अंधारयात्री
अंधारयात्री होते मी या जीवनात
सद्गुरू तुम्ही सूर्य बनून आले..
प्रारब्धाच्या नैराश्याला दूर करीत
अंधारले आयुष्य प्रकाशित केले..//
म्हणतात की हा मानव जन्म
चौऱ्यांशीचा फेरा टाळून मिळतो..
परी तोच जन्म नकोसा वाटे
इतके का परमेश्वर छळतो..//
पापपुण्य जन्मोजन्मींचे सारे
भोगण्यास हा मानव देह निवडला..
एकही कर्म देवा तुला माझा
कसा नसेल रे ना आवडला.//
तूच दिलेल्या श्वासांचे इतके का
ओझे वाटू लागले होते मजला..
आकांत समजण्या माझा लागलीत
कितीतरी माझे बहुमूल्य वर्ष तुजला..//
अंधारयात्री जीवन झाले होते
कुठूनही दिसेना मज प्रकाश..
तरीही वाटतसे उचलून
कवेत घेईल आकाश..//
चाचपडणाऱ्या माझ्या अवस्थेची
अखेर तुला किंचित आली दया..
सद्गुरूच्या माध्यमाने येऊन
केलीस सकारात्मक जादूची माया..//
दूर करून नैराश्य ह्या जन्मीचे
तेजोमय प्रकाश आला जीवनात..
प्रत्येक श्वास माझा गुरुदेवा
आता जगणे तुझ्या आत्मबंधनात..//
आता जगणे तुझ्या आत्मबंधनात..//
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर
==========



