विचारांने सुशिक्षित माझे ‘आई-बाबा’
श्रीमती कल्पना हरी सुरवसे ता.उमरगा, जिल्हा धाराशिव

विचारांने सुशिक्षित माझे ‘आई-बाबा’
माझे अशिक्षित आई- वडील पण विचारांने मात्र फारच सुशिक्षित. मला माझ्या आई वडीलांचा खूप अभिमान वाटतो. माझ नशिब की ते माझे आई वडील होते. मी घरात सगळ्यांची खूप लाडकी एकुलती एक चार भांवडात मी शेंडीफळ. खूप लाड व्हायचे, आईची तर खूपच लाडकी. माझी आई शिकलेली नव्हती, पण तिने अम्हाला खूप छान वाढवले, घडवले, चांगले संस्कार दिले. माझ्या आईची इच्छा होती तिच्या लेकीला मास्तर नवरा करून द्यायचा. एक दिवस ती मला सोडून गेली, त्या नाजूक वयात जेव्हा आईची जास्त गरज वाटायची .तेव्हा माझ्या मायेची सावली हरवली.
कसंतरी स्वःताला सावरलं आणि वडिलांना पण. माझे वडील आईची माया देऊ लागले. आईची आठवण कधी येऊ दिली नाही. माझे सगळे लाड पुरवायचे. मागण्या अगोदर जे हवं ते मिळायचं, पण आई ती असते. आई वडील दोन्ही कर्तव्य पार पाडायचे. खूप कष्ट करायचे अम्हाला कशाची कमी भासू द्यायचे नाहीत. माझ्या वडिलांना शिक्षण म्हणलं, की खूप छान वाटायचं. पण माझे भावंडं जास्त शिकले नाहीत. परस्थिती सर्वसामान्य अशी होती. म्हणून ते कमवण्यासाठी बाहेर पडले. मला माझ्या वडिलांचे कष्ट दिसत होते. ते शेतात राब राब राबायचे. त्यांना मला खूप शिकवायचं होतं. खेडेगावत लेकीला तू खूप शिक, असं म्हणणारा एकमेव माझा बाप होता. मलाही माझ्या वडिलांसाठी खूप शिकायचं होतं. माझ्या वडिलांना शिक्षणातलं काही माहित नव्हतं. तरी ते रोज मला अभ्यासाला बसवायचे आणि माझ्या जवळच बसून राहाचे. जेव्हा त्यांच्या समोर अभ्यास करायचे, तेव्हा ते कौतुकाने माझ्याकडे बघायचे. त्यांना माझा खूप अभिमान वाटायचा.
माझ्या वडिलांना माझी एक कविता खूप आवडायची. ती म्हणजे, ‘शेतामध्ये माझी कोप, त्याला बोराट्याची झाप. तिथे राबतो कष्टतो, माझा शेतकरी बाप’. रोजच ही कविता ते म्हणायला लावत असे. त्यांचा थकवा निघून जायचा. मोडकं, तोडकं इंग्रजी वाचायचे तर, त्यांना खूप भारी वाटायचं. माझं लेकरू इंग्रजी वाचते असे संगळ्याना सांगायचे. तुला खूप शिकवेन बाळा म्हणत असत. खेडे गावात मुलीच्या लग्नाची फार घाई असते. आई नव्हती, वडील थकले होते. म्हणून त्यांनी आईची इच्छा म्हणून नोकरदार स्थळ पाहू लागले.
आईच्या इच्छेनुसार मास्तर नवरा शोधला.परीस्थिती नव्हती. हुंडा सोनं, द्यायचे, तरी एक लेकरू म्हणून शेत विकून थाटामाटात लग्न करून दिले. ते ही कर्तव्यातून मुक्त झाले. माझ्या लेकीला पुढे शिकवा अस वचन घेतले. निश्चिंत होऊन ते ही मला सोडून गेले. दुःखा मागे दुःख. माझे आई -वडील दोघे आज सोबत नाहीत. पण त्यांनी केलेले संस्कार, मर्यादा, शिस्त , मोठ्यांचा आदर , याचं पालन मी आजही करते आहे. त्यांना सांगायच आहे मला, तुमची मुलगी आज तुमच्या आशीर्वादाने मास्तरीन झालीय. खंत या गोष्टीची आहे तुम्ही असता तर किती तर आनंदी झाला असता . तुमच्याबद्दल लिहितेय तर खूप छान वाटतं. ‘खंरच आई- वडील म्हणजेच आपल दैवत’.
श्रीमती कल्पना हरी सुरवसे
ता.उमरगा, जिल्हा धाराशिव
=======





