‘पद’ नेमके कशासाठी….??
गणेश वि. कुंभारे ता.ब्रम्हपुरी, जिल्हा- चंद्रपूर

‘पद’ नेमके कशासाठी….??
एखाद्याला खाजगी संस्थेत कार्य करण्यासाठी पद मिळते; तर कोणाला सरकारी संस्थेत कार्य करण्यासाठी पद मिळते. काहींना तळागाळातील सेवेचा पद, तर काहींना उच्चपदस्थ अधिकारयुक्त पद मिळते. काहींना स्वतःच्या व्यवसायातील मालकाचे पद. ‘पद मिळणे म्हणजे नेमके काय असते’? पद ही एक जबाबदारी असते. पदाला अनुसरुन कार्य करावयाचे असते. याला काही बंधने, काही मर्यादा असतात. चाकोरीत राहून शिस्त पाळून इमाने-इतबारे कार्य करायचे असते. कार्याच्या सीमा ह्या ठरलेल्या असतात. पदावर राहून ज्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली, ती व्यक्ती समाजाच्या नजरेत भरते. तर पदाला अनुसरुन जबाबदारी पार न पाडणा-या व्यक्तीला समाज दुर्लक्षित करते. मग ती शासकिय असो वा खाजगी संस्था.
संस्थेपेक्षा ते पद, ती जबाबदारी ही व्यक्ती सापेक्ष असते. व्यक्तीची आवड, व्यक्तीला असलेला अभ्यास, पद सांभाळण्याची हातोटी आणि त्यासाठीची जिद्द ह्या बाबींवर पदाची अस्मिता अवलंबून असते. याहीपेक्षा पद सांभाळतांना प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा ठरतो. मग तो प्रामाणिकपणा वेळेच्या बाबतीत असेल, काम करण्यात असेल वा आर्थिक व्यवहारात असेल. आर्थिक व्यवहारात स्वार्थभाव बळावलेला अर्थात भ्रष्टाचार करणारा व्यक्ती, मग तो कनिष्ठ असो वा वरिष्ठ स्तरावरील असो, समाज ह्या व्यक्तिला अजिबात प्रतिष्ठा देत नाही. त्या व्यक्तीचा मान ठेवत नाही. ह्या व्यक्तीला पदावर असेपर्यंत मान देतात. नंतर मात्र अजिबात कोणी विचारत नाही.
प्रसंगी भ्रष्टाचार वाढल्यानंतर त्या व्यक्तीला ती सवयच जडलेली असते. त्याशिवाय त्याला काही चांगले सुचतच नाही. ती एक त्याची जगण्याची रीत बनते. यातच एखादा सत्कर्मी, सत्धर्मी व्यक्ती एक इलाज म्हणून लाचलुचपत विभागाच्या मार्फतीने त्याला अद्दल घडवण्याचा प्रयत्न करतो. मग मात्र अनेकजण त्याच्या नावाने फटाके फोडतात. “बरा झाला दाबला तर, हरामीच होता तो” असे म्हणत आनंद साजरा करतात. यानंतर त्याचे अनेक कारनामे बाहेर येतात. अनेकजण आपल्या तोंडून केलेल्या आर्थिक व्यवहाराविषयी बोलत सुटतात. वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार त्या पदाची नव्हे, तर त्या व्यक्तीची बदनामी होत असते. त्या व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन पार बदलून जातो. तेव्हा त्या व्यक्तीला कसं वाटत असेल, कल्पना करा.
याउलट पद लहान असो वा मोठे. वाट्याला आलेल्या पदावर राहून इमानाने काम करणारे, कमी वेळात अधिक काम करणारे, कामात हयगय न करणारे, वेळेनंतरही आपले काम करणारे, आपले काम विशेषत्वाने करणारे, शिवाय याव्यतिरिक्त समाजात सुस्वभावाने रमत गमत हसतमुखाने काम करणारे, अशी व्यक्ती स्वतः तर नावलौकिक कमावतेच. सोबतच इतरांसाठी ते मार्गदर्शक वा प्रेरणादायी ठरत असते. चांगले कार्य करणा-याची ख्याती सर्वदूर पसरते. समाजात प्रतिष्ठा वाढते. अनेकजण त्यांना जवळ करतात. त्यांचा जागोजागी मान-सन्मान केला जातो. ही आहे पदाची खरी किमया.
गणेश वि. कुंभारे
ता.ब्रम्हपुरी, जिल्हा- चंद्रपूर





