शिक्षकदिन
जीवन एक शाळा
अन् अनुभव इथले गुरु
अविरत ज्ञानझरा पाजून
ज्ञानदानाचे कार्य असे सुरु ॥
विविध रुपे घेऊन येती
असंख्य आमचे गुरु
क्षणाक्षणाला धडे गिरविती
शिक्षक दिनाला स्मरण त्यांचे करू ॥
हृदयमंदिरी कोरून ठेविली
माझी शिक्षक आणि शाळा
जीवन रंगीत सजविणारा
खडू पांढरा नि फळा काळा ॥
शिक्षकजणू शिल्पकार भविष्य भारताचे
शील निती राष्ट्रप्रेम विकास मनाचे
ज्ञानार्जनात संस्कार कार्य
जबाबदार नागरीक घडविण्याचे ॥
भावी पिढीस आकार देऊन
स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य ठेवून
विज्ञाननिष्ठ जगतामध्ये
दिशादर्शक असती गुरु ॥
शिक्षकात असे ताकद
निर्माण अथवा विनाशाची
असंख्य उपक्रमाच्या ओझ्याखाली
बनली कठपुतली शिक्षकाची ॥
जागा शिक्षकाची रोबोट घेईल का
विद्यार्थ्यांच्या हृदयात शिरून
सुसंस्कार देईल का
शिक्षकाविना देशाचे भविष्य घडेल का ॥
एक दिवसाचा नको सन्मान
मुक्तपणे करू दया हो ज्ञानदान
शिक्षकच करितसे उत्थान
नवपिढीत जागवी राष्ट्राभिमान ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ



