बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे अतिशय सुंदर पध्दतीने प्रदर्शन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अलिबाग: (प्रतिनिधी): गुरूवार दि. २६ डिसेंबर ते शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये इ. ५ वी ते इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दि.२६ व २७ डिसेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तसेच दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी फनी गेम्स व आनंदी मेळावा संपन्न झाला.
गुरूवार दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी सर्व प्रथम विविध गुणदर्शन कार्यक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून नटराजाच्या तसेच स्वर्गीय प्रभाकरजी राणे व स्वर्गीय अर्चनाजी राणे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले आणि नंतर श्रीफळ वाढवून विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सभासद अनिल राऊळ, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी सहाय्यक शिक्षक महादेव कोळी सर, विद्यमान मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेतर प्रतिनिधी तथा स्नेहसंमेलन अध्यक्ष गणेश राणे सर, स्नेहसंमेलन उपाध्यक्ष नथुराम म्हात्रे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलन अध्यक्षा दिपाली साबळे मॕडम, स्नेहसंमेलन उपाध्यक्षा विनया म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी केले.
दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शालेय समिती सभासद मोरेश्वर म्हसकर व मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. दोन दिवस चाललेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन अभंग, भक्तीगीत, पोवाडा, कोळीगीत, गोंधळ, भारूड, देशभक्ती गीत यांसारखी विविध प्रकारची बोलगीते, नाट्यछटा, नाटिका व आपल्या संस्कृतीची जोपासना व्हावी या साठी कोळी नृत्य, शेतकरी नृत्य आणि विविध प्रकारची समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, सादर केली आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे अतिशय सुंदर पध्दतीने प्रदर्शन केले.
या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांसाठी सुनिल माळवी सर, देवदत्त वैद्य सर व देवदत्त जोगळेकर सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स व आनंदी मेळावा आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारच्या फनी गेम्स मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच आनंदी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्टॉल्सची आकर्षक पध्दतीने मांडणी केली होती व तेथे स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. या आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होवून खरेदी विक्रीचा आनंद घेतला.
स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, स्नेहसंमेलन अध्यक्ष गणेश राणे सर, स्नेहसंमेलन उपाध्यक्ष नथुराम म्हात्रे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.



