फिरुनी नवे जन्मेन मी
स्नेहल संजय काळे फलटण जि.सातारा
फिरुनी नवे जन्मेन मी
‘एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवी जन्मेन मी
स्वप्ना प्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता
ना बंद ठेवा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी हरपेन मी, तरीही मला लाभेन मी…’
हृदयाचा ठाव घेणाऱ्या,भविष्यातील सुंदर स्वप्ने रंगवण्यात आणि बंधनातून मुक्त होऊन स्वैर पक्षाप्रमाणे बघता आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला लावणाऱ्या हृदयस्पर्शी गीतातील ओळी. प्रत्येक वेळी ऐकू तितक्या वेळी मनाला भावतात भावनांना स्पर्श करतात. आणि हृदयातून एक आवाज निघतो, ‘जे मला आत्ता शक्य झाले नाही ते मी नंतर मिळवेनच’. फिरुनी नवे जन्मेन मी. जणू नवी स्वप्ने उराशी बाळगून त्यांची पूर्तता करण्यासाठी.भले लोकांना माझे काळजाचे घाव आणि डोळ्यातले भाव कळले नसतील तरी माझ्या स्वत्वाचा शोध घेण्यासाठी पुन्हा जन्मेन मी.
आयुष्याच्या एका उदात्त क्षणी काही व्यक्तींची भेट होते आणि त्याचे रूपांतर सोबतीपणाच्या निश्चयात होते. पण प्रत्येक वेळी आपण ठरवू तसं घडेल ते आयुष्य ते कसलं. सारा नियतीचा खेळ असतो, आपण फक्त तिच्या हातातलं कळसुत्री बाहुल्या असतो. मनाच्या खोल गाभाऱ्यात हुंदका, नैराशाचा, उमाळा उसाचा सारा काही ओसंडून वाहणारा पूर असतो. पण डोळ्यातल्या पापण्यांना पाणी ओलांडण्याची मर्यादा असते हाच तर असतो कसोटीचा क्षण.अशा कित्येक कसोट्यांना मन मारून ती यशस्वीपणे सामोरे जाते.शरीर थकतं, पण मन थकत नाही. कारण भावनेचा ओलेपणा जरी, फाटून गेला तरी एक विलक्षण ताकद तिच्यात असते. पुढचा रस्ता जरी धूसर दिसला, तरी कसोटीच्या वेळी एवढेच सांगते…..फिरुनी नवे जन्मेन मी…..!!
स्नेहल संजय काळे
फलटण जि.सातारा
======