महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप
उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप
उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटाका बसला आहे. तर, त्या तुलनेत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले आहे. राज्यात भाजपच्या 9 जागा आल्या आहेत. तर, अजित पवार गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा असतानाच उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद तिथं वाढली आहे. स्थानिक राजकी. परिस्थितीदेखील महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने पवार गटात जाण्याचा अजित पवार गटातील आमदाराचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या 13 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस सध्या मोठा भाऊ ठरला आहे. मात्र असे असतानाही काँग्रेस पक्षातील एक नाराज आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येतं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहे. हे दोन आमदार कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.





