Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखबीडमराठवाडाविदर्भसंपादकीय

“सकारात्मक दृष्टिकोन आणि यशाची हमी …यश तुमच्या हातात”

पुस्तक समीक्षण 'वाचन संस्कृतीकडे वाटचाल'

0 4 8 2 9 4

“सकारात्मक दृष्टिकोन आणि यशाची हमी …यश तुमच्या हातात”

पुस्तक समीक्षण ‘वाचन संस्कृतीकडे वाटचाल’

शिव खेरा लिखित ‘यश तुमच्या हातात’ हे पुस्तक म्हणजे वास्तवात अंधारात चाचपडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी एक आशेचा काजवाच होय. ‘मॅकमिलन इंडिया लिमिटेड’ या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित या पुस्तकांची पृष्ठसंख्या 304 असून किंमत 185 रुपये इतकी आहे. मानवी जीवनात यश, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि विकासाला आज ज्या प्रमाणात महत्त्व दिले जाते, त्या पार्श्वभूमीवर प्रेरणादायी साहित्याचे स्थान म्हणजे ‘यश तुमच्या हातात’ होय. यश हे बाह्य जगातून मिळणारी गोष्ट नसून ती प्रत्येकाच्या अंतरात्म्यात वास्तव्य करणारी शक्ती आहे. फक्त ती ओळखता येणे आवश्यक आहे. ती ओळखण्याची ‘दृष्टी’ देण्याचे कार्य हे पुस्तक करते. शिव खेरा लिखित हे पुस्तक आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, लक्ष्य निश्चिती, वेळेचे योग्य नियोजन, मानवी नातेसंबंध व अनुशासन, सवयींचे महत्त्व तसेच यशासाठी आवश्यक गोष्टी या मुद्द्यांवर अधिक भर देते. ही सर्व या पुस्तकाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. वेगवेगळ्या विभागांमधून लेखकाने प्रेरणादायी कथा, प्रसंग, किस्से , सुविचार ,विचार प्रवर्तक उदाहरणे आणि आत्मपरीक्षणासाठी विविध प्रश्नांचा वापर केला आहे.

‘शिव खेरा’ यांच्या विचार विश्वाचे केंद्र म्हणजे ‘दृष्टिकोन’ होय. यश हे 85 % दृष्टिकोनावर आणि 15% कौशल्यांवर आधारित आहे असे त्यांचे मत आहे. या तत्वाच्या आधारे लेखक वाचकाला सांगतात की, जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या यांच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो. दृष्टिकोन सकारात्मक आणि नकारात्मक असतो. येणाऱ्या अडथळ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीने पाहिले तर अपयश यशामध्ये परावर्तित होण्यास मदत होते. अर्थात समस्या ही एक संधी असते आणि अपयश शेवट नसून नवी सुरुवात असते. कोणत्याही गोष्टीची पूर्णतः जबाबदारी स्वीकारल्याशिवाय यश पायाशी येत नाही. या पुस्तकाचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे यात दिलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या कथा. तसेच काही सामान्य लोकांच्या कथा असल्या तरी त्यांचा प्रभाव मात्र असामान्य असा आहे. काही कथा वाचकांचे मन ताजेतवाने करतात व आशय समजण्यास सोपे जाते.

माणसाने व्यक्तिगत विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून स्वतःला विधायक कार्यात गुंतवावे. या पुस्तकातून फक्त कार्याची प्रेरणा न मिळता प्रत्यक्ष कृतीसाठी साधनांची उपलब्धता ही मिळते. जेवढी मोठी इमारत तेवढा पाया मजबूत म्हणजेच जेवढे कार्य मोठे तेवढे प्रयत्न जास्त हे सांगून आपल्या जीवनात कार्याची प्राथमिकता उजागर केली आहे. कोणत्या कार्यास प्राधान्यक्रम द्यावा याचे नियोजन करता येणे आवश्यक. त्यासाठी वैचारिक पातळी, विश्वासहार्यता ,आत्मविश्वास, निर्णय क्षमता , सकारात्मकता ,प्रयत्नांची पराकाष्ठा ,योग्य दिशा या सर्वांची नितांत आवश्यकता आहे. प्रगतीला बाधक ठरणाऱ्या गोष्टी जसे की, टाळाटाळ करणे, आजचे कार्य उद्यावर ढकलणे अर्थात चालढकलपणा, संकुचित मनोवृत्ती, नकारात्मक दृष्टिकोन यांपासून स्वतःला दूर ठेवता येणे आवश्यक आहे. कार्यातील सातत्य ,सकारात्मक दृष्टिकोन, निर्णय क्षमता ,त्वरित कृती मानवाला यशाकडे खेचून नेण्याचे कार्य करते.यशस्वी वाटचालीसाठी यशस्वी संवादाची ही तितकीच आवश्यकता असते. लेखक म्हणतात, यश प्राप्तीसाठी इतके कार्यामध्ये सातत्य ठेवा की नकारात्मक गोष्टी आसपास ही फिरकणार नाहीत. माणसाने अनुभवातून ,समाजातून, कुटुंब, मित्रपरिवार यांच्याकडून नेहमी काही ना काही शिकत राहावे कारण शिक्षण हे केवळ शाळा किंवा महाविद्यालयातून न मिळता ते आयुष्यभर विविध प्रसंगातून मिळत असते. तसे पाहता पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवन जगण्यासाठी मूल्य शिक्षणाची आवश्यकता असते.

निती मूल्यांमार्फत योग्य-अयोग्य, भावना व बुद्धी, बुद्धिमत्ता व दृष्टिकोन यामधील फरक लक्षात येणे ही तितकेच आवश्यक असते. दृष्टिकोन निकोप घडवणारे संस्कार मिळणे- घेणे आवश्यक आहे. कारण आसपासचा विचार करता नकारात्मक दृष्टिकोनाचेच पीक फोफावताना दिसते. अशी माणसे स्वतःच्या विकासातील अडथळा तर असतातच पण इतरांनाही अडचणीची ठरतात. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसे म्हणजेच आशावादी, प्रामाणिक, उत्साही ,हवीहवीशी वाटणारी, कार्यशील, तत्पर माणसे ओळखता येणे आवश्यक आहे. तसेच त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणे ही आवश्यक आहे. दृष्टी बदलणे इतके सोपे नसते पण ठरवले तर कठीण ते काय? हे सर्व करत असताना छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंदही मिळवता येणे आवश्यक असते.

या पुस्तकाची लेखन शैली अतिशय सोपी संवादात्मक आणि वाचकाशी थेट बोलणारी आहे. वाक्यरचना स्पष्ट असून कोणत्याही वयोगटातील सज्ञान वाचकाला समजायला सोपी आहे. ‘यश तुमच्या हातात ‘हे पुस्तक वाचकाला प्रगती करण्यास प्रेरणा देते. या पुस्तकातून स्वतः विषयी विश्वास वाटतो, नकारात्मक सवयींपासून सुटका होते, सकारात्मकता वाढते, कृतिशीलता निर्माण होते, नाते संबंधांबद्दल संवेदनशीलता निर्माण होते, व्यक्तिमत्व विकास व स्वयंप्रेरणा या दोन्हींसाठी मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात ताणतणाव, असंतोष, विकृती अपयश, स्वकेंद्रितता ,निराशा, एकलकोंडेपणा हे घालवण्यासाठी व यश प्राप्तीसाठी हे पुस्तक मार्गदर्शकाचे कार्य करते.

तसे पाहता कोणतेही पुस्तक मर्यादांपासून मुक्त नसते. या पुस्तकातील काही विचारांची पुनरावृत्ती आढळते ,काही गोष्टी अति आदर्शवादी वाटतात. ज्यामुळे लहान लहान गोष्टीतील आनंद हिरावला जाऊ शकतो. काही तत्त्वातील फरक सहज लक्षात येणे कठीण जाते .आपण वागतो ते योग्यच असे प्रत्येकाला वाटत असते, यातून नकारात्मकता शोधणे अवघडच. असे असले तरी या किरकोळ मर्यादांचा पुस्तकाच्या प्रभावशिलतेवर फारसा परिणाम जाणवताना आढळत नाही. स्वतःचे जीवन ‘बदलू’ पाहणाऱ्या स्वतःला ‘घडवू’ इच्छिणाऱ्या, नवउर्जा, नवप्रेरणा मिळवून यशासाठी योग्य दिशा शोधणाऱ्या व्यक्तींनी हे पुस्तक अवश्य वाचावे. हे पुस्तक ,यश हे प्रसंगाचे नशिबाचे नसून प्रयत्नचे फळ आहे व प्रयत्नांची शक्ती आपल्यातच असते हे सांगते.

शर्मिला देशमुख -घुमरे
मुख्य परीक्षक, समीक्षक, लेखिका
ता.केज जि.बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे