Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशपरीक्षण लेखभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

ध्येयवेडा सागर’ जपतोय १७१७ पासूनच्या ‘नाणी’ संग्रहाचा वसा

वैदर्भीय, छंदवेड्या शिक्षकाचा आनंददायी प्रवास

0 4 8 2 8 4

ध्येयवेडा सागर’ जपतोय १७१७ पासूनच्या ‘नाणी’ संग्रहाचा वसा

वैदर्भीय, छंदवेड्या शिक्षकाचा आनंददायी प्रवास

ज्ञानदानाच्या पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात आपले कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत असतानाच, इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करण्याचा एक अनोखा छंद लाखनी तालुक्यातील खुटसावरी येथील सागर सुरेश साखरे यांनी जोपासला आहे. घरची परिस्थिती बेताचीच. अर्धा एकर शेतजमीन, खाजगी कंपनीत मजूर असलेले वडील. आई घरकाम व मजूरी करणारी. परंतु परिस्थितीशी दोन हात करीत सागर शिकला आणि नुकताच शिक्षक झाला. गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ‘सागर साखरे’ यांनी अतिशय दुर्मिळ नाणी आणि देशी-विदेशी चलनाचा एक विशाल व मौल्यवान संग्रह उभा केला आहे.​ शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना वर्तमान आणि भविष्याची दिशा देण्यासोबतच, सागर साखरे त्यांना भूतकाळातील समृद्ध वारसाही नाणी आणि नोटांच्या माध्यमातून समजावून सांगतात. दुर्मिळ नाणी संग्रहाचा हा वारसा त्यांना त्यांचे मामा राजकुमार टेंभुर्णे यांचेकडून लाभला असल्याचे ते आवर्जून सांगतात. मामांनीच सर्वात आधी त्यांच्याकडे असलेले काही भारतीय चलनातील दुर्मिळ नाणी सागरला दिली. आणि इथून सुरू झाला नाणी संग्रहाचा व जपण्याचा एक आनंददायी प्रवास!

‘​सागर साखरे’ यांच्या संग्रहातील नाण्यांचा पसारा थक्क करणारा आहे. त्यांच्याकडे केवळ काही वर्षांपूर्वीची नाणी नाहीत, तर इतिहासाच्या अनेक महत्त्वपूर्ण कालखंडातील मुद्रांचा समावेश आहे. यात ​प्राचीन आणि मध्ययुगीन नाणी, यामध्ये ब्रिटिशकालीन आणि मुघल काळातील दुर्मिळ नाणी आहेत. अनेक नाणी तर शेकडो वर्षांपूर्वीची असून ती त्या त्या राजवटीचा आर्थिक आणि कलात्मक इतिहास दर्शवतात. भारताने प्रजासत्ताक म्हणून स्वीकारलेले पहिले चलन आणि नंतरच्या टप्प्यातील जय हिंद, महात्मा गांधी यांसारख्या विषयांवर आधारित स्मृती नाण्यांचा संग्रही त्यांनी केला आहे.

​नाण्यांसोबतच सागर साखरे यांनी जगातील विविध देशांचे चलन जमा केले आहे. आजमितिस त्यांच्याकडे जवळपास ५० हून अधिक देशांच्या नोटा आणि नाण्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे असलेलं सर्वात दुर्मिळ व इस्ट इंडिया कंपनीच्या काळातील १९१७ चं सर्वात जुनं नाणं कुर्दीस्थान मधील बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्तानं भेट झालेल्या कुर्दीस्थान मधील हवर मुर्तुका या मित्रांन भेट म्हणून दिलंय. मुंबई येथील मित्र गौरव कुमार रे यांनी नेपाळी नाणी, तर इराणी मित्राने इराणी नाणी दिली आणि संग्रह वाढत गेला. सागर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व पंच असल्याने विविध देशांतील बुद्धिबळ स्पर्धेच्या भ्रमंती दरम्यान विविध विदेशी चलनातील नोटा व नाणींचा संग्रह त्यांना करता आला.

हा छंद वाढविण्यात अनेक मित्र मंडळींचा मोलाचा वाटा असून त्याच्या एका मैत्रीणीने त्यांना अल्बम भेट देऊन त्यात नाणी व नोटा जपून ठेवण्याचा सल्ला दिला. आज ​ते त्यांच्या अल्बममधील नाण्यांच्या संग्रहाचा उपयोग वर्गात शिकवताना उदाहरणादाखल करतात. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ त्या देशांच्या आर्थिक स्थितीचीच नव्हे, तर तेथील संस्कृतीचीही माहिती मिळते. त्यांचा हा आगळावेगळा छंद अनेकांना प्रेरणा देणारा असून त्यांनी जोपासलेल्या या छंदासाठी पवनी येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी ‘संजयकुमार वासनिक’ यांनी नुकताच शिक्षण विभागातर्फे सागरचा सत्कारही केलाय. सागर साखरे यांचा हा संग्रह केवळ पवनी तालुक्यातील परिसरासाठीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. या छंदवेड्या शिक्षकाच्या कार्यप्रेरणेस संपूर्ण मराठी वाचकांतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा..!!

रतन लांडगे, कोंढा वलनी
ता. पवनी, जि.भंडारा
===========

“माझ्यासाठी हा केवळ छंद नाही, तर इतिहास जतन करण्याचे एक माध्यम आहे. प्रत्येक नाणं किंवा नोट ही त्यावेळची गोष्ट सांगते. विद्यार्थ्यांना हा ‘जिवंत इतिहास’ मला दाखविता येतो, याचे समाधान आहे.”

सागर साखरे,
लाखनी जि. भंडारा
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे