सोशल मीडिया आणि आजची तरुणाई
तृप्ती पाटील (लेखिका) मुलुंड, मुंबई

सोशल मीडिया आणि आजची तरुणाई
आजच्या तंत्रज्ञानरूपी काळात अनेक तरुणांसाठी सोशल मीडिया म्हणजे जणू जीव की प्राण झाला आहे. सोशल मीडियावरील अयोग्य आणि अश्लील व्हिडिओ पाहून काही तरुण चुकीच्या मार्गाला जात आहेत. नातेसंबंधांविषयी चुकीची समज निर्माण होत आहे. काही तरुणांना लग्न झालेल्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची किंवा काही मुलींना लग्न झालेल्या पुरुषांशी मैत्री करण्याची आकर्षणे निर्माण होताना दिसतात. ही प्रवृत्ती आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. काही मुली पैशांच्या आकर्षणामुळे स्वतःपेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींशी संबंध ठेवतात आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य विस्कळीत होऊ शकते. काही मुलंही चुकीच्या नात्यांमध्ये अडकून स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करतात.
सोशल मीडियावर काहीजण कमी कपड्यांमध्ये किंवा अश्लील पद्धतीने व्हिडिओ बनवून लाईक आणि कमेंट मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टींमुळे स्वतःचा आणि कुटुंबाचा मान सन्मान व इज्जत धोक्यात येऊ शकतो. आज अनेक तरुणांमध्ये पालकांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर कमी होताना दिसतो. काहीजण वेळेचा अपव्यय करून तासन्तास सोशल मीडियावर राहतात. अभ्यास, कामधंदा किंवा करिअर याकडे दुर्लक्ष केले जाते.
पूर्वीच्या काळात तरुणांनी देशासाठी त्याग केला. आज मात्र काही तरुण तात्पुरत्या सुखांच्या मागे धावताना दिसतात. दारू पिणे, व्यसन करणे, उगाच वेळ घालवणे आणि चुकीच्या सवयी लावून घेणे यामुळे भविष्य धोक्यात येऊ शकते. कमी कपडे घालणे किंवा अनेक संबंध ठेवणे म्हणजे आधुनिकता नाही. खरे आधुनिकपण म्हणजे चांगले शिक्षण, चांगले विचार आणि जबाबदारीने वर्तन करणे .
तरुणांनो सावध व्हा!
बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडबरोबर शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे जीवन नव्हे. ते तात्पुरते सुख असते. सुरुवातीला ते गोड वाटते, पण नंतर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतो. खरे जीवनातील मर्म समजून घ्यायचे असेल; तर आपल्या कर्मांचा विचार करा. माणूस हा मृत्युनतर त्याच्याबरोबर काहीही घेऊन जात नाही, फक्त त्याची कर्मेच सोबत घेऊन जातो. म्हणून तरुण वयातच चांगली कर्मे करा. पालकांची सेवा करा, शिक्षण घ्या, कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. समाजात मान-सन्मान मिळेल असे काम करा. लोकांनी तुमच्या आई-वडिलांचे नाव अभिमानाने घ्यावे असे वागा.
आपण या देशाचे भविष्य आहोत. देशासाठी काही करता आले नाही तरी स्वतःसाठी चांगले करा. समाजासाठी उपयुक्त नागरिक बना. सोशल मीडियाच्या नादाला लागून आपले आयुष्य वाया घालवू नका. अनेक कुटुंबे सोशल मीडियामुळे तुटलेली आहेत. स्वतःला उत्तम नागरिक बनवा. जबाबदारीने वागा, चांगले कर्म करा आणि योग्य मार्ग निवडा. तेव्हाच समाजात तुमची ओळख कर्तबगार मुलगा किंवा मुलगी म्हणून होईल आणि तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मिळेल. मानाने जगा आणि आई वडीलांना आपल्या जगण्याचा अभिमान असावा असे कार्य करा… तूर्तास ऐवढेच…!!!
तृप्ती पाटील (लेखिका)
मुलुंड, मुंबई



