राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनात श्रीचक्रधर स्वामी अवतरण दिन संपन्न

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनात श्रीचक्रधर स्वामी अवतरण दिन संपन्न
श्रीचक्रधरांनी समता आणि मानवतेचा विचार दिला – डॉ. कविता होले
श्रीचक्रधरांच्या मानवी मूल्यांची जगाला गरज – डॉ. पराग जोशी
महानुभाव पंथीय सोहळ्यातून मूल्याधिष्ठित समाज निर्मिती – म. सारंगधर पंजाबी
रजत डेकाटे, नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर, (दि १३) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाच्या वतीने सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतरण दिन सोहळ्यानिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. “सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी : समता, मानवता आणि विवेकाचा विचार” या विषयावर परिसंवाद पार पडला.
या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. प्रमोद वाटकर, गांधी विचारधारा प्रमुख यांच्या हस्ते झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. भारतभूषण शास्त्री (अध्यासन प्रमुख) यांनी भूषविले. श्रीचक्रधर स्वामींच्या न्याय, बंधुता, समता, मानवता या मूल्यामुळे महानुभाव धर्म समाजात आदर्श ठरत आहे.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी मांडलेली समता, मानवता, विवेक, करुणा आणि बंधुभावाची मूल्ये आजच्या जागतिक समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
त्यांच्या विचारांमध्ये व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीसोबतच समाजकल्याणाची व्यापक भूमिका दिसून येते.श्रीचक्रधर स्वामींच्या मानवी मूल्यांचा आधुनिक संदर्भात अभ्यास व प्रसार केल्यास अधिक समताधिष्ठित, विवेकशील आणि संवेदनशील समाजाची निर्मिती होऊ शकते, असे मत कालिदास संस्कृत विद्यापीठातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. पराग जोशी यांनी सांगितले.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी समाजातील जातिभेद, उच्च-नीचतेच्या भावना आणि समता व मानवतेचा मूलभूत विचार समाजासमोर ठेवला. श्रीचक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. विवेक, सदाचार, करुणा आणि मानवकल्याण यांना त्यांनी आपल्या उपदेशातून महत्त्व दिले. आजच्या विषमता आणि सामाजिक आव्हानांच्या काळात श्रीचक्रधर स्वामींचा समता व मानवतेचा संदेश अधिकच दिशादर्शक ठरतो, असे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथील अधिष्ठाता डॉ. कविता होले यांनी केले.
महानुभाव पंथातील सोहळे, प्रवचने, सत्संग आणि पदयात्रा यांमधून मानवी जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान मिळून जीवन अधिक संतुलित व मूल्याधिष्ठित बनते. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात महानुभाव तत्त्वज्ञानातील आचार-विचार माणसाला मानसिक शांतता व जीवनाचे संतुलन देणारे आहेत. त्यामुळे श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचा आधुनिक संदर्भात प्रसार होणे गरजेचे आहे, असेही प.पू.प.म. सारंगधर बाबा पंजाबी यांनी नमूद केले.
डॉ. कविता होले यांना महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार आणि डॉ.पराग जोशी यांना महाराष्ट्र शासनाचा जे.पी नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अध्यासनातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन डॉ. स्मिता शहाणे यांनी केले. आभार हेमांगी देशभ्रतार यांनी केले.



