सानथोरास भूरळ घालणारा विविधरूपी , प्रवासी..तो चंद्रमा: शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
सानथोरास भूरळ घालणारा विविधरूपी , प्रवासी..तो चंद्रमा: शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
नभांतरी तो शशी अधांतरी शांत शितल
पाहता क्षणी मनमोहून भाव पालटी तो प्रेमळ
एक अदा ना एक छटा
रोज रोज ती नवी प्रभा
सान थोर भुलती तत्क्षणी
रंगरंगिल्या सुंदर आभा….
रोज नवे सौंदर्य, नवे रूप ,नवनवा लूक ..काय किमया आहे ना निसर्गाची अन् त्या चंद्रमाची! कितीतरी गुढ रहस्य दडली आहेत या अंतराळात. अधांतरी सूर्याभोवती फिरणारे ग्रह आणि त्यांच्याभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रहांचे चंद्र, त्यातील विशेष कौतुकास पात्र म्हणजे आमच्या पृथ्वीचा चांदोमामा. पृथ्वीतलावरील लोकांनी जणू त्याच्याशी आपले वेगवेगळे नातेसंबंध जुळवले आहेत आणि तोही तितक्याच आनंदाने वेगवेगळ्या रूपात नाती निभावत असतो. कवी कल्पनांचा तर तो प्राणच. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा तो नभात प्रवेशतो ना.. अगदी मनाला प्रसन्न करतो. परप्रकाशित असूनही त्याची चकाकी चेहऱ्यावर नव लकाकी आणून सोडते.
हा चंद्र रोज आपले आकार बदलतो, ती एक नैसर्गिक क्रिया आहे. याला आपण चंद्राच्या कला म्हणत असतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने चंद्राच्या कला बदलतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तो कमी कमी होत जातो. हाच कलांचा प्रवास असतो. या कला व त्यांची नावे या विषयी थोडे जाणून घेऊया, अमावस्यानंतर नवीन चंद्र त्याला वाढणारी चंद्रकोर म्हणतात. जेव्हा चंद्र अर्धा प्रकाशमान दिसतो त्याला पहिला चतुर्थांश म्हणतात. अर्ध्यापेक्षा जास्त वाढणारा गिब्बस आणि नंतर पौर्णिमा( पूर्ण चंद्र ). पौर्णिमेनंतर प्रकाशित भाग कमी होऊन त्याचा प्रकाश कमी होतो त्याच क्षीण गिब्बस म्हणतात. नंतर दिसणाऱ्या अर्ध्या चंद्राच शेवटची चतुर्थांश तर अमावस्येच्या नजीक क्षीण चंद्रकोर नंतर अमावस्या.असा हा चंद्राच्या कलांचा प्रवास.
या चंद्राची अनेक नावे आहेत.. सोम, इंदू, शशांक, निशाकर, चंद्रमा, सेलेन, लुना, मून, शशी, रजनीनाथ, कुमुदबांधव, सुधांशु, मृगांक. असा हा चंद्र आज बालकविता समुहात अर्थचंद रूपात अवतरला आणि बाल मनाच्या शिलेदारांसोबत मनसोक्त खेळला. त्याची चमचमणे, आकार चंद्रामुळे वैज्ञानिक घडणारी परिवर्तने, त्याचा उपवास, झुला अशा एक ना अनेक कल्पना अर्धचंद्राच्या रूपाने समूहात उतरल्या. सर्व शिलेदारांनी खूप सुंदर कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे .थोडीशी लयता आणि गेयता याचा विचार केला तर अजूनच लोभस बालकाव्य बनेल. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली व नवनवीन कल्पनांची मेजवानी दिली त्याबद्दल राहुल दादांचे मनःपूर्वक आभार. चला तर मग जाऊया आकाशी चंद्र पाहण्यास.. तूर्तास थांबते. धन्यवाद…!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक, सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



