराच्या मध्यभागी आहे. बस स्थानक व रेल्वे स्थानक पासून अंदाजे अर्धा किलोमीटर वर किल्ल्याचा जटपुरा दरवाजा लागतो.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



